fbpx
crash diet | diet plans | weight loss diet

क्रॅश डाएटिंगचे धोके | अमिता गद्रे | The dangers of Crash Dieting | Amita Gadre

क्रॅश डाएटिंगचे धोके

हल्ली ज्याला बघावे तो वजन कमी करण्याच्या मागे लागलेला असतो. पण अचानक सगळेच वजन कमी करण्याच्या मागे का लागले आहेत? कारण आजूबाजूला जिथे बघू तिथे सगळीकडे (जाहिराती, टीव्ही-सिनेमा) एकदम सडपातळ किंवा फिट व्यक्ती दिसतात. ज्यांचे वजन अधिक असते त्यांना मनपसंत जोडीदार काय, कपडेही मिळायला त्रास होतो. वर येताजाता ‘जरा डाएट कर की’ असा सल्ला ऐकावा लागल्याने होणारा मनस्ताप आणखी वेगळा!

जगभरातील ‘weight management’ या क्षेत्रात ४२४.७ बिलियन अमेरिकन डॉलरची उलाढाल होण्याचे कारण काय? याचे कारण वजनवाढीमुळे आपल्याला बऱ्याच वैद्यकीय समस्यांचा सामना करावा लागतो.

वजनवाढीमुळे होणारे आजार :

उच्च रक्तदाब (हायपर टेन्शन), एलडीएल (बॅड) कोलेस्ट्रॉल व ट्रायग्लिसरॉइड वाढणे, एचडीएल (गुड) कोलेस्ट्रॉल कमी होणे, टाइप टू डायबिटीस, हृदयविकार, ब्रेन स्ट्रोक (मेंदूचा झटका), गॉल ब्लॅडर डिसीज (पित्ताशयाचे विकार), नॉन-अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीज (यकृताचे  विकार),  ऑस्टिओ आर्थ्रायटिस, स्लीप अॅप्नीया (घोरणे), कर्करोग, ताण (डिप्रेशन).

अशा व्याधी आपल्याला जडू नयेत, म्हणून आपले वजन आटोक्यात ठेवणे गरजेचे आहे. पण बहुतांश जण ह्याचा चुकीचा अर्थ काढून कोणत्याही प्रकारे पटकन वजन कमी करण्याच्या मागे लागतात. अशा घाईमुळे गेल्या ४०-५० वर्षांत अनेक ‘फॅड डाएट’ किंवा ‘वेट लॉस’ पद्धती बोकाळल्या आहेत.असे कोणतेही डाएट करण्याआधी ह्या डाएटमधील फरक, साम्य आणि त्याचे आपल्या शरीरावर होणारे परिणाम जाणून घेऊ या. सगळ्याच लोकप्रिय डाएटमध्ये काही समान नियम असतात :

१) तुम्हाला एकूण आहार कमी करायला लावणे.

२) तुमच्या एकूण कॅलरीज कमी करणे.

३) तुमच्या शरीराला जास्त कॅलरीज बर्न करायला लावणे.

४) झटपट वजन कमी करून देणे (ह्याचे धोकेही असतात).

लोकप्रिय फॅड डाएट्स :

जनरल मोटर्स (जीएम) डाएट: एका आठवड्यात ७ किलोपर्यंत वजन कमी करण्याच्या प्रलोभनामुळे जीएम  डाएट  प्रसिद्ध  झाले.  ह्या डाएटमध्ये तुम्ही सात दिवसांतील पाच दिवस केवळ मोजकी फळे आणि भाज्या खायचे. सहाव्या दिवशी थोडे चिकन / मासे (२०० ग्रॅम) खाता येते आणि सातव्या दिवशी परत फळे, भाज्या व थोडा भात खायचा. या डाएटमुळे काही लोकांचे वजन दोन किलोने कमी होते, तर काहींचे सात किलोपर्यंत. पण जसे तुम्ही तुमचा आधीचा आहार सुरू करता, तसे लगेच वजन पुन्हा जैसे थे होते. कमी केलेले वजन पुन्हा वाढण्याचा प्रकार सगळ्या फॅड डाएट्समध्ये होतो.

८०० कॅलरी किंवा खूप कमी कॅलरी डाएट : आपण दररोज जर घरचे अन्नपदार्थ खाल्ले तर २५००-३५०० कॅलरीजचे एका दिवसात सेवन करतो. ह्या कॅलरी कमी प्रमाणात घ्यायला सांगणारा डाएट म्हणजे ८०० कॅलरी डाएट. यात सकाळी एक ऑम्लेट (फक्त पांढरा बलक, पिवळा भाग नको), अर्धे सफरचंद, दुपारी एक चपाती, एक वाटी भाजी आणि एक वाटी कोशिंबीर, रात्री एक बाऊल सूप आणि एक ब्रेड व थोडे पनीर एवढाच आहार घ्यायचा.ह्याव्यतिरिक्त दुसरे काहीही खाता येत नाही. ह्या डाएटमुळे वजन कमी होत असले तरी अशक्तपणाही येतो.

डेअरी फ्री आणि ग्लुटेन फ्री: अमेरिकेत ह्या डाएटची खूप मोठी लाट काही वर्षांपासून आली आहे. गव्हात असणारे ग्लुटेन हे प्रथिन काही लोकांना पचायला त्रास होतो. त्याच प्रकारे लॅक्टोज ही दुधात असलेली साखर पचवायलाही काहींना त्रास होतो. अशा व्यक्तींसाठी ग्लुटेन आणि डेअरी फ्री डाएट, ज्यात तुम्हाला गहू व गव्हाचे पदार्थ (चपाती, पास्ता, ब्रेड, बिस्कीट, नूडल्स, केक इ.) आणि दूध व दुग्धजन्य पदार्थ वर्ज्य असणारे डाएट सांगितले जाते. या आहारामुळे वजन कमी झाल्याचे निदशर्नास आले आणि तेव्हापासून वजन कमी करण्यासाठी त्याचा अवलंब होऊ लागला.

इंटरमिटंट फास्टिंग : रोज काही तास उपवास करायचा आणि ठरावीक वेळेतच खायचे म्हणजे इंटरमिटंट फास्टिंग. साधारणपणे ८-१० तास ह्या कालावधीत तुम्हाला खाण्याची सवलत असते, पण त्यात तुम्ही अधिक कॅलरीयुक्त पदार्थ खायचे नाहीत, अशी अपेक्षा असते. बाकीचा वेळ फक्त पाणी प्यायचे. हे डाएट करणाऱ्या व्यक्ती सकाळी नाश्ता किंवा रात्रीचे जेवण घेत नाहीत, असे तुम्हाला आढळेल.

मध्यंतरी  ह्याच  डाएटचे  एक वेगळे रूप, ज्यात सकाळी / दुपारी-संध्याकाळी / रात्री असे केवळ दोनदाच ५५ मिनिटांच्या अवधीत आहार घ्यायचा व बाकी वेळेत काहीच न खाणे प्रचलित झाले होते. या डाएटलाही खूप प्रसिद्धी मिळाली होती. इंटरमिटंट फास्टिंगमुळे वजन कमी होतेच, पण त्याचबरोबर मधुमेहींची रक्तशर्करा (ब्लड शुगर) कमी होत असल्याचे लक्षात आले आणि हे डाएट लोकप्रिय झाले. हे डाएट लोकप्रिय होण्यामागचे आणखी एक कारण म्हणजे व्यायाम न करता वजन कमी करता येणे, हे होते.

किटो डाएट : ह्या डाएटचा प्रयोग अपस्मार अर्थात एपिलेप्सीच्या रुग्णांसाठी सगळ्यात आधी करण्यात आला होता. ग्लुटेन फ्री डाएटप्रमाणेच किटो डाएटमुळे झटकन वजन कमी होत असल्याचे लक्षात आल्यामुळे सर्वसामान्य लोकही किटो डाएट करायला लागले. ह्या डाएटमध्ये खूप जास्त फॅट, थोडे प्रोटीन्स आणि अगदी कमी (किंवा नसल्यासारखेच) कार्ब्स खाल्ले जातात. चीज, बटर, तूप खाऊनही वजन कमी करता येते ह्याने लोकांना आकर्षित केले. मात्र चपाती, भात, ब्रेड किंवा भाकरी असे कोणतेच पदार्थ खाता येत नाहीत. ह्या डाएटमध्ये कार्ब्सचा समावेश केलेला नसल्यामुळे तुम्हाला डाळ, कडधान्य असे काहीच खाता येत नाही. सगळा भर मांसाहारी पदार्थ, पनीर, लोणी, तूप, तेल, चीज ह्यावरच असतो. ह्या डाएटमुळे वजन पटकन कमी होते, पण हे डाएट दीर्घकाळ चालू ठेवणे खूप जड जाते. कारण तुम्हाला बाहेरचे निवडक पदार्थच खाता येतात. त्यात जर पाहुणे म्हणून तुम्ही कोणाकडे गेलात, तर किटो मोडलेच म्हणा! या डाएटने कमी केलेले वजन ते बंद करताच धावतपळत तुमच्या शरीराकडे परतते.

OMAD (One Meal A Day) : ह्यात तुम्ही दिवसातून एकदाच पोटभर जेवता, बाकीचा पूर्ण दिवस उपवास. एकच दिवस नाही, तर दररोज!

वरील सगळ्या डाएटचा अभ्यास केल्यावर लक्षात येईल, की प्रत्येक डाएटमध्ये तुमच्यावर वेळेचे बंधन असते किंवा पूर्ण फूड ग्रुप म्हणजे (धान्य, कडधान्य, दूध, प्रक्रिया केलेले पदार्थ) वगळायला सांगितले जाते किंवा खूप वेळ उपाशी राहून तुमचे एकंदर खाणे (कॅलरी इनटेक) कमी केले जाते. हे सगळे डाएट प्रकार तुम्हाला व्यायाम न करता पटकन वजन कमी करून देऊ असे सांगतात. पण अशा प्रकारे वजन कमी करण्याचे काही धोके असतात, ते समजून घ्यायला हवे :

१) अशा प्रकारे डाएट करताना अशक्तपणा, चक्कर येणे, मळमळ, डोकेदुखी, बद्धकोष्ठ, एकाग्रता कमी होणे अशा समस्या उद्भवू शकतात. २) खूप जास्त काळ असे चुकीचे डाएटिंग करत राहिल्यास केस गळणे, त्वचारोग, तोंड येणे, शक्ती कमी होणे, हाडे ठिसूळ होणे आदी त्रासांना तोंड द्यावे लागते.३) जरा डाएट चुकले की लगेच वाढणाऱ्या वजनामुळे मानसिक ताण, नैराश्य यांसारख्या समस्या सतावतात. ४) दीर्घकाळ / सततच्या अशा डाएटिंगमुळे जीवनसत्त्वे, खनिजे व प्रथिने यांची शरीरात कमतरता निर्माण होते. तसेच मासिक पाळी नियमित न येणे, हिमोग्लोबिन कमी होणे, पित्ताशयाचे विकार होऊ शकतात. ५) नियमित डाएट करणाऱ्यांमध्ये ‘बिंज इटिंग’ (प्रमाणाबाहेर खाणे) आणि मग अतिशय व्यायाम किंवा उलट्या करून ते अन्न बाहेर काढण्याचा प्रयत्न करणे व ह्यामुळे मानसिक आजारही जडू शकतात. ६) डाएटिंगमुळे आपण जरा काही वेगळे खाल्ले की आता आपले कष्ट वाया जाणार अशा भयगंडाने या व्यक्ती ग्रस्त होतात. दुसरा परिणाम म्हणजे, कितीही वजन कमी केले तरी स्वतःला आपण जाडच समजत राहतो. ७) वजन कमी करायची पद्धत चुकीची असल्यामुळे आपली तब्येत चांगली होण्याऐवजी अधिक खराब होते.

वजन कसे कमी करायचे?

हे सगळे दुष्परिणाम वाचल्यावर वजन कमी करायचे की नाही आणि करायचे तर कसे असा प्रश्न साहजिक उभा राहतो. वजन कमी करण्याच्या मागे लागण्याऐवजी आपले वजन कशामुळे वाढले आहे आणि त्यासाठी आपल्या दैनंदिन जीवनशैलीमध्ये काय बदल करावा लागेल, ह्याचा विचार करा. केवळ वजन काट्यावरचा आकडा कमी करण्याच्या मागे न लागता, आपली शक्ती आणि आपली तब्येत (blood chemistry report) चांगली करण्यावर भर असावा. एक गोष्ट नेहमीच लक्षात ठेवा, आपले वजन एका रात्रीत किंवा एका आठवड्यात / महिन्यात वाढलेले नसते, तर ते कमी करायलाही थोडा वेळ दिला पाहिजे. कारण घाईघाईच्या ‘वेट लॉस’मुळे तब्येतीचे नुकसान होऊ शकते.


अमिता गद्रे

(लेखिका अनुभवी आहारतज्ज्ञ आहेत.)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.