मल्टिग्रेन आटा चिकन खिमा डोसा
मल्टिग्रेन आटा साहित्य व कृती: २०० ग्रॅम नाचणी, प्रत्येकी १०० ग्रॅम मूगडाळ पीठ, उडीदडाळ पीठ, प्रत्येकी ५० ग्रॅम ज्वारी, बाजरी, ओट्स, २० ग्रॅम मेथी दाणे. सर्व साहित्य एकजीव करून दळून घ्या.
हिरवी चटणी साहित्य व कृती: ५० ग्रॅम हिरवी मिरची तेलावर परतून घ्या. त्यात प्रत्येकी १० ग्रॅम आले, लसूण, कोथिंबीर, पुदिना, जिरे, हळद, चवीनुसार मीठ घालून एकत्र वाटून घ्या.
चिकन खिमा साहित्य: १०० ग्रॅम चिकन खिमा, १ मोठा चमचा हिरवी चटणी, छोटा चमचा लिंबू रस, हळद, मीठ, तेल, चिरलेला कांदा व टोमॅटो, कोथिंबीर.
डोसा साहित्य: २०० ग्रॅम मल्टिगे्रन पीठ, १ अंडे, तेल, चीज, मिरपूड, चवीनुसार मीठ.
खिमा कृती: गरम कढईत तेल घालून त्यावर कांदा परता. कांदा लाल झाल्यावर टोमॅटो घालून परता. तोपर्यंत चिकन खिम्याला लिंबूरस, हळद, मीठ, हिरवी चटणी लावून घ्या. कांदा, टोमॅटोला तेल सुटल्यावर त्यात खिमा घालून परता. मीठ, कोथिंबीर घालून ५ मिनिटे शिजवून घ्या.
डोसा कृती: बाऊलमध्ये २०० ग्रॅम पिठात मीठ, मिरपूड, पाणी घालून एकजीव करून घ्या. हे मिश्रण १० मिनिटे तसेच ठेवून प्लास्टिकच्या पिशवीत भरा. नॉनस्टिक पॅन गरम झाल्यावर त्यावर थोडे पाणी शिंपडून टिश्यूने पुसून घ्या. प्लास्टिक पिशवीच्या खालचे टोक थोडेसे कापून पॅनवर जाळीदार डोसा घाला. मीठ, अंडे, मिरपूड एकत्र फेटून डोश्यावर पसरवा. दोन मिनिटांनंतर डोशावर खिमा पसरून त्यावर चीज किसून घाला. चीज विरघळल्यावर कोथिंबीर घालून काढून घ्या. त्यावर दुसरा डोसा ठेवा. काप करून सॉस किंवा हिरव्या चटणीबरोबर सर्व्ह करा.
अजून काही महत्त्वाच्या रेसीपी जाणून घेण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.
शुभद्रा यादव, कोल्हापूर