उपवास | fasting

उपवास: शाश्वत आनंदाचा शोध | सचिन परब | Fasting: The Search for Eternal Happiness | Sachin Parab

उपवास: शाश्वत आनंदाचा शोध

‘बायांनो, उपवास नेहमीच टाळा, निदान गरोदरपणात तरी टाळाच,’ अशी सूचना डॉक्टरांच्या ओपीडीबाहेरच्या इलेक्ट्रॉनिक डिस्प्ले बोर्डवर वाचून माझ्या शेजारच्या काकूंना धक्का बसला होता. कारण कळायला लागल्यापासून उपवास करण्याचे संस्कार मनावर बिंबवलेले असतात. या संस्कारांना प्रश्न विचारण्यासाठी डॉक्टरांची ही सूचना उपयोगी ठरली तर खरा उपवास घडू शकतो. कारण कोणताही विचार न करता स्वीकारलेल्या धारणांना प्रश्न विचारणे आपल्याला स्वतःच्याच अधिकाधिक जवळ घेऊन जाते.

उप म्हणजे जवळ आणि वास म्हणजे राहणे. उपवास म्हणजे जवळ राहणे. आता कोणाच्या जवळ राहायचे? तर या प्रश्नाचे आपल्या परंपरेने दिलेले उत्तर म्हणजे, देवाच्या जवळ राहायचे. म्हणजे त्याची पूजा करायची. पूजा कशी करायची? जगद्गुरू संत तुकाराम महाराज सांगतात, ‘कोणाही जीवाचा न घडो मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनाचे.’ देवाच्या पूजेचे सार एकच आहे, कुणाचाही मत्सर करू नये. मत्सर, ईर्ष्या, द्वेष तुलनेतून येतात. ही तुलना संपवायला हवी, म्हणजे पूजा होऊ शकेल. पण तुलनेची सवय झालेली असते. आपल्याशिवाय दुसरे कुणीही असले तर आपण तुलना करतोच. त्यासाठी देव आहे.देव सोबत असेल, तरच तुलना उरत नाही आणि मत्सरही. मत्सर आहे तर देव नाही. देव आहे तर मत्सर नाही. जे मत्सराचे तेच काम, क्रोध, लोभ, मोह, मद या सगळ्या सहा दोस्तांचेही. या सहा जणांना दूर ठेवण्यासाठीचे प्रयत्न म्हणजे खरी पूजा. तोच तर उपवास!

काळोखाला घमेल्यात भरून फेकल्यावर उजेड येत नसतो. दिवा पेटला, प्रकाश आला की काळोख निघून जातो. अवगुणांना दूर सारायचे तर सद्गुण जवळ आणावे लागतात. सॉक्रेटिस म्हणतो, ‘व्हर्च्यू इज नॉलेज.’ सद्गुण म्हणजेच ज्ञान. ‘नॉलेज इज व्हर्च्यू’ असेच आपल्याला वाटत असते. अनेक गोष्टींची माहिती असणे हा आपल्याला सद्गुण वाटतो, पण सॉक्रेटिस बरोबर त्याच्या उलट सांगतो. एखादा सद्गुण आपल्या जीवनात उतरला तरच त्याला ज्ञान म्हणता येईल. नाहीतर त्याच्या पुस्तकी माहितीला काहीच अर्थ नाही. ज्ञानेश्वरीतल्या ओव्यांवर पीएच. डी. केली असेल किंवा रसाळ प्रवचने झोडता येतात, म्हणून ज्ञानेश्वरी कळतेच असे नाही. त्यासाठी ज्ञानेश्वरीच्या विचारांना जगण्याचा भाग बनवावा लागतो.

चांगल्या विचारांच्या सोबत राहिले, चांगले ऐकले, वाचले, बोलले, बघितले तर वाईट विचार निघून जातात. त्याची सवय लागण्यासाठी ठरावीक वेळ काढावा लागतो. तो दिवस उपवासाचा, देवाच्या जवळ राहण्याचा! विनोबा सांगतात, अकराव्या इंद्रियासाठी दिलेला वेळ तो एकादशी. पाच ज्ञानेंद्रिये, पाच कमेंद्रिये आणि अकरावे इंद्र्रिय ते मन. विनोबा सांगतात, तसे मोक्ष म्हणजे ‘मो’हाचा ‘क्ष’ण टाळणे. त्याचा सराव उपवासाच्या दिवशी करायचा असतो. त्यासाठी वेळ काढता यावा, म्हणून जेवण बनवायला काट द्यायची आणि कच्चे खावे, अशी उपवासाला सुरुवात झाली असावी.मराठी संस्कृतिकोश सांगतो, की एखाद्या दुष्काळात अन्न मिळत नसल्यामुळे उपाशी राहण्याला धार्मिकतेचा मुलामा चढला असावा. पण आपल्यासाठी उपवास म्हणजे फक्त उपाशी राहणे उरले आहे. एकादशी आणि दुप्पट खाशी, हे वास्तव आपण सगळ्यांनी स्वीकारले आहे. लहानपणापासून करतोय, गुरुजींनी सांगितले, शास्त्रात लिहिले आहे किंवा काहीतरी हवे, म्हणून उपवासाची व्रते केली जातात. त्यात ना प्रेम असते ना भक्ती. यादवांच्या काळात हेमाद्रीने हजारो व्रतांची माहिती देणारा ‘चतुर्वर्ग चिंतामणि’ हा ग्रंथ लिहिला होता. यादवकाळात महाराष्ट्र रसातळाला गेला, असे इतिहास सांगतो.आजही मार्गशीर्षातल्या गुरुवारांचे व्रत स्वातंत्र्यानंतर जन्माला घातले गेले आहे, हे लक्षात न घेता आपण घरोघर उपवास करतोच आहोत ना? धर्म म्हटले की फारतर डोळेच मिटायचे असतात, डोके नाही. ते लक्षात न आल्याने आपला खरा उपवास होतच नाही.

पांडुरंगशास्त्री आठवले सांगतात, ‘‘उपवास म्हणजे फक्त जेवणातला बदल नाही, तर विचारांमधला बदल.’’
उपवासाला सुरण का चालतो आणि दुधी का चालत नाही, अशा फुटकळ गोष्टींवर आपल्याकडे धर्मशास्त्री म्हणवणाऱ्यांनी ग्रंथांमधे वाद घातलेत आणि चर्चांचा कीस पाडलाय. त्यापेक्षा महत्त्वाचे विषय नव्हतेच का? त्यामुळेच आज आपण साबुदाणा, बटाटा आणि हिरवी मिरची या पोर्तुगिजांनी भारतात आणलेल्या उपवासाच्या पदार्थांपर्यंत पोहोचलो आहोत. आयुर्वेदाने सांगितलेले लंघन किंवा आज चर्चेत असणारे इंटरमिटंट फास्टिंग पचनक्रियेच्या स्वास्थ्यासाठी चांगलेच आहे. पण ते सगळ्यांसाठी नाही. जेवण टाळून तब्येती बिघडवण्यापेक्षा वाङ्भटाने दिलेला ‘हित भुक, मित भुक, ऋत भुक’ हा मंत्र महत्त्वाचा आहे. सकस खा, मर्यादेत खा, समतोल खा. कसे खायचे हे कळले, तर अन्नाविषयीचा उपवासही रोजच असणार आहे. अर्थात, उपवासाचे हे सारे तत्त्वज्ञान भरल्या पोटांसाठी आहे. प्रत्येक भुकेल्याच्या मुखी अन्न पोहचवणारा धर्मच उपवासाच्या धर्मापेक्षा मोठा असतो, हे अधोरेखित करणाऱ्या बुद्धांपासून विवेकानंदांपर्यंत आणि कबिरांपासून गाडगेबाबांपर्यंत महात्म्यांचा वारसा उपवासाला व्यापक बनवून जातो.

म्हणून उपवासाला स्वातंत्र्यलढ्याचा भाग बनवणाऱ्या महात्मा गांधींची आठवण ठेवावी लागते. प्रायश्चित्ताचा आणि आत्मक्लेशाचा भाग म्हणून उपवास करण्याची परंपरा गौतमांच्या सूत्रांपासून जैन धर्मापर्यंत होतीच. त्याचा विस्तार गांधीजींच्या एकादश व्रतात आहे. त्यांनी ती स्वतःसाठी आणि स्वतःच्या सहकाऱ्यांसाठी बनवलेली आचारसंहिता होती. त्यातून असहकाराचे आंदोलन उभे राहिले. परदेशी आणि सरकारी गोष्टींचा त्याग हा उपवासच होता. त्यांच्या अन्नत्यागाच्या उपवासांतून देशाने अस्पृश्यता संपवण्याचा अजेंडा स्वीकारला. जात-धर्म विसरून साधी साधी माणसे स्वातंत्र्यलढ्यात उतरली. एका अर्थाने गांधीजींच्या उपवासाने नव्या देशाची पायाभरणी केली. त्यामुळे आजही उपवास हा जगभर व्यवस्थेविरुद्ध लढण्याचे हत्यार बनलेला आहेच.

गांधीजींनी उपवासाचा अर्थच बदलला, तेच आपण आपल्या जगण्यातही घडवू शकतो. आपल्याला नवे उपवास तयार करावे लागतील. आज तांदूळ आणि गहू न खाण्याचा उपवास करण्यापेक्षा मोबाइलचा मोह टाळण्याचा उपवास जास्त गरजेचा बनलेला आहे. हे ‘डिजिटल डिटॉक्स’ समजल्यामुळेच काही गावांनी रोज संध्याकाळी टीव्ही आणि मोबाइल बंद ठेवण्याचा सामुदायिक निर्णय घेतला आहे. बिनडोक रिल्समधे आणि सोशल मीडियाच्या धांगडधिंग्यात आनंद आहे, म्हणून तर आपण त्यात गुंतून पडतो. पण त्यापेक्षाही मोठा आनंद मोबाइलवरील एखादे पुस्तक वाचण्यात-ऐकण्यात किंवा दर्जेदार डॉक्युमेंटरी बघण्यात आहे. त्यातला आनंद दीर्घकाळ टिकणारा आहे, द्विगुणित होणारा आहे. माणूस म्हणून समृद्ध करणारा आहे. फुटकळ आनंदाच्या प्रेरणेचा त्याग करून शाश्वत आनंदाच्या प्रेरणेपर्यंत पोहचण्यासाठी वेळ काढावा लागतोच. उपवास त्यासाठीच तर आहे..!

अजुन काही महत्त्वाचे लेख वाचण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.


सचिन परब

(लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत.)

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.