सॅनिटायझर | hand sanitizer | sanitiser | alcohol based hand sanitizer | alcohol based sanitizer | alcohol free sanitizer | clean your hands | overuse of hand sanitizer

सॅनिटायझरचा अतिवापर करताय…? | मिताली तवसाळकर | Excessive use of Sanitizer’s…? | Mitali Tavasalkar

सॅनिटायझर चा अतिवापर करताय

जगभरात पसरलेल्या कोरोनाच्या महामारीच्या काळात स्वच्छतेचे महत्त्व आपल्या सगळ्यांनाच कळून चुकले. या विषाणूपासून बचाव करण्यासाठी जागतिक आरोग्य संघटना आणि आपल्याकडील आरोग्य खात्याने सॅनिटायझरचा व हँडवॉशचा वापर करण्याची सूचना केली आणि आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यात एकाएकी या दोन गोष्टींना महत्त्व प्राप्त झाले. कार्यालये, घरांमध्ये, दुकानात अशा सगळ्याच ठिकाणी हँडवॉश आणि सॅनिटायझर ठेवले जात आहेत. प्रवासातही सॅनिटायझरचा वापर करण्याचे प्रमाण प्रचंड वाढले. काही लोक तर भीतीपोटी सतत हँडवॉश आणि सॅनिटायझरने हात स्वच्छ करत असतात. पण असा हँडवॉश आणि सॅनिटायझरचा सतत वापर इतर आजारांना आमंत्रण देणारा ठरू शकतो. सारखे हात धुत राहिल्यास हाताच्या त्वचेतील नैसर्गिक मॉइश्चरायजर निघून जाते. सॅनिटायझरचा वापर त्वचेला कोरडेपणा न देता ओलावा मिळवून देत असले तरी त्याच्या अतिवापराने त्वचेला नुकसान पोहचू शकते, असा  इशारा केंद्रीय आरोग्य विभागाने दिला आहे.

हँडवॉश, सॅनिटायझर हे इथाइल अल्कोहोलपासून तयार केले जाते, जे अँटीसेप्टिकप्रमाणे काम करते. यात पाणी, सुगंध आणि ग्लिसरीन असते. तर अल्कोहोल नसलेले सॅनिटायझर अँटीबायोटिक ट्रायक्लोजन किंवा ट्रायक्लो कार्बनपासून तयार केले जाते, जे साबण आणि टूथपेस्टमध्ये आढळते.त्यामुळे त्याचा अतिवापर केल्याने त्वचेच्या समस्या उद्भवू शकतात. सॅनिटायझरच्या अतिरेकी वापराने त्वचेला स्वस्थ ठेवणारे चांगले विषाणूही मरतात आणि मग हातावर फोड उद्भवतात. तसेच आपली रोगप्रतिकारकशक्तीही कमी होते.

कधी वापरावे सॅनिटायझर?

सर्दी, खोकला असलेली व्यक्ती संपर्कात आल्यास किंवा अशा व्यक्तींचे सामान उचलल्यास तसेच गर्दीत एखादी अशी संशयित व्यक्ती दिसल्यास तुम्ही सॅनिटायझर वापरू शकता. जेणेकरून खोकल्यानंतर आणि शिंकल्यानंतर उडणारे थेंब तुमच्या हातामार्फत तुमच्या शरीरात जाणार नाहीत. शिवाय जेवणाच्या आधी आणि जेवणानंतरही तुम्ही याचा वापर करू शकता.

साबण आणि पाण्याचा पर्याय जिथे उपलब्ध नाही, केवळ त्याच ठिकाणी सॅनिटायझरचा वापर करावा अन्यथा साबणाने स्वच्छ हात धुतले तरी पुरेसे असते.

सॅनिटायझरच्या अतिरेकी वापराचे दुष्परिणाम:

१. हात कोरडे पडतात: यातील अल्कोहोल हातावरची त्वचा पूर्णतः कोरडी करून टाकते. परिणामी, हाताला खाज सुटणे, त्वचा लाल होणे यांसारखे त्रास उद्भवतात. शिवाय, एक्झिमासारखे त्वचेचे आजारही होऊ शकतात. अशा वेळी लोकांनी हाताला मॉइश्चरायजर लावावे तसेच अल्कोहोलमुक्त सॅनिटायझर वापरणे फायद्याचे ठरू शकते.

२. सगळेच विषाणू सॅनिटायझर्सने मरत नाहीत.

३. आग लागण्याचा धोकाः सॅनिटायझरमध्ये असलेला अल्कोहोल हा ज्वलनशील द्रव पदार्थ असतो. त्यामुळे त्याचा आगीशी संपर्क आल्यास तो पेट घेऊ शकतो.

४. सॅनिटायझरचा वास सतत नाकामध्ये गेल्यामुळे अल्कोहल पॉयजनिंग होऊ शकते. सॅनिटायझरमध्ये भरपूर प्रमाणात इथेनॉल असते. इथेनॉल अधिक वेळेसाठी नाकावाटे शरीरामध्ये जाणे अयोग्य मानले जाते. यामुळे शरीरातील अंतर्गत भागांचे नुकसान होऊ शकते. म्हणून लहान मुलांना हँड सॅनिटायझरपासून दूर ठेवणे गरजेचे असते. पालकांच्या उपस्थितीमध्येच लहान मुलांनी सॅनिटायझर वापरणे योग्य असते. लहान मुलांप्रमाणे मोठ्या माणसांनी देखील हँड सॅनिटायझरपासून लांब राहावे.

सॅनिटायझरपेक्षा साबण बरा:

अमेरिकेच्या सेंटर फॉर डिसीझ कंट्रोल अँड प्रिव्हेंशनने प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार, हात स्वच्छ आणि विषाणूमुक्त करण्यासाठी साबण आणि पाण्याचा वापर अधिक योग्य आहे. कारण, साबणामुळे सर्व प्रकारचे विषाणू, जिवाणू मरतात. सॅनिटायझर सगळ्या जिवाणूंना हातावरून घालवू शकते असे नाही. त्यामुळे वारंवार हात स्वच्छ करण्यासाठी सॅनिटायझरऐवजी साबणाचा वापर योग्य. पण असाच साबण वापरा ज्यामध्ये नैसर्गिक घटक आहेत अथवा साबण ऑरगॅनिक असेल वा साबणावर “moisturizing” अथवा sensitive त्वचा असे लेबल असेल.

हे टाळा:

१. WHO आणि अमेरिकेच्या सेंटर फॉर डिसीझ कंट्रोल अँड प्रिव्हेंशनने सॅनिटायझरमध्ये अल्कोहोलचे प्रमाण किती असावे, याची माहिती दिलेली आहे. कोणत्याही सॅनिटायझरमध्ये अल्कोहोलचे कमीतकमी ६० टक्के, तर जास्तीतजास्त प्रमाण ९५ टक्के प्रमाण असावे. ६० टक्क्यांपेक्षा कमी प्रमाणात अल्कोहोल असलेले सॅनिटायझर्स हे परिणामकारक नसतात.

२. हल्ली बाजारात सेंटेड सॅनिटायझर उपलब्ध आहेत. मात्र अशा सुगंधित सॅनिटायझर्समध्ये रसायनांचे प्रमाण अधिक असते. अल्कोहोल आणि रसायने अशा दोन्हीने युक्त सॅनिटायझरमुळे त्वचेवर परिणाम होऊ शकतो. अशा वेळी अल्कोहोलमुक्त सॅनिटायझर अधिक चांगला पर्याय म्हणता येईल.

३. अमेरिकन सरकारच्या स्नष्ठ्न या संस्थेने दिलेल्या अधिकृत माहितीनुसार, मिथॅनॉलचा वापर जर सॅनिटायझरमध्ये करण्यात आलेला असेल तर ते मानवी त्वचेसाठी, शरीरासाठी घातक ठरू शकते. मिथॅनॉल हा विषारी घटक असून याचा वापर असलेले सॅनिटायझर्स वापरल्यास मळमळ होणे, उलट्या होणे, डोकेदुखी, फिट येणे, काही वेळा कोमात जाणे यांसारख्या गंभीर समस्या उद्भवू शकतात.

४. हाताला जखम झाली असेल, तर सॅनिटायझरने हात स्वच्छ करणे टाळावे. कारण, हातावरच्या जखमेवर सॅनिटायझर लावल्यास हाताची जळजळ होते.

हे करा:

* हँड सॅनिटायझरच्या अतिवापरामुळे त्वचा कोरडी होते. अशा वेळी जेव्हा जेव्हा त्वचेवर कोरडेपणा जाणवेल, तेव्हा तेव्हा तुम्ही हातांना मॉश्चराइज करा.

* पेट्रोलियम जेलीची छोटी डबी सोबत ठेवा. त्वचा कोरडी पडल्यासारखी वाटल्यास त्वरित ही जेली हाताला लावता येईल. यामुळे त्वचेतील ओलावा टिकून राहील.

सॅनिटायझर हा हँडवॉशचा पर्याय नाही:

घरामध्ये साबण, हँडवॉश ही साधने उपलब्ध असतात. सार्वजनिक ठिकाणी या सोयी नसल्यामुळे तात्पुरत्या स्वरूपात कीटाणू नष्ट करण्यासाठी हँड सॅनिटायझरचा वापर करता येईल. परंतु हँड सॅनिटायझरमुळे हात पूर्णपणे स्वच्छ होतीलच असे नाही. काही विशिष्ट गोष्टींना हात लावल्यानंतर हँडवॉश / साबण आणि पाण्यानेच हात धुवावेत. मांस, फळे, भाज्या किंवा सार्वजनिक जागेमध्ये एखाद्या वस्तूला स्पर्श झाल्यास साबणाने हात स्वच्छ करावेत.

घराबाहेर सॅनिटायझर सोबत बाळगावे. बाहेर जरी सॅनिटायझर लावले, तरी घरी आल्यावर साबण आणि पाण्याने हात-पाय-चेहरा धुवावा.सॅनिटायझरमुळे धूळ, घाण साफ होत नाही. घराबाहेर असताना आपल्या चेह‍ऱ्यावर किंवा हातांवर धूळ, धुरळा, आजूबाजूची घाण, मळ, माती चिकटत असते. बरीचशी मंडळी हात स्वच्छ करण्यासाठी सॅनिटायझर वापरतात. परंतु हातांवर धूळ किंवा मातीचे कण असल्यास सॅनिटायझर वापरणे चुकीचे ठरेल. हँड सॅनिटायझर हा हात साफ करणे, जंतूंना नष्ट करणे या कामांमध्ये हँडवॉश आणि पाण्यापेक्षा तुलनेने कमी प्रभावी आहे. तसेच सॅनिटायझरमध्ये अल्कोहल असल्यामुळे धूळ, मातीचे कण आपल्या त्वचेला चिकटण्याची शक्यता अधिक असते. म्हणून नियमितपणे बाहेरून घरी आल्यावर हातपाय साबणाने धुणे आवश्यक आहे.

हे लक्षात ठेवा:

* हँड सॅनिटायझर हा हँड वॉशचा एक तात्पुरता पर्याय आहे. त्यामुळे सॅनिटायझरचा गरजेपेक्षा अधिक वापर करू नये. जेव्हा शक्य होईल, तेव्हा साबण / हँड वॉशचाच वापर करा, सॅनिटायझर कमी वापरा.

* सॅनिटायझरचे सेवन करू नका.

* कामाच्या ठिकाणी रासायनिक द्रव्यांशी तुमचा संपर्क येत असल्यास सॅनिटायझरचा वापर टाळावा.

अजून काही महत्त्वाच्या रेसीपी जाणून घेण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.


मिताली तवसाळकर

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.