September 11, 2024
Cancer | cancer awareness

कर्करोग – नियती की निवड? | डॉ. सुलोचना गवांदे | Cancer – Destiny or Choice? | Dr. Sulochana Gawande

कर्करोग – नियती की निवड?

कर्करोगाचे केवळ नाव घेतले तरी सर्वसामान्यांच्या मनात धडकी भरते. पण कर्करोग हा आजार नवा नाही. अगदी ३-४ हजार वर्षे जुन्या प्राचीन मानवी अवशेषांमध्येही या रोगाचे अस्तित्व सापडले आहे. मानवी शरीर हे कित्येक प्रकारच्या कोट्यवधी पेशींचे बनलेले असते. या पेशींचे नियंत्रण कक्ष त्यांच्या गुणसूत्रातील जनुकांमध्ये असते. तिथल्या नियमांनुसार पेशी त्यांचे काम चोख बजावतात आणि हे शरीराचे मशीन व्यवस्थित चालू राहते. जनुकांना दुखापत होऊन त्यांची रचना बदलते तेव्हा हा समतोल बिघडतो आणि गरज नसताना पेशींची अनियंत्रित निर्मिती होऊ लागते. चुकार पेशी अमर्याद वाढत जाऊन त्यांची गाठ बनते. यातील काही पेशी रक्त किंवा लिम्फ यातून शरीराच्या इतर भागात पसरतात व वाढू लागतात. यालाच कर्करोग (कॅन्सर) म्हणतात. ही सर्व प्रक्रिया होण्यात अनेक वर्षे जातात.

कर्करोगासाठी सर्वप्रथम वापरला गेलेला इलाज म्हणजे शस्त्रक्रिया. कर्करोगाचे ठळक लक्षण म्हणजे समोर दिसणारी गाठ. ती काढून टाकली तर आजार बरा होईल, असे वाटणे योग्यच होते. तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे गुंतागुंतीच्या व प्रदीर्घ काळ चालणाऱ्या शस्त्रक्रियेने खोलवर पसरलेली मोठ्या आकाराची गाठ काढणे आता शक्य झाले आहे. कर्करोगाचे निदान करण्यासाठी गाठीमधील काही भाग अथवा पेशी काढून तपासणीसाठी पाठवतात.या तपासणी (बायोप्सी) अहवालाद्वारे गाठ कर्करोगाची आहे का, पेशी कुठच्या प्रकारच्या आहेत आणि त्यांच्या मूळ रूपात किती फरक झाला आहे वगैरे बाबी समजतात. बदल जितका जास्त तितका रोग अधिक गंभीर होतो. विविध तपासण्या करून कर्करोग बाकीच्या भागात पसरला आहे की नाही याची खात्री केली जाते. जर दुसऱ्या ठिकाणी वाढ दिसली तर ते चिंताजनक असते. ही सगळी माहिती एकत्र करून कर्करोगाचा प्रकार आणि टप्पा ठरतो व त्याप्रमाणे उपचारांची दिशा आखली जाते.

किमोथेरपीमध्ये कर्करोगाच्या पेशींच्या विरुद्ध वापरण्यात येणारे घातक द्रव्य किंवा विष रक्तातून शरीरात सोडले जाते. निरोगी पेशींवरदेखील या औषधांचा विपरीत परिणाम होतो. उदाहरणार्थ रक्त, आतडे, त्वचा, तोंड यामधील पेशी सतत वाढत असतात. त्यामुळे या इंद्रियांच्या संबंधित पेशींना जास्त त्रास होतो. यातील बहुसंख्य त्रास तात्पुरता, म्हणजे इलाज चालू असतानाच जाणवतो. केस जाणे हा सर्वात दृश्य स्वरूपाचा पण काळजी करू नये असा परिणाम. औषध थांबले की रुग्णाचे केस परत येतात. पण काही दुष्परिणाम जीवघेणे असतात. या काळात डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणे रुग्णाची काळजी घेणे जरुरीचे असते.

रेडिएशन थेरपीमध्ये क्ष-किरणे अचूक नेम धरून कर्करोगाच्या गाठीवर मारतात. या लहरींमध्ये जी ऊर्जा असते त्यामुळे कर्करोगाच्या पेशींची अंतर्गत रचना ढासळते आणि त्या नष्ट होतात. बाकीच्या चांगल्या पेशी या माऱ्यात सापडल्या तर त्यांनाही इजा पोहोचते आणि त्यामुळे रेडिएशन संबंधित दुष्परिणाम उद्भवतात.

विविध ग्रंथीतून होणारे स्राव (hormones किंवा संप्रेरक) आपल्या शरीराच्या आणि कित्येकदा कर्करोगाच्या वाढीशीही निगडित असतात. स्तन आणि पुरुषांना होणाऱ्या प्रोस्टेट कर्करोगासाठी अशा संप्रेरकविरोधी औषधांचा प्रभावीपणे उपयोग केला जातो.

आधुनिक काळात कर्करोगाचे प्रकार ठरवताना जनुकांमधील कुठले परिवर्तन रोगाच्या वाढीला कारणीभूत असावे, याचा शोध घेतला जातो. असे बदल नष्ट केले तर कर्करोग संपेल या तत्त्वावर आधारित अनेक यशस्वी औषधे विकसित करण्यात आली आहेत. त्यातील ग्लीव्हेक औषधाचे यश तर अभूतपूर्व आहे. २५ वर्षांपूर्वी क्रॉनिक मायलोइड ल्युकेमिया ह्या प्राणघातक रोगामध्ये चारपैकी एखादाच रोगी फार तर पाच वर्षे जिवंत राहायचा. परंतु ग्लीव्हेकमुळे आजार बरा होऊन रुग्ण आता दीर्घायुष्य जगू शकतात. लक्ष्य थेरपी वापरून शोधलेली औषधे स्तन, फुफ्फुसे, त्वचा अशा अनेक प्रकारच्या कर्करोगाच्या उपचारात अतिशय प्रभावी ठरली आहेत.

आजची सर्वात प्रगत उपचारपद्धती म्हणजे प्रतिक्षमता (immune) थेरपी. यामध्ये शरीराची नैसर्गिक संरक्षण प्रक्रिया अधिक मजबूत करून कर्करोग नामोहरम करण्याचे तंत्र वापरले जाते. कर्करोगाच्या पेशींची वाढ रोखण्याचा उद्देश यामागे असून त्यासाठी बाहेरची विषारी औषधे न देता जैविक पदार्थ वापरले जात आहेत. प्रतिक्षमता थेरपीची औषधे नवी असल्यामुळे त्यांच्याविषयीचा अनुभव मर्यादित आहे. मात्र जेव्हा लागू पडतात तेव्हा ही औषधे कमालीची प्रभावी ठरतात आणि त्यांचे दुष्परिणाम कमी प्रमाणात होतात. अमेरिकेचे वयोवृद्ध राष्ट्राध्यक्ष जिमी कार्टर यांना २०१५ मध्ये त्वचेचा कर्करोग झाला आणि तो शरीरात पसरला होता. प्रतिक्षमता थेरपीमुळे त्यांच्या शरीरातील गाठी कमी झाल्या आणि आजही ते सुखरूप आहेत.

उपचारात कितीही प्रगती झाली, तरी कर्करोग हा अजूनही अतिशय गंभीर आजार आहे. या दुखण्यात रोगी आणि सर्व कुटुंब मानसिक व कित्येकदा आर्थिक अडचणीमुळे होरपळून निघते. कर्करोगाचे निदान लवकर झाले तर रोगमुक्त होण्याची शक्यता अधिक असते. दुर्दैवाने, बहुतेक वेळा लक्षणे स्पष्ट होईपर्यंत रोग वाढून शरीरात पसरलेला असतो आणि मग आधुनिक उपचारांनीसुद्धा जीव वाचत नाही.

हा इतका भयंकर रोग मुळात होतोच का आणि त्याला थांबविण्याचे प्रतिबंधक मार्ग काय आहेत, हा प्रश्न साहजिकच उभा राहतो. आजच्या आधुनिक जीवनात आपली आयुष्य पद्धती व सवयी बदलल्या आहेत. आता दिसणारे कर्करोगाचे कित्येक प्रकार पूर्वी अस्तित्वात नव्हते. आज जगातील प्रगतशील देशात कर्करोगाचे प्रमाण वाढते आहे. त्याचबरोबर संशोधन असेही दाखवते, की ५० ते ७० टक्के कर्करोग हा आनुवांशिक कारणांनी नाही तर माणसाच्या सवयींनी होतो.

तंबाखू हे कर्करोग होण्यामागचे एक प्रमुख कारण आहे. तंबाखूच्या सेवनाने मागच्या  शतकात  दहा  कोटी  मृत्यू झाल्याची आकडेवारी समोर आली आहे.

अलीकडे लोकांच्या आयुष्यात शिरकाव केलेल्या अनेक वाईट चालीरीतींचा कर्करोगाशी जवळचा संबंध प्रस्थापित झाला आहे. हल्ली पाश्चात्त्य मद्याचे सेवन आपल्याकडे सर्रास चालते. ही सवय भारतीयांकरता नवीन आहे. आपल्याकडे नशापाणी करण्यासाठी अमली पदार्थ म्हणून अफू-गांजाचा वापर पूर्वापार चालत आला आहे. पण व्हिस्की किंवा मदिरा (Beer-wine) हे प्रकार आपल्या समाजात रूढ नव्हते. विदेशी मद्यामध्ये इथेनॉल हा मुख्य घटक असतो. शरीरातील पचनक्रियेमुळे त्याचे रूपांतर एसेटाल्डिहाइड ह्या विषजन्य रसायनात होते. ज्याचा परिणाम थेट जनुकांवर होतो. मद्य तयार करण्याच्या प्रक्रियेतसुद्धा अनेक विषारी कर्ककारक पदार्थ निर्माण होतात. दारूतील इथेनॉलमुळे यकृताचा कर्करोग होण्याची शक्यता वाढते.कर्करोगाच्या आकडेवारीचा अभ्यास असे दर्शवतो, की मद्यपी व्यक्तींमध्ये तोंड, घसा, अन्ननलिका, आतडे व यकृत या अवयवांचे कर्करोग अधिक प्रमाणात आढळतात.

दारूमुळे कर्करोग होतो हे मान्य करायला पुष्कळ विरोध झाला. अखेरीस सप्टेंबर २०१८ मध्ये अमेरिकेच्या नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटने मद्य कर्ककारक आहे हे घोषित केले. मुद्दा असा की, एकंदर किती अल्कोहोल शरीरात जाते आणि किती वेळेला घेतले जाते, हे महत्त्वाचे आहे. कमी मद्य पिऊनही बायकांना पुरुषांपेक्षा जास्त त्रास होतो. दारूच्या जोडीने तंबाखूचे व्यसन असले तर कर्करोग होण्याची शक्यता निश्चितपणे जास्त बळावते.

बदलत्या जीवनशैलीमुळे समाजात लठ्ठपणाची समस्या वाढली आहे. सुरुवातीला स्थूलपणामुळे मधुमेह, हृदयविकार असे रोग होत असल्याचे लक्षात आले. गेल्या १५-२० वर्षांत लठ्ठ व्यक्तींमध्ये कर्करोगाचे प्रमाण वाढल्याचे खात्रीलायकरीत्या आढळले आहे. हे कसे होऊ शकते? लठ्ठपणाचा जनुकांमध्ये बदल होण्याशी काय संबंध असू शकतो, यावर आता बरेच संशोधन झाले आहे. वजन वाढते तेव्हा शरीरातील मेदाच्या पेशींमध्ये वृद्धी होते. या पेशी अनेक प्रकारची प्रथिने, विशेषतः एस्ट्रोजिन (estrogen) आणि वाढीला चालना देणारी संप्रेरके (हार्मोन) निर्माण करतात. शास्त्रीय तर्क असा आहे, की ही प्रथिने रक्ताद्वारे बीजांडकोश, मूत्रपिंड, स्वादुपिंड अशा अनेक इद्रियांपर्यंत पोहोचतात आणि तेथील पेशींना प्रजननासाठी तसेच इतर बदल करण्यासाठी उद्युक्त करतात. यातूनच कर्करोगाची सुरुवात होत असावी. खरे तर भाजीपाला, धान्ये असे सकस अन्न खाऊन वजन आटोक्यात राहते.तसेच यातून शरीराला आवश्यक असणारी जीवनसत्त्वे, खनिजे मिळतात. मात्र तळलेले पदार्थ, मिठाई व फास्टफूड असे पदार्थ खायला चांगले लागले तरी त्यामुळे वजन वाढते व शरीराला पोषणमूल्ये मिळत नाहीत. यामुळे रोगप्रतिकार शक्तीवर विपरीत परिणाम होऊन कर्करोगाची वाढ होत असावी.आतापर्यंतच्या पाहणीनुसार लठ्ठ माणसांमध्ये जठर, मूत्रपिंड, स्वादुपिंड, स्तन, आतडे, अन्ननलिका या अवयवांच्या कर्करोगाचे प्रमाण इतर योग्य वजनांच्या माणसांपेक्षा बरेच जास्त दिसते. लाल मांस (मटण, गोमांस व डुकराचे मांस) जास्त प्रमाणात खाल्ल्यास आतड्याचा कर्करोग होण्याची शक्यता वाढते, हे आता निर्विवादपणे स्वीकारले गेले आहे. त्यामुळे अन्नातील लाल मांसाचे प्रमाण मर्यादित ठेवणेच हितकारक आहे.

हे मान्य, की प्रत्येक लठ्ठ व्यक्तीला कर्करोग होत नाही आणि एखादा सात्त्विक आयुष्य जगणारा, दारूला स्पर्श न करणारा माणूस कधीतरी अल्पवयातच या रोगाने ग्रासला जातो. हे असे का होते, याची कारणे त्या व्यक्तीची आनुवंशिकता, जनुके व त्याच्या आजूबाजूचे वातावरण यावर अवलंबून असावीत. ती उत्तरे शोधण्यासाठी संशोधन चालू आहे. तोपर्यंत सध्या उपलब्ध असलेल्या ज्ञानाच्या साहाय्याने योग्य जीवनशैलीची निवड करून कर्करोगाला दूर ठेवण्यासाठी प्रयत्न करायला हवेत, सजग राहायला हवे. त्यासाठी नियतीला व दैवाला बोल न लावता वैद्यकाइतकेच सवयींचे महत्त्व जाणून घ्यायला हवे.

अजुन काही महत्त्वाचे लेख वाचण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.


डॉ. सुलोचना गवांदे

(लेखिका कर्करोग संशोधक असून कर्करोग : माहिती आणि अनुभवहे पुस्तक त्यांनी लिहिले आहे.)

 

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.