शेवगा | best moringa seeds | shevga seeds | drumstick saplings | moringa dried leaves | drumstick tree recipes | moringa leaves recipes | moringa drumstick recipe

अद्भुत ‘शेवगा’| डॉ.वर्षा जोशी | The wonderful ‘Shevaga’ | Dr. Varsha Joshi

अद्भुत शेवगा

साधारणपणे शेवग्याच्या शेंगा आपल्याकडे आमटीत, सांबारात आणि पिठल्यात घातल्या जातात.दक्षिण भारतात आणि कोकणात शेवग्याच्या पाल्याचाही भाजीसाठी उपयोग केला जातो.शेवग्याच्या झाडाचा प्रत्येक भाग हा पोषणमूल्यांनी परिपूर्ण असतो आणि म्हणूनच या झाडाला अद्भुत गुणांनी युक्त झाड असे म्हटले जाते.

शेवग्याच्या पानांमध्ये भरपूर प्रमाणात ‘अ’, ‘क’, ‘ब १’, ‘ब २’, ‘ब ३’, ‘ब ६’ व फोलेट ही जीवनसत्त्वे आणि कॅल्शियम, मॅग्नेशियम, लोह, फॉस्फरस आणि जस्त ही खनिजे भरपूर प्रमाणात असतात.शेवग्याच्या पानांमध्ये भरपूर प्रथिने असतात आणि हेच या हिरव्या भाजीचे वैशिष्ट्य ठरते.कारण इतर सर्व हिरव्या भाज्यांमध्ये प्रथिने अगदी नगण्य असतात.शिवाय प्रथिने ज्यापासून बनतात, त्या अमिनो आम्लांचे १८ प्रकार शेवग्याच्या पानांमध्ये असतात जे आपल्या आरोग्यासाठी हितकारक असतात.

साधारणपणे जखम झाली, संसर्ग झाला किंवा वेदना होऊ लागल्या, की त्याला संरक्षण म्हणून आपले शरीर अंतर्दाह तयार करते.पण कधीकधी आपली जीवनशैली आणि आहाराच्या चुकीच्या पद्धती यामुळे हा अंतर्दाह प्रमाणाबाहेर वाढतो.तसे झाले की संधिवात, कर्करोग अशा अनेक रोगांचा प्रादुर्भाव होऊ लागतो.हा अंतर्दाह कमी करण्याचे काम शेवग्याची पाने करतात.शेवग्याच्या पानांमध्ये ‘क’, ‘इ’ आणि ‘अ’ जीवनसत्त्वांसारखी उच्च अँटीऑक्सिडंट्स भरपूर असतात ज्यामुळे मधुमेह, हृदयविकार, उच्च रक्तदाब यांसारख्या व्याधींना तसेच नेत्ररोगांना प्रतिबंध होतो.या पानांमुळे मेंदूचे कार्य तसेच, स्मरणशक्ती आणि मानसिक संतुलन उत्तम राहण्यास मदत होते.शेवग्याची पाने आहारात ठेवणे हे कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठीही फायदेशीर आहे.या पानांमुळे यकृताचे आणि पोटाच आरोग्य चांगले राहते.त्यातील भरपूर कॅल्शियम आणि फॉस्फरसमुळे दात आणि हाडे मजबूत राहण्यास मदत मिळते.

शेवग्याच्या पानांतील भरपूर प्रथिने, महत्त्वाची जीवनसत्त्वे आणि एकूणच भरपूर पोषणमूल्यांमुळे आयुर्वेदात या पानांचा उपयोग स्तनपान करणाऱ्या मातांसाठी करावा, असे सांगितले आहे.यामुळे स्तनदा मातांना भरपूर दूध येण्यास मदत होते.आई व बाळ दोघांनाही या पानांमुळे फायदा होतो.शेवग्याच्या पानांची पूड सौंदर्यप्रसाधनांमध्ये वापरली जाते, कारण त्यामुळे त्वचा आणि केस यांचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते.‘भावप्रकाश’ (या आयुर्वेदातील मूळ ग्रंथा)मधील संदर्भाप्रमाणे आयुर्वेदात शेवग्याला ‘सिगरू’ म्हणजे बाणा-सारखी वनस्पती असे म्हटले जाते.बाण जसा आपल्या लक्ष्यामध्ये खोलवर जातो, त्याप्रमाणे शेवग्यातील पोषणमूल्ये ऊतींमध्ये (टिश्यूज) खोलवर – अगदी ‘बोनमॅरो’पर्यंत जाऊन विघातक गोष्टींचा निचरा करण्याचे काम करतात.रक्तशुद्धीही करतात. शेवग्यामध्ये कर्बोदके आणि उष्मांक अगदी कमी असतात. म्हणून वजन कमी करणाऱ्या व्यक्तींना शेवगा आहारात ठेवण्याचा फायदा होतो.शेवग्याच्या या सगळ्या गुणधर्मांमुळेच त्याला ‘सुपरफूड’ असे म्हटले जाते.

शेवगा ची पाने घेताना ताजी, हिरवी, कोवळी  बघून घ्यावी. शेवग्याच्या पानांची चव जरा तुरट, कडवट अशी असते.पण डाळींबरोबर, आले, लसूण किंवा इतर मसाले वापरून केली की भाजी चविष्ट लागते.शेवग्याची पाने वापरून सुकी परतून केलेली भाजी, पातळ भाजी, कोथिंबिरीच्या वड्यांप्रमाणे वड्या, भजी, सूप, झुणका, टिकिया, थालीपीठ, पुलाव, पराठे असे बरेच पदार्थ करता येतात.शेवग्याच्या फुलांचीही भाजी केली जाते.

बऱ्याच ठिकाणी शेताच्या बांधावर शेवगा ची झाडे रुजलेली पाहायला मिळतात.कोकणात जन्माष्टमीच्या दिवशी काळ्या वाटण्याची उसळ, आंबोळ्या यांच्या जोडीला शेवग्याच्या पानांची भाजी केली जाते.इतर पालेभाजीसारखीच दिसत असली, तरी चवीला ही भाजी थोडी तुरट, कडवट असते.ही भाजी कशी बनवायची याची पाककृती:

प्रथम शेवग्याचा पाला धुऊन व चिरून घ्या.मग तव्यावर थोडा भाजा. आता तेलावर लसूण व मिरची, कांदा, हिंग, हळद घालून परतून घ्या.वरून शेवग्याचा भाजलेला पाला घाला व थोडा वेळ वाफवून घ्या.मग त्यात मीठ, साखर, खोबरे घालून पुन्हा थोडे परतवा आणि गॅस बंद करा.

इतर पालेभाज्यांप्रमाणे ह्या भाजीतही डाळ घालता येते.ही भाजी उष्ण असल्याने पावसाळ्यात किंवा हिवाळ्यातच खातात.बाळाच्या पाचवीला ही भाजी सटवाईला नैवेद्य म्हणून पानावर दाखविण्याची व हा नैवेद्य बाळाच्या आईने खाण्याची पद्धत अनेक ठिकाणी आहे.

शेवग्याच्या वाळलेल्या पानांची पूड परदेशात वापरली जाते. त्याच्या बियांच्या तेलाचाही उपयोग इलेक्ट्रॉनिक वस्तूंमध्ये, अत्तरात वगैरे केला जातो. ह्या बियांचे चूर्ण पाणी शुद्ध करण्यासाठी वापरले जाते.शेवग्याच्या पानांचा उपयोग पाणी निर्जंतुक करण्यासाठी होतो.म्हणूनच पूर्वी घरामागील विहिरी-जवळ शेवग्याचे झाड लावले जात असे.कारण त्याची पाने विहिरीत पडून पाणी आपोआप शुद्ध होत असते.

शेवग्याच्या वाळलेल्या पानांमध्ये ताज्या पानांपेक्षा अधिक पोषकतत्त्वे असतात.वाळवलेली पाने स्वयंपाकात वापरण्यास अगदी सहज व सोपे जाते.शेवग्याच्या पानांच्या पावडरची कॅप्सूलही आज बाजारात उपलब्ध आहे.शेवग्याच्या शेंगा, पाने, फुले खाण्यासाठी तर झाडाची साल डिंक मिळविण्यासाठी वापरतात.शेवग्याची पाने वाळवून पावडर करून ठेवणे व आहारात वापरणे अधिक सोयीचे आहे.वाळलेल्या पानांची पावडर वर्षभर टिकते.ही पावडर भाजी, वरण, भाकरी, पराठे व सूपमध्ये वापरता येते.

अजुन काही महत्त्वाचे लेख वाचण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.


डॉ. वर्षा जोशी

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.