पाककृती फसली, प्रगती झाली
घाईघाईत किंवा अनवधानाने आपण करत असलेला पदार्थ बिघडतो. अशा वेळी आपल्या कल्पनेने फसलेल्या या पाककृतीमधून दुसरी छान पाककृती आपण बनवू शकतो.
१. मूगडाळ हलवा करताना डाळ जास्त शिजली गेल्यास हलवा मऊ होतो. मऊ झालेल्या या डाळीपासून गोड कडबू (पुरणाची करंजी) बनू शकते. आणखी एक पर्याय म्हणजे सांजोरी बनवतो तशा मूगडाळ हलव्याच्या लहान लहान चंद्रकला बनवू शकता. चंद्रकला साजूक तुपाबरोबर खमंग लागते. याशिवाय हलवा घाटून कोरडा करून त्याचे लाडू बनवता येतील.
२. इडली दडदडीत झाल्यास त्याचा उपमा बनवता येईल. त्यासाठी इडली कुस्करून घ्यावी. उडीद डाळ, कढीपत्ता, मिरचीची फोडणी करावी. त्यावर कुस्करलेली इडली घालून त्याला एक वाफ आणा. खोबऱ्याच्या पातळ चटणीबरोबर हा इडली उपमा सर्व्ह करा. या उपम्यामध्ये तुम्ही टोमॅटो, शेंगदाणे, मटारही घालू शकता.
३. चपाती कडक झाल्यास तिला तेल लावून तव्यावर शेकवून आणखी कडक करा. मसाला पापडाप्रमाणे त्यावर बारीक चिरलेला कांदा,टोमॅटो, कोथिंबीर, तिखट, मीठ पसरून स्वादिष्ट मसाला पोळी बनवून घ्यावी.
४. गोळ्याच्या आमटीत गोळे रश्श्यात विरघळल्यास ही आमटी कढईत काढून आटवून घट्ट करा. त्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर पेरा. घट्ट झालेला गोळा तेल लावलेल्या
ताटलीत काढून थापा. मिश्रण थंड झाल्यावर वड्या पाडून शॅलो फ्राय करा किंवा तशाच खा.
५. फणसाच्या बिया (आठळ्या) जास्त उकडल्या गेल्यास किंवा सोलताना त्यांचे तुकडे झाल्यास या आठळ्यांची भाजी किंवा खीर बनवता येते. तसेच कटलेट करण्याचाही पर्याय आहे. कटलेट बनवण्यासाठी या आठळ्यांमध्ये उकडलेला बटाटा, बेसन, कॉर्नफ्लोअर (मक्याचे पीठ), हळद, तिखट, मीठ आणि बारीक चिरलेली कोथिंबीर, मिरची, आले, लसूण बारीक करून घाला. एकत्र केलेल्या मिश्रणाला कटलेटचा आकार देऊन ब्रेड क्रंब्समध्ये घोळून शॅलो फ्राय करून सॉसबरोबर सर्व्ह करा. फणसाच्या आठळ्यात थोडे बेसन, कॉर्नफ्लोअर, बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर घालून त्याची भजीदेखील बनवता येतात.
६. वरण किंवा आंबटगोड डाळ करताना डाळीत एखाद वेळेस पाणी जास्त झाल्यास अधिकचे पाणी बाजूला काढून डाळ बनवता येते, पण पाण्याबरोबर सर्व सत्त्व निघून जाईल. त्यापेक्षा ब्लेंडरने ही डाळ घोटून त्यात अधिकचे पाणी घालून लेमन-कोरियांडर सूप बनवता येईल.
७. रसगुल्ला कडक बनल्यास रसगुल्ले किसून त्यात फ्रेश क्रीम, केशर, दुधाचा मसाला घालून मिश्रण एकजीव करा. ब्रेडच्या कडा काढून साजूक तुपावर थोडासा गुलाबी रंग येईपर्यंत भाजून घ्या. प्लेटमध्ये ब्रेड काढून त्याला हलके रोझ सिरप लावा. त्यावर रसगुल्ल्याचे मिश्रण पसरून वरून सुकवलेल्या गुलाबाच्या पाकळ्यांनी सजवा. एक छान शाही डिझर्ट तयार आहे.
८. केक फुलला नाही आणि कडक बनला तर त्याचे इतर काही पदार्थ बनू शकतात :
* रमबॉल : केक कुस्करून त्यामध्ये जाम, चॉकलेट सिरप, टुटीफ्रुटी किंवा ड्रायफ्रूट घालून त्याचे लहान बॉल बनवावे. हे बॉल डेसिकेटेड खोबऱ्यामध्ये घोळवून पेपर कपमधून सर्व्ह करावेत.
* ट्रायफल पुडिंग : ट्रायफल पुडिंगसाठी या केकचा बेस म्हणून वापर केला जाऊ शकतो. त्यावर शुगर सिरप घातले तर बेस मऊ राहतो.
* चीज केकमध्येही हा केक बेस म्हणून वापरता येतो.
* सर्वात सोपा उपाय म्हणजे चहात बुडवून ‘टी टाईम केक’ म्हणून खाऊन फस्त करावा.
९. दूध फाटल्यास त्याचे पनीर आणि पनीर भुर्जी बनवता येते. तसेच त्यापासून चविष्ट कुल्फीही बनवता येते.
* फाटलेल्या दुधाला उकळत ठेवून त्यात चिमूट-चिमूट खाण्याचा सोडा घाला. दूध पुन्हा एकजीव होईपर्यंत हलवत राहा. हे मिश्रण बदामी रंगाचे झाल्यावर त्यात साखर, ड्रायफ्रूट पावडर घालून आटवा. ही कुल्फी खूप छान बनते.
* फाटलेल्या दुधाची छान पनीर रबडी बनवता येईल. पनीर तुपावर परतून त्यात नारळाचे दूध, साधे दूध आणि कन्डेन्स्ड मिल्क घालून चांगले आटवून घ्या. त्यामध्ये वेलची पूड, केशर आणि ड्रायफ्रूट घालून पनीर रबडी सर्व्ह करा.
* दूध आटवून त्यात साखर, मिल्क पावडर आणि ड्रायफ्रूट पावडर घालून आटवा. आटवलेल्या या मिश्रणापासून दुधाची छान वडी बनते.
१०. ढोकळा नीट फुलला नाही तर त्याचे चाट बनवता येईल.
* ढोकळा कुस्करून त्यावर गोड चटणी, तिखट चटणी, बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर, बारीक शेव घालून सर्व्ह करा.
* मसालेदार रस्सा बनवून घ्या. बाऊलममध्ये ढोकळा ठेवून त्यावर मसालेदार रस्सा घाला. वरून बारीक चिरलेली कोथिंबीर आणि कांदा घालून खा. ढोकळा रश्श्यामध्ये मस्त भिजून निघतो.
* ढोकळ्यात मिरची, कोथिंबीर, आले, मीठ आणि साखर घालून चटणी बनवता येते.
११. पुलावासाठी भात बनवताना मऊ शिजल्यास थंड करून त्याचा तवा पुलाव बनवा.
* भात मिक्सरमधून काढून त्यात थोडे तांदळाचे पीठ, डाळीचे पीठ घालून पातळ मिश्रण बनवा. गरम तव्यावर थोडे तेल लावून पळीने सर्वत्र पसरा. त्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर, कांदा, मिरची घालून डोसा काढून घ्या. हा डोसा चटणीसोबत सर्व्ह करा.
* भातामध्ये तांदळाचे पीठ, पावभाजी मसाला, चिली फ्लेक्स, मीठ आणि कोथिंबीर घालून नीट कुस्करून त्याचे बॉल बनवा. ते वाफवून घ्या आणि वर खमंग फोडणी घालून रायत्याबरोबर सर्व्ह करा.
* मटण / चिकन बनवताना रस्सा पातळ झाल्यास पिसेस संपून जातात आणि रस्सा शिल्लक राहतो. फेकून देण्यापेक्षा हा रस्सा घालून मस्त यखनी पुलाव बनवावा. यखनी म्हणजे ब्रॉथ. उरलेला रस्सा ब्रॉथ म्हणून वापरावा.
* तंदूरी चिकन खूप ड्राय झाल्यास ते श्रेड करून कांद्यावर परतून भाज्या घालून त्याचा चिकन फ्राइड राइस बनवता येतो किंवा त्याचे ग्रिल्ड सँडविच बनवता येते.
* मासे फ्राय करताना करपले गेले तर त्यावरील आवरण काढून टाका. मासाच्या तुकड्या वापरून त्याचा फिश पुलाव बनू शकतो. त्याचप्रमाणे त्याचे ग्रिल्ड सँडविचदेखील बनवता येतील.
अजुन काही महत्त्वाचे लेख वाचण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.
अलका फडणीस
(लेखिका पाककला तज्ज्ञ आहेत.)
