September 11, 2024
Using the Internet to make recipes

इंटरनेटवरील पाककृती करताना…| रश्मी वीरेन | Using the Internet to make recipes | Rashmi Viren

इंटरनेटवरील पाककृती करताना

यू-ट्यूब चॅनेल किंवा वेबसाइटवर पाहून रेसिपी तर केली, पण म्हणावी तशी जमली नाही.केक नीट बेकच झाला नाही…पदार्थाचे आवरण कच्चेच राहिले…पाक एकतारी झाला नाही, अशा तक्रारी अनेकजण रेसिपीखालील कमेंटमध्ये करत असतात किंवा पोस्टवर विचारत असतात.अशा प्रकारे पाककृती बनवताना प्रमाण चुकलेले असू शकते किंवा कुठेतरी गल्लत झालेली असते.पण नेमकी कुठे ते लक्षात येत नाही.क्वहणूनच इंटरनेटवर पाहून रेसिपी बनवताना काही गोष्टींकडे लक्ष देणे गरजेचे ठरते.

* सर्वात प्रथम लक्षात घ्यायचा नियम म्हणजे, जो पदार्थ करणार आहात, तो आपण हॉटेलमध्ये किंवा अन्य ठिकाणी दोन-तीनदा तरी चाखलेला असावा.त्याची चव आपल्याला माहीत असावी.त्यामुळे आपण जो पदार्थ बनवत आहे, त्याची चव बरोबर झाली आहे की नाही, हे समजते.दुसरी गोष्ट म्हणजे तो पदार्थ प्रथम थोड्या प्रमाणात बनवावा, म्हणजे फसला तरी फार नुकसान होत नाही.

* जो पदार्थ करणार आहात, त्यासाठी लागणारे साहित्य, उपकरणे यांची जुळवाजुळव आधीच करून ठेवावी आणि मगच प्रत्यक्ष कृतीला सुरुवात करावी.पाककृतीसाठी लागणारे सर्व जिन्नस रूम टेंपरेचरला (सामान्य तापमानाला) हवे की विशिष्ट तापमानातील, हे आधी पडताळून त्याप्रमाणे त्याचा वापर आणि तयारी करावी.

* एखादा पदार्थ करण्यापूर्वी व्हिडीओमधील पदार्थ आणि रेसिपी सादर करणारी व्यक्ती/ शेफ कोणत्या देशातील आहे, याकडेही लक्ष द्या.वेगवेगळ्या देशातील वजने, मापे, साहित्य यात फरक किंवा वैविध्य असू शकते.भारतात वजन ग्रॅममध्ये मोजले जाते.तर अमेरिका किंवा युरोपातील देशांमध्ये वजन पाऊंड, औंसमध्ये मोजले जाते.बेक्ड् पदार्थांच्या पाककृतीसाठी तेथे साखर, आयसिंगसाठीचे क्रीम, तेल, बटर, चीज, इसेन्स हे सर्व वेगवेगळ्या प्रकारचे साहित्य वापरले जाते.बरेचदा ते ब्रँड, तो प्रकार आपल्याकडे उपलब्ध होईलच असे नाही.रेसिपीमध्ये वापरण्यात येणारी उपकरणेही आपल्याकडे बरेचदा उपलब्ध नसतात.त्यामुळे अशा पाककृती करताना या गोष्टींचे भान राखले पाहिजे.ऐनवेळी योग्य पर्यायी साधनसामुग्री शोधणे शक्य नसते आणि पाककृती फसू शकते.

* बेक्ड् पदार्थ करताना ओव्हनमध्ये त्या पदार्थासाठी दिलेल्या तापमानाची निश्चित केलेली वेळ योग्य असेल असे नाही.म्हणजे एखादा केक १६० अंश सेल्सिअस तापमानाला २५ मिनिटे बेक करायचा असेल तर वेगवेगळ्या कंपनीच्या ओव्हनमध्ये वेगवेगळा वेळ (२० ते ३० ‍मिनिटे) लागू शकतो.

* भारतीय पाककृती करताना मसाल्यांकडे काळजीपूर्वक लक्ष देणे गरजेचे आहे.मसाल्यांमुळे चवीत, रंगात फरक पडतो.म्हणजे पंजाबी गरम मसाला, गोडा मसाला, कांदा लसूण मसाला, सांबार मसाला, रस्सम मसाला वगैरे…जिथे जो मसाला वापरायला सांगितला आहे, त्याचाच वापर करणे उचित ठरते, अथवा पदार्थ फसू शकतो.

* कोणतीही पाककृती करताना प्रमाण ही फार महत्त्वाची बाब आहे.टी स्पून आणि टेबल स्पून यातील फरक समजला नाही, तर घोळ होऊ शकतो.हे टाळण्यासाठी प्रथम मापे समजून घ्यावीत.वाटी आणि कप यांच्या प्रमाणात तफावत आढळते.म्हणूनच यू-टयूबवर अथवा ज्यांची वेबसाइट आहे त्यांना नक्की किती प्रमाण अपेक्षित आहे, हे समजून घ्यावे.वजनकाटा असेल तर दिलेल्या साहित्याचे प्रमाण मोजून घेणे हा सर्वोत्तम पर्याय.

* केकचे किंवा इडलीचे बॅटर कसे बनवायचे अथवा एखादा गोड पदार्थ करताना पाक नक्की कसा हवा, पातळ की घट्ट हे नीट तपासून घ्यावे.तूप कसे वापरले आहे, पातळ की घट्ट हेही समजून घ्यावे.एखादा पदार्थ शिजण्याच्या, आंबवण्याच्या वेळा ऋतुनुसार बदलू शकतात, हेसुद्धा लक्षात घ्यायला हवे.साहित्यातील एखादा जिन्नस आपल्याकडे उपलद्ब्रध नसल्यास त्याला पर्याय काय असू शकतो याची माहिती आधीच करून घ्यावी आणि तशी तयारी करून ठेवावी.

* अनेकदा पदार्थातील काही जिन्नस भाजून घ्यायचे असतात तर काही कच्चे.जसे भरली मिरची किंवा कारले करण्यासाठी बेसन भाजून घ्यायचे असते.सूचना नीट वाचली नाही आणि कच्चे बेसन घेतले तर पदार्थ बिघडू शकतो.त्यामुळे व्हिडीओमध्ये काही सूचना दिल्या असतील, तर त्या पुन्हापुन्हा नीट वाचून घ्याव्यात.

* एखादा पदार्थ (केक, बर्फी, नानकटाईसारखे) थंड झाल्यावर अथवा फ्रीजमध्ये सेट केल्यानंतर खायचा असल्यास, त्याचा दिलेला कालावधी काळजीपूर्वक फॉलो करावा.अनेकदा उत्साहात आणि पदार्थ करण्याच्या घाईत सूचनांचे पालन केले जात नाही.

* आजकाल चायनीज पदार्थांच्या रेसिपीज फार आवडीने पाहिल्या जातात आणि केल्याही जातात.चायनीज पदार्थांमध्ये महत्त्वाचा घटक म्हणजे सोया सॉस.तो लाइट वापरला की डार्क हे पाहूनच पदार्थ करावेत.कारण त्यामुळे पदार्थाच्या रंगात किंवा चवीत फरक पडतो.व्हिनेगरबाबत ही गोष्ट लक्षात घ्यावी.

अजुन काही महत्त्वाचे लेख वाचण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.


रश्मी वीरेन

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.