योग जीवनाचे सार

पतंजली ऋषींनी प्राचीन काळात का बरे योगासूत्रे लिहिली असतील? तेव्हा तर आजच्या सारखे ताणतणाव नव्हते, चिंता-घोर लागून माणसांची मने पोखरली गेली नव्हती. लोकसंख्येचा स्फोट झालेला नव्हता, माणूस आत्महत्या करीत नव्हता, रस्त्यांवर वाहनांचे अपघात होत नव्हते, माणूस पशू बनला नव्हता, निसर्गाचा ऱ्हास सुरु झाला नव्हता आणि प्रदूषण तर नव्हतेच नव्हते. मग का पतंजली ऋषींनी सखोल योगाभ्यास करुन त्यांची अष्टांगे शोधून काढून ते ज्ञान उदारपणे समाजाला देऊ केले असेल? पुढे येणाऱ्या शतकांसाठी योगाभ्यास उपयुक्त ठरेल हे त्यांनी ओळखले होते का?

जन्माला आलेल्या प्रत्येकाला आयुष्यात कधी ना कधी संघर्ष करावा लागतोच. फक्त आपल्या आयुष्यातील संघर्षाचा अर्थ आपण कसा लावतो यावर सगळे अवलंबून असते.

जसे या विश्वात आपले मन सामावलेले असते तसेच आपल्या मनातही एक विश्व सामावलेले असते. त्यात आनंद, वेदना आणि दुःख या त्रयी ठाण मांडून बसलेल्या असतात. या त्रयीच्या पलीकडे, खोलवर, तळाशी असतो तो परमानंद. जो या त्रयींवर विजय मिळवू शकतो त्याला परमानंद गवसतो. पण त्या अवस्थेला पोहोचण्यासाठी आधी मनातील आंदोलने, वादळे संपुष्टात यावी लागतात. संत ज्ञानेश्वरांनी तर या अवखळ मनाची तुलना माकडाशी केली आहे. माकडाच्या वागण्यातील अनिश्चितता आणि त्याच्या चपळपणामुळे ज्ञानेश्वरांनी मनाला माकडाची उपमा दिली आहे. या वृत्ती, प्रवृत्तींवर विजय मिळविण्यासाठी मनाची एक बैठक लागते… ही बैठक कधी आध्यात्मिक असते तर कधी वैज्ञानिक. पण ती साध्य करण्यासाठी जे शास्त्र सांगितले आहे ते शास्त्र म्हणजे ‘योग’ आता योग हे शास्त्र आहे म्हटल्यावर त्याचे नियम, अटी असणार हे ओघाने आलेच.

पूरक-कुंभक-रेचक

योगाभ्यास करताना पाठीचा कणा ताठ असावा, मान सुव्यवस्थित असावी आणि डोके सरळ उभ्या रेषेत असावे जेणेकरून मन आणि नजर स्थिर करणे सोपे होईल. शरीराची ठेवण योग्य स्थितीत असेल तरच शेवटी श्वासोच्छ्वासावर नियंत्रण ठेवणे सोपे जाते. अर्थात त्यासाठी सर्वसामान्य माणसाला साधना करावी लागते. दोन मज्जासंस्था आपल्या शरीराचा रथ चालवीत असतात. एक ऐच्छिक आणि दुसरी अनैच्छिक. कधी एक उपस्थित असते तर कधी दुसरी. पण श्वासोच्छ्वासाच्या बाबतीत मात्र दोन्ही यंत्रणा कार्यरत असतात. मग तुम्ही जागे असा किंवा झोपेत असा.यंत्रणा अखंड कार्यरत असते. अर्थात यासाठी श्वासोच्छ्वासाची क्रिया ज्या मार्गाने होते ते द्वार ‘अनलॉक’ असले पाहिजे. आपले जर आपल्या श्वासोच्छ्वासावर लक्ष असेल तर त्याचे दुहेरी फायदे होतात. एक म्हणजे मनातील वादळे शांत होण्यास मदत होते आणि दुसरे म्हणजे श्वासोच्छ्वासाची एकसमान गती कायम राखली जाते, ज्याचा संपूर्ण शरीराला फायदा होतो. ‘प्राणायाम’ हा शब्द तुम्ही ऐकला असेलच. प्राणायामात श्वास आत घेण्याला ‘पूरक’, तो कोंडून ठेवणे म्हणजे ‘कुंभक’ व तो हळूहळू सोडणे म्हणजे ‘ रेचक’ क्रिया असे म्हणतात.

सूर्यनमस्कार व आसने

प्राणायामाप्रमाणेच सूर्यनमस्कार आणि आसने या दोन गोष्टी उत्तम जमतात त्याचे आयुष्य सुखकर झालेच म्हणून समजा. योग म्हणजे केवळ उरकून टाकण्याची गोष्ट नाही तर ती एक अनुभूती आहे. शरीरात ताठरपणा आला की आजार मागे लागतात, म्हणून ते लवचिक असणे आणि सतत गतिशील, परिवर्तनशील असणे आवश्यक आहे. सूर्यनमस्कार आणि योगासने ही शरीरातील ताठरपणा कमी करून ते लवचिक राहायला मदत करतात. शरीराचा कोपरा न कोपरा सचेतन होतो. योग ही अनुभवण्याची गोष्ट आहे. मनातील अनावश्यक विचारांना बाहेरचा रस्ता दाखविण्याचे कसब मी या योगाध्यासातूनच आत्मसात करू शकलो. जेव्हा मी प्राणायाम करतो तेव्हा बऱ्याच वेळा मी माझ्याच अवयवांचे अस्तिव विसरून जातो. पाय गुडघ्यात वाकवून पाठीचा कणा ताठ स्थितीत ठेवून प्राणायाम करायला बसतो किंवा मुद्रा करीत असतो तेव्हा बऱ्याच वेळा मला गुडघ्यात दुमडलेल्या पायांचाही विसर पडतो. मी काही योगी नाही किंवा सारी शक्ती एकवटू शकणारा साधक नाही, पण तरीही मी तो अनुभव घेतो. त्यातून मिळणारे समाधान दिवसभराची ऊर्जा देऊन जाते.

ओंकाराचा उच्चार

योग केल्यामुळे चित्त शांत राहते आणि जेव्हा चित्त शांत असते तेव्हा त्याचेही एक वेगळे समाधान आपल्या वागण्या-बोलण्यातून प्रतीत होत असते. अशा वेळी आपण दिवसभरातील कामे, मीटिंग, आव्हाने, धावपळीचे क्षण अधिक चांगल्या प्रकारे पूर्ण करू शकतो-जगू शकतो. योग म्हटला की ‘ओंकार’ आलाच. ओंकाराशिवाय हा विषय पूर्णच होऊ शकत नाही. ‘ अ ‘ आणि ‘ उ या दोन स्वरांपासून आणि त्या दोहोंच्या बरोबर मध्ये येणाऱ्या ‘म’ या व्यंजनापासून तयार झालेला ‘ओंकार’ हा हृदयापासून फुफ्फुसांपर्यंत आणि फुफ्फुसांपासून ते अगदी पोटातील आतड्यांपर्यंत जाऊन पोहोचतो. ओंकाराचा उच्चार केल्याने गळ्यात कंपने निर्माण होतात. रक्तप्रवाह सुरळीत राहतो. ओंकाराचा उच्चार केल्याने पचनशक्ती वाढते. ओंकाराच्या उच्चाराने फुफ्फुसाचे कार्य सुधारते. हे एवढे अफाट सामर्थ्य ओंकाराच्या उच्चारात आहे. बंद सभागृहात जेव्हा ओंकाराचा सामूहिक ध्वनी निघतो तेव्हा तो क्षण सोडून तुम्ही सभागृहातून बाहेर जाऊच शकत नाही, एवढी ताकद या ओंकाराच्या उच्चारांमध्ये आहे. याचा अनुभव तुम्ही घेतलात तर त्याचे महत्त्व तुम्हालादेखील आपोआप जाणवेल.

योगाभ्यास समज गैरसमज

योगाभ्यास किंवा योगासने हे एक शास्त्र आहे. योग आरोग्याचा पुनर्संचय करू शकतो. योगाभ्यासाने चित्त शुद्ध होते, मनःशांती लाभते व त्यामुळे आपली प्रकृती सुधारते हे खरे आहे. पण योग म्हणजे सर्व रोगांवरचे रामबाण औषध नव्हे. योगामुळे आजार पूर्णपणे बरे होतात असे छातीठोकपणे सांगितले जाते तेव्हा वाद निर्माण होतात. पाठीच्या स्नायूंचा बिघडलेला तोल पूर्ववत करून स्नायू आकुंचन पावण्यापासून योगासने त्यांना वाचवू शकतात जेणेकरून पाठीला बाक येणार नाही. कंटाळवाण्या दुखण्यांपासून आपली सुटका करून घेण्यासाठी योग करणे हा एक चांगला पर्याय आहे. पण म्हणून योग करणाऱ्याला वार्धक्य येत नाही असे अजिबात नाही. आयुष्य चांगल्या प्रकारे जगण्याचे एक साधन म्हणून तुम्ही ‘योग’ या विषयाकडे पाहू शकता, कारण त्याचे फायदे असंख्य आहेत हे मात्र निश्चित. आजकाल योगासनाच्या नावाखाली चालणाऱ्या शिकवणी वर्गांमध्ये अनेक वेळा मल्लखांबाचे दोरखंड आणि व्यायामाची इतर नवनवीन उपकरणे वापरली जातात. ती ते का वापरतात याबद्दल माझ्या मनात नेहमी संदेह असतो. पण आपण आपल्या बुद्धीला पटेल तेवढेच या योगाभ्यासातून घ्यावे असे मला वाटते.

(अनुवाद: श्रेयस वैद्य)

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.