fbpx
child development

उमलत्या कळ्यांचे भावविश्व | डॉ. विकास देशमुख | Emotional World of Growing Buds | Dr. Vikas Deshmukh

उमलत्या कळ्यांचे भावविश्व

‘‘अनयचे वागणे बिलकुल चांगले नाही. तो शाळेत सतत गैरहजर असतो, विद्यार्थ्यांसोबत मारामारी करणे, शिव्या देणे, शिक्षकांशी उद्धटपणे बोलणे अशा तक्रारी वाढल्या आहेत. तो काही व्यसन करतो का?’’ अशी शंका अनयच्या वर्गशिक्षिका देशपांडे मॅडम यांनी त्याच्या पालकांकडे व्यक्त केली.ओपन हाऊससाठी शाळेत गेलेल्या अनयच्या आईवडिलांना शिक्षकांनी व्यक्त केलेली शंका आणि त्याची मार्कलिस्ट पाहून धक्काच बसला.लहानपणी अतिशय हुशार आणि शांत असणारा अनय  नववीत आल्यापासून असा का वागतोय? शाळेतून घरी आल्यापासून अनयच्या आईवडिलांमध्ये अनय कोणामुळे बिघडला याच गोष्टीवरून वाद सुरू होता. ‘‘घरात सतत टीव्ही सुरू असतो… तू नुसती मोबाइलमध्ये गुंग असते…’’ ‘‘तुम्ही मुलाला वेळच देत नाही…’’ असे आरोप-प्रत्यारोप सुरू झाले. अनयसारखी मुले आणि त्याच्या वागण्यावरून पालकांमध्ये सुरू असलेले वाद असे प्रसंग घराघरांमध्ये पाहायला मिळतात. असे का होत असेल? यामागचे एक कारण म्हणजे मुलांचे वयात येणे. पण वयात आल्यावर मुलांमुलीमध्ये नेमके असे काय बदल होतात?

मुले वयात कधी येतात?

सर्वसाधारणपणे मुलींसाठी हा काळ १० ते १६ वर्ष आणि मुलांसाठी हा काळ १२ ते १८ वर्षांपर्यंत मानला जातो. यात एक-दोन वर्षे मागेपुढे होऊ शकतात. या वयात मुलांमध्ये शारीरिक आणि मानसिक बदल होत असतात. मुलांचा आवाज घोगरा होणे, स्नायू बळकट होणे, मुलींच्या स्तनांची वाढ होणे, मासिक पाळी सुरू होणे, लैंगिक इच्छा निर्माण होणे असे शारीरिक बदल घडतात. तर दुसरीकडे मानसिक पातळीवर ही मुले अस्वस्थ असतात. या वयात मुले थोडी चिडचिडी होतात, स्वतःच्या दिसण्यावर जरा जास्तच लक्ष देतात, आयुष्य हे आपल्याभोवतीच फिरते असे त्यांना वाटू लागते. सर्व लोकांचे लक्ष आपल्या वागण्यावर, आपल्या दिसण्यावरच आहे असे त्यांना वाटत राहते. कौटुंबिक नात्यांपेक्षा मित्रमैत्रिणींचे नाते, समवयस्क मुलांमधील आपले स्थान जास्त महत्त्वाचे वाटते. पालकांनी सांगितलेल्या गोष्टी या वयातील मुलांना सहज पटत नाहीत. शरीरात सतत होणाऱ्या बदलांमुळे काळजी, चिडचिडेपणा, चिंता वाढते. कधीकधी मुले उदास-उदास राहतात. या वयातील सर्वात गंभीर समस्या म्हणजे नैराश्य, चिंता किंवा मुले अमली पदार्थांच्या आहारी जाण्याची भीती होय!

बदलाची कारणे

आयुष्यात कुठलाही बदल म्हटले, की आपल्याला त्याच्याशी जुळवून घेणे अवघड जाते. घर किंवा कामाची जागा बदलल्याने आपल्याला जसा त्रास होतो, तशीच काहीशी स्थिती किशोरवयीन अवस्थेमध्ये सतत होणाऱ्या बदलांमुळे होते. या बदलांशी जुळवून घेणे मुलांना कठीण होते. हे वय म्हणजे एका लहान मुलाचा पौगंडावस्थेपर्यंत होणारा प्रवास असतो. काही मुलांचा हा प्रवास सुखदायक होतो, तर काही मुलांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. मुले आपल्या आईवडिलांच्या वागण्या-बोलण्यातून अनेक गोष्टी शिकतात. पण समाजामध्ये वावरण्यासाठी मित्रमैत्रिणी आणि बाहेरच्या लोकांशी जुळवून घेण्याची कला अवगत होणे महत्त्वाची असते.

या वयात मुले कुटुंबातील व्यक्तीकडे दुर्लक्ष करून मित्र-मैत्रिणींना, बाहेरच्या लोकांना जास्त महत्त्व देतात. मुळात या वयात आपल्या मेंदूचा भावना नियंत्रण करणारा भाग (Amygdala) पूर्णपणे विकसित झालेला असतो. तर सारासार विचार करणारा भाग (prefrontal cortex) विकसित होत असतो. त्यामुळे या वयामध्ये सारासार विचार न करता भावनाप्रधान होऊन निर्णय घेतलेले दिसतात. आपण आपल्या आयुष्यात मागे वळून पाहिले तर आपल्या लक्षात येईल, की सर्वाधिक चुकीचे निर्णय आपण याच वयात घेतलेले असतात. आपल्या आयुष्यातले सर्वात महत्त्वाचे निर्णय जसे करिअरची निवड, आयुष्यभर साथ देतील असे मित्रमैत्रिणी बनवणे हे ह्याच वयात घ्यायला लागतात. या वयात आपला मेंदू पूर्णपणे विकसित झालेला नसतो,याचा तणाव या वयातल्या मुलांवर पाहायला मिळतो. असे म्हणतात, Adolescent is a age of both disorentation and discovery.

कसा साधावा मुलांशी संवाद?

अनेक पालकांसमोर सर्वात मोठा प्रश्न असतो पौगंडावस्थेतील मुलांशी संवाद कसा साधावा? बऱ्याच वेळेस पालकांना स्वानुभवावरून आपल्या मुलांच्या चुका पटकन लक्षात येतात आणि ते त्यांना मार्गदर्शन करायला जातात, तिथेच मोठा घोटाळा होतो. पालकांनी मुलांना ऐकून घेण्याची सवय लावावी. ‘ज्ञान नाही ध्यान दो’ हे सूत्र पाळावे. मुलांच्या समस्या स्वतः न सोडवता त्यांना स्वावलंबी होण्यासाठी धडपडू द्या. मुलांनी मदत मागितली, तर त्यांना उपदेश न देता, त्यांच्यासमोर आपले मत मांडा. तुम्हाला ऐनवेळी काही सुचत नसेल तर मी एक-दोन दिवस विचार करतो, तूही कर. आपण दोघे चर्चा करून निर्णय घेऊ या, असे सांगून थोडा वेळ घ्या. त्यांच्या दैनंदिन जीवनात ढवळाढवळ न करता त्यांच्याशी संवाद साधून गोष्टी जाणून घ्या.

अमली पदार्थांचे सेवन, धूम्रपान, मद्यपान, लैंगिक शिक्षण या विषयावर बोलण्यासाठी चित्रपटातील काही दृश्य, वर्तमानपत्रातील काही जाहिराती, बातमी यांची मदत घ्या. मुलांची त्या-त्या विषयाबाबतची मते जाणून घ्या. तर दुसरीकडे तुमची मते शास्त्रशुद्ध पद्धतीने मुलांसमोर मांडा. काही वेळा मुले चिडचिड करतील, आपल्याला दूषणे देतील या गोष्टी मनाला लावून न घेता त्यामागे वरील कारणे आहेत, हे लक्षात ठेवा. अशा प्रसंगी मुलांना उत्तर देताना न चिडता, न घाबरता, खंबीरपणे उत्तर द्या. मुले ऐकण्याच्या मनस्थितीत नसतील तर ‘‘आता आपण बोलून काही उपयोग नाही, तुझे मन शांत होईल तेव्हा आपण या गोष्टीवर चर्चा करू,’’ असे सांगून त्याला आणि स्वतःला शांत होण्यासाठी वेळ द्या‌.

मुले घडवण्याचे काम फक्त आईवडीलच करत नसतात. तर कुटुंब, शाळा, मित्रपरिवार, समाज यांच्यामुळे मुलांची जडणघडण होत असते. मुलांचा स्वतःचा स्वभाव, आवडनिवड या गोष्टीसुद्धा खूप महत्त्वाची भूमिका निभावतात. या सर्वांचा विचार करून आपण फक्त  त्यांना योग्य दिशा दाखवली पाहिजे, मार्गदर्शन केले पाहिजे.

मती म्हणजे बुद्धी, ती दैवी असते. पण त्याला गती देण्याचे काम आपण करू शकतो. मुलांच्या भावनिक आणि सामाजिक बुद्धिमत्तेचा विकास करणे गरजेचे आहे. मुलांच्या फक्त हुशारीकडे न पाहता चातुर्य आणि शहाणपणाही त्यांच्या अंगी कसा बाणवावा, याचा विचार केला पाहिजे. मुलांना ‘ढ’  किंवा ‘हुशार’ असे लेबल लावणे थांबवले पाहिजे. तर दुसरीकडे सुजाण बनून पालकत्वाचा आनंद लुटला पाहिजे.

* या वयात काही मुलांना सतत उदास राहणे, चिडचिड करणे, झोप आणि भूक कमी-जास्त होणे, अभ्यासात आणि खेळण्यात मन न लागणे, सतत कोणाला तरी दोष देणे, भविष्याची अतिचिंता वाटत राहणे, आत्महत्येचे विचार मनात येणे, अशा समस्यांना तोंड द्यावे लागते. तर काही मुलांना अमली पदार्थांचे सेवन, मद्यपान, धूम्रपान अशी व्यसने लागू शकतात. आपल्या मुलांमध्ये अशी लक्षणे आढळल्यास तत्काळ मनोविकारतज्ज्ञाचा सल्ला घ्यावा. गंभीर समस्या काळाप्रमाणे आपोआप ठीक होतील, अशा अपेक्षा ठेवणे चुकीचे ठरेल.

* या वयात मुलांना लैंगिक शिक्षण देणे हे सुद्धा महत्त्वाचे आहे. आपण या विषयावर बोललो तर मुले बिघडतील, अशी भीती काही पालकांमध्ये असते.पण, तुम्ही सांगितले नाही तरी मुले याविषयी कुठून ना कुठून तरी जाणून घेतील. हे टाळण्यासाठी वयात येताना मुलांमध्ये होणारे शारीरिक बदल, भिन्न लिंगाचे वाटणारे आकर्षण, हस्तमैथुन, सुरक्षित जीवनासंबंधीचे प्रकार, शरीरसंबंधातून पसरणारे आजार, मासिक पाळीच्या काळी घ्यावयाची काळजी या सगळ्यांविषयी डॉक्टरांकडून शास्त्रीय माहिती मिळू शकते. ही माहिती मुलांपर्यंत पोहोचवण्याचे काम पालकांनी करावे.


– डॉ. विकास देशमुख

(लेखक अनुभवी मानसोपचारतज्ज्ञ आहेत.)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.