fbpx
गरम पाणी | hot water

गरम पाणी हितकारक कसे ? | वैद्य उर्मिला पिटकर | How is hot water beneficial? | Dr. Urmila Pitkar

गरम पाणी हितकारक कसे?

मानवी शरीरासाठी ‘पाणी’ अत्यंत आवश्यक आहे. पण, हे पाणी कोणी, किती, कधी, कसे प्यावे याचेही काही नियम ठरलेले आहेत. शरीराला पाण्याची किती गरज आहे, हे नैसर्गिकरित्या आपल्याला लागणाऱ्या तहानेद्वारे सुचवले जाते. हिवाळ्यात व पावसाळ्यात तहान कमी लागते, याउलट उन्हाळ्यात अधिक तहान लागते. शारीरिक श्रम करणाऱ्या लोकांना अधिक तहान लागते, तर एसीमध्ये बसून बैठे काम करणाऱ्यांना कमी तहान लागते.त्यामुळे आपापल्या तहानेनुसार पाणी पिणे अधिक शास्त्रीय आणि सयुक्तिक आहे.

पाणी पिण्याचे शास्त्र

आपल्या शरीरामध्ये ‘अग्नी’ नावाचे एक तत्त्व आहे. हा अग्नी आपण सेवन केलेल्या अन्नाचे, पाण्याचे पचन करतो आणि शरीरासाठी उपयुक्त घटक बनवतो. बाहेरच्या सृष्टीत जसे आगीवर पाणी ओतले, तर हे पाणी आग विझवते; मग ते गरम पाणी असले तरी. त्याचप्रमाणे तहान लागलेली नसताना उगाचच पाणी पीत राहिले (मग ते गरम का असेना) तर त्यामुळे शरीरातील अग्नी मंदच होणार. मंद अग्नी हा जवळजवळ सर्वच रोगांचे मूळ आहे. त्यामुळे तहान लागली असतानाच पाणी प्यावे. स्वास्थ्य रक्षणासाठी शरद व ग्रीष्म ऋतू वगळता, रोगी व्यक्तींबरोबरच निरोगी व्यक्तींनीही, गरजेप्रमाणे थोडेथोडेच पाणी प्यावे, असा शास्त्रादेश आहे.

गरम पाणी: एक औषध/उपचार पद्धती

आयुर्वेदात गरम पाणी म्हणजेच ‘उष्णोदक’, याला औषधाप्रमाणे महत्त्व दिलेले आहे. पाणी गरम करताना पाण्यावर अग्नीचा संस्कार होतो. त्यामुळे गरम पाणी हे साध्या पाण्यापेक्षा पचायला हलके होते, पण ते गुणाने उष्ण असते. गरम पाणी विशिष्ट आजारांमध्ये शरीरासाठी अत्यंत उपकारक ठरते.

१. गरम  पाणी  गुणाने  उष्ण असल्यामुळे  वाताचे  अनुलोमन (उत्सर्जन) करते. कफ, वात हे दोन्ही दोष थंड गुणाचे असल्यामुळे हे दोष शरीरात वाढले असता गरम पाणी प्यावे. सामान्य भाषेत सर्दी, नाक चोंदणे, खोकला, घसा दुखणे, दम लागणे यांसारख्या कफ-वातज विकारात गरम पाणी प्यायल्यामुळे कफ पातळ होतो, सहजपणे बाहेर पडतो व नाक, छाती, घसा मोकळा होतो.

२. पोटफुगी, पोट दुखणे, अजीर्ण, आमदोष यांसारख्या पोटाच्या विकारात लंघन (पूर्ण उपवास किंवा भाताची पेज, लाह्या, मऊ भात असा अत्यंत हलका आहार) करून थोडे थोडे गरम पाणी पीत राहावे. यामुळे न पचलेले अन्न पचते, अजीर्ण मोडते, आमदोष दूर होतो. हळूहळू भूक सुधारते व अन्नाचे नीट पचन होऊ लागते.

३. गरम पाणी थंड करून प्यायल्यास त्याला ‘क्वथित शीत जल’ म्हटले जाते. असे पाणी पचायला हलके, पण गुणाने शीत असते.

पाण्यामध्ये काही औषधे घालून उकळल्यास त्याला ‘सिद्ध जल’ असे म्हटले जाते. जेव्हा ज्वर म्हणजे ताप येतो, तेव्हा आयुर्वेदाच्या सिद्धांतानुसार रुग्णाचा अग्नी मंद झालेला असतो. अशा वेळी सुंठ, नागरमोथा, पित्तपापडा, वाळा, चंदन ही वनौषधे घालून उकळून व गाळून घेतलेले पाणी थोडे थोडे पीत राहिल्यास ताप लवकर उतरतो. या पाण्याला ‘षडंगोदक’ असे म्हटले आहे. अर्थात, तापाच्या रुग्णाने या अवस्थेत ‘लंघन’ करणे अपेक्षित आहे.

गरम पाण्याबद्दलचे गैरसमज:

१. भरपूर पाणी प्यायल्यामुळे शरीरातील विषद्रव्ये निघून जातात व शरीर ‘डिटॉक्स’ होते, अशा प्रकारचा गैरप्रचार हल्ली सर्वत्र पसरलेला आहे.सकाळी प्यायलेल्या गरम पाण्यामुळे पोट साफ होते, असा बऱ्याच लोकांचा गैरसमज असतो. त्यामुळे सकाळी उठून  सरसकट गरम पाणी पिण्याची चुकीची सवय अनेकांना जडलेली दिसते. या सवयीमध्ये जबरदस्तीने मलवेग निर्माण केला जातो. खरे तर हा योग्य उपाय नाही. सकाळी सहज मलप्रवृत्ती होण्यासाठी संध्याकाळी लवकर जेवणे आणि आहारात तेल, तूप यांसारख्या स्निग्ध पदार्थांचा पुरेसा समावेश करणे आवश्यक आहे.

२. सामान्यपणे स्थूल लोक वजन कमी करण्यासाठी गरम पाण्यात मध घालून पितात. परंतु गरम पाणी आणि मध हा विरुद्ध आहार आहे. मध हा कधीही गरम पदार्थाबरोबर घेऊ नये किंवा गरम करून खाऊ नये. त्यामुळे शरीरात एक प्रकारचे विष तयार होते. स्थूल व्यक्तींनी मध घ्यायचे झाल्यास ते साध्या पाण्यातून घेण्यास हरकत नाही.

गरम पाणी: बाह्योपचार पद्धती

१. गरम पाण्याचा शेक हाही अनेक रोगांमध्ये उपयुक्त ठरतो. कोणत्याही अवयवाला मार लागल्यामुळे किंवा मुरगळल्यामुळे सूज आलेली असल्यास किंवा तेथे जखम झालेली नसल्यास, मीठ घातलेल्या गरम पाण्यात तो भाग बुडवून ठेवावा. त्यामुळे सूज लगेच उतरते, वेदना कमी होऊन आराम पडतो.

२. गरम पाणी रबरी पिशवीमध्ये भरून शेक घेतल्यास शरीरात कुठल्याही ठिकाणी वेदना, जखडलेपणा असल्यास दूर होतो. कंबरदुखी, मुतखड्यामुळे कुशीत होणारी वेदना, लघवी अडणे, मूळव्याधीमुळे गुदभागी होणाऱ्या वेदना यामध्ये गरम पाण्याच्या टबमध्ये बसून घेतलेल्या शेकाने त्वरित आराम पडतो.

३. नाक चोंदलेले असेल किंवा श्वास घ्यायला त्रास होत असल्यास गरम पाण्यात निलगिरी, कापूर यासारखी औषधे घालून वाफ घेतल्यास त्वरित आराम पडतो.

गरम पाणी कधी पिऊ नये?

खूप  उन्हाळा  असताना  पित्त प्रकृतीच्या व्यक्तींनी, उन्हात फिरणाऱ्यांनी किंवा अग्नीजवळ काम करणाऱ्या लोकांनी, ज्या रोगांमध्ये पित्त वाढलेले असते अशा गळवे, नागीण, कावीळ, रक्तस्राव होणे इ. रोगांमध्ये गरम पाण्याचे सेवन त्रासदायक ठरू शकते. अशा वेळी धणे घालून उकळून, थंड केलेले पाणी घ्यावे.

पाणी म्हणजे जीवन. पाणी हे आहारातले द्रव्य तर आहेच, पण ते औषधही आहे. आयुर्वेदानुसार कोणत्याही पदार्थाचे सेवन करण्यापूर्वी, त्याची त्या-त्या वेळी शरीराला खरेच गरज आहे का, ते सेवन करणाऱ्या व्यक्तीची प्रकृती, त्या वेळचे वय, राहण्याचे ठिकाण, कामाचे स्वरूप, ऋतू या सर्वांचा विचार करावा लागतो. कोणताही पदार्थ योग्य प्रकारे सेवन केल्यास अमृत ठरतो, तर अयोग्य पद्धतीने घेतल्यास विषही ठरू शकतो. हा सामान्य नियम गरम पाणी पितानाही लागू पडतो, हे लक्षात घ्यायला हवे.

अजुन काही महत्त्वाचे लेख वाचण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.


वैद्य उर्मिला पिटकर (लेखिका अनुभवी आयुर्वेद पंचकर्म व योगचिकित्सक आहेत.)

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.