पोपटाचा डोळा

मन, मनाची शांती, जाणिवा, एकाग्रता या गोष्टींचे मूळ फार जुन्या परंपरांमध्ये हिंदू बौद्ध आणि अगदी प्राचीन चिनी परंपरांमध्येही आढळते. मनावर उठणारे तरंग हा विषय तेव्हापासून हाताळला गेला आहे. मन शांत असणे, जागरूक असणे, सावध असणे याचा अभ्यास प्राचीन काळापासून चालत आलेला आहे. पण हा विषय जेव्हा प्रायोगिक मानसशास्त्राच्या चष्म्यातून बघितला जातो तेव्हा त्यात मनाची किंवा मनाच्या विविध छटांची सांगड अध्यात्माशी कमी आणि एकाग्रतेशी जास्त घातली जाते. मन शांत ठेवणे, कौशल्य आत्मसात करणे, सद्य:स्थितीवर लक्ष केंद्रित करणे आणि विचलित करणाऱ्या गोष्टी मनातून पूर्णपणे काढून टाकणे म्हणजे एकाग्रता. ही एकाग्रता साधली की तुमचे मन योग्य मार्गावरून चालत राहते. विख्यात मानसशास्त्रज्ञ एलेन लॅन्जर यांनी संशोधनातून असे दाखवून दिले होते की, शांतपणे सखोल विचार करण्याची सवय ही प्रौढांमध्ये आकलन क्षमता वाढविण्यास तसेच महत्त्वाच्या जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडण्याची क्षमता विकसित करण्यास हातभार लावते, ज्यामुळे तुमच्या काम करण्याच्या पद्धतीत सुधारणा होऊ शकते.

मन ‘शांत’ करण्याचा सोपा उपाय

मन शांत करण्याचा एक सोपा उपाय म्हणजे आरामशीरपणे बसून श्वास घ्या. श्वासाच्या गतीवर लक्ष केंद्रित करा. श्वास आत घेणे आणि बाहेर सोडणे ही क्रिया नैसर्गिकरीत्या होत असतेच. त्यामुळे आजकाल त्याकडे खास लक्ष द्यायला लोकांना वेळच नसतो. एका ठराविक लयीत श्वास घ्यायला एवढेच नाही तर आजकाल पूर्ण श्वास घ्यायलादेखील आम्ही विसरलो आहोत. काही छोटे छोटे व्यायाम असतात जे आपल्याला एकाग्रता वाढवायला मदत करतात. आपल्याला नेहमी असे वाटत असते की आपले सगळीकडे लक्ष आहे. जसे की, एका वेळी अनेक जबाबदाऱ्या पार पाडणे किंवा एकाचवेळी अमर्याद गोष्टींचा विचार करणे इत्यादी. पण तसे नसते. एका वेळी अनेक जबाबदाऱ्या पार पाडताना मध्येच दुसरी जबाबदारी हाती घेणे किंवा एकावेळी अनेक पातळ्यांवर काम करणे यासाठी कौशल्य लागते. जर आपण नियमित सराव केला आणि हे कौशल्य सावधपणे आणि जाणीवपूर्वक विकसित केले तर आपण जे काही काम करतोय, जो काही विषय निवडला असेल त्यावर लक्ष केंद्रित करणे सहज जमू शकते. पण अर्थात त्यासाठी मल्टीटास्किंगचे कौशल्य आत्मसात करावे लागते.

पोपटाचा डोळा

लहानपणी तुम्ही महाभारतातील अर्जुन आणि पोपटाचा डोळा ही गोष्ट ऐकली असेलच. द्रोणाचार्य जेव्हा अर्जुनाला झाडावर बसलेल्या पोपटाविषयी विचारतात तेव्हा  ‘ पोपटाच्या डोळ्याशिवाय मला दुसरे काहीच दिसत नाही ‘ असे अर्जुन सांगतो. कारण पोपटाचा डोळा हे त्याचे लक्ष्य असते. त्याला आजूबाजूचे काहीच दिसत नाही का? त्याला फक्त तेवढा डोळाच का दिसतो? एकाग्रतेचे हे सर्वात मोठे उदाहरण आहे. एकाग्रता ही केवळ धनुर्धारी योद्ध्यांसाठी किंवा नेमबाजांसाठी नाही तर आज उच्च शिक्षण घेऊन मोठे करिअर करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या प्रत्येकासाठी ही एकाग्रता महत्त्वाची आहे. अचूक करि अर करू इच्छिणाऱ्या ना एकाग्रतेची गरज असते.

एकाग्रता – एक चमत्कार

एकाग्रता सर्वसामान्य लोकांसाठीही चमत्कार करते. मग ही एकाग्रता साधणे कठीण आहे का? मुळीच नाही. मनाची एकाग्रता ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. जेव्हा आपण आपल्या आवडत्या पुस्तकाचे वाचन करीत असतो किं वा टीव्हीवर आवडता कार्यक्रम, आवडती मालिका पाहत असतो तेव्हा काय होते? तुम्हाला आवडणारी एखादी गोष्ट करण्यात तुम्ही गुंतलेले असता त्यावेळी आजूबाजूच्या जगाचाही विसर पडलेला असतो आणि त्या वाचनात, कार्यक्रम बघण्यात किंवा आवडत्या कामात आपण पूर्णपणे तल्लीन झालेले असता. ही एकाग्रता नाही तर दुसरे काय आहे? कोणतेही विशेष प्रयत्न न करताही तुमचे त्याठायी मन एकाग्र झालेले असते आणि तेही अगदी सहज. जेव्हा एखादा उद्देश समोर ठेवून तुम्ही चालत असता तेव्हा त्याचा विचार सतत तुमच्या मनात असतो. झोपेत किंवा तुमच्या नकळतसुद्धा तुम्ही त्याच उद्देशाचा विचार करीत असता. हीसुद्धा त्या उद्देशाच्या प्रती असलेली तुमची एकाग्रताच आहे. मुळात ही खूप नैसर्गिक प्रक्रिया आहे आणि याचा अनुभव तुम्ही अनेकदा घेतला असेल.

एकाग्रता साध्य करणे तेव्हा अवघड होते जेव्हा तुमच्या मनात ढवळाढवळ होत असते किंवा तुमचे मन मागे-पुढे घोटाळत असते. ज्याचे लक्ष सहज विचलित होऊ शकते त्यांना एकाग्रता साधणे कठीण जाते. विशेषतः शालेय दिवसांमध्ये ज्यांनी विशिष्ट कलेची किंवा एखाद्या विषयाची आवड जोपासलेली नसते, विकसित केलेली नसते त्या मुलांमध्ये एकाग्रतेचा अभाव दिसून येतो. अभ्यास करताना मग त्याना एकाग्रतेची उणीव जाणवते, त्यांची एकाग्रता सहज भंग पावते, कारण एकाग्रता त्यांनी अनुभवलेली नसते. एकाग्रता विकसित करण्यासाठी त्यांना प्रशिक्षण आणि सतत प्रेरणा देणे आवश्यक आहे.

एकाग्रता नेमकी कशी विकसित करता येते?

मानवी मन एक जटिल यंत्रणा आहे आणि त्याला ज्यातून आनंद मिळतो ते लगेच करण्याकडे या मनाचा कल असतो. जोपर्यंत मनाला एखाद्या गोष्टीत स्वारस्य वाटणार नाही तोपर्यंत ते सतत आणि सहज दुसऱ्या गोष्टींकडे तुम्हाला वळवत राहील. म्हणूनच अमुक एका विषयात किंवा अभ्यासात स्वारस्य वाटावे यासाठी काही मार्ग शोधावे लागतील आणि आपल्याला आयुष्यात नक्की काय करायला आवडले हे एकदा समजून घ्यावे लागेल. पुढे काही मुद्दे मांडले आहेत ज्यायोगे एकाग्रता वाढवणे तुम्हाला सोपे जाईल –

चिंतन – आधी शरीराला, मग मनाला आणि नंतर दोघांनाही शांत करण्याचा मार्ग म्हणजे चिंतन  (मेडिटेशन) होय. ही सर्वसमावेशक क्रिया आहे. चिंतन केल्याने अस्थिरता कमी होऊन तुम्हाला तुमच्यात स्थैर्य जाणवायला लागेल. मग तुमचे मन प्रगती करू लागेल. त्यासाठी त्याला अधूनमधून शांततेचा अनुभव देणे तुमचे काम आहे. हे काम चिंतनाने साध्य होईल. मग तुमचे मन आणि तुम्ही एकच आहात ही अनुभूती येईल. कधी तुमच्याशी वाद घालणारे तर कधी तुमच्या विरोधात जाणारे तुमचेच मन आता तुम्हाला जिवाभावाच्या मित्रासारखे भासू लागेल. तुम्ही एक होऊन जाल. सततच्या सरावाने तुम्हाला याची सवय होईल आणि तुम्ही शांत व्हाल. मनातील गोंधळ संपेल. आज काय करायचे आहे याविषयी सुस्पष्टता येऊ लागेल. मनाचा कल तुम्हाला निश्चित कळू लागेल आणि जे काम करायचे ठरवले आहे त्यावर लक्ष केंद्रित करायला मन अनुकूलता दर्शवू लागेल.

योगिक प्राणायाम – योग्य श्वास घेणे, श्वासांची लय चांगली असणे ही योग्य विचार करण्याची गुरुकिल्ली आहे असे म्हणतात. आपण जर स्वतःचे निरीक्षण केले तर आपल्या विचारांचा वेग आणि आपल्या श्वासांचा वेग सारखाच असल्याचे जाणवेल. विचारांचा वेग वाढला की श्वासांचा वेग वाढतो आणि त्याकडे लक्ष नाही दिले तर त्यातील लय बिघडते. जेव्हा भीतीचे वातावरण निर्माण होते तेव्हा श्वासांची लय बघा. ती वर-खाली होते आणि आपल्याला निरुत्साही वाटू लागते. विचार विस्कटल्यासारखे होतात. म्हणून आपण पतंजली ऋषींनी अष्टांग योगामध्ये सांगितलेले प्राणायाम जाणून घ्यावे आणि त्यांचे नियमितपणे पालन करावे. श्वास नियंत्रित करणे शिकत असताना तुम्ही विचार नियंत्रित करण्याचे तंत्रही शिकू शकाल.

मुख्य कल्पना ही आहे की, एकाग्रतेची सर्वोत्तम पातळी ही केवळ सरावानेच गाठता येते. आपण पहाटेपासून जे काही करत आहात त्या सर्व गोष्टींवर पूर्णपणे लक्ष केंद्रित करण्याची क्षमता सरावाने अंगी बाणवता येईल. दुर्दम्य इच्छाशक्ती असेल तर सरावाने एकाग्रता साधणे आपल्याला सहज शक्य होईल. असे म्हटले जाते की तुमची एकाग्रतेची पातळी जर उच्च असेल तर आपण एखादे काम अपेक्षित वेळेपेक्षा कमी वेळेत किंवा फक्त अर्ध्या वेळेत पूर्ण करू शकता आणि जर हे आपण करू शकतो तर आपण ते करायला हवे, कारण ‘ वेळ ‘ अमूल्य आहे.

आज, प्रत्येकजण धावपळीचे आयुष्य जगात असतो. कामे वेळेवर पूर्ण करण्यासाठी धडपडत असतो. ही कामे पूर्ण करण्यासाठी आपल्याला एकाग्रतेची चांगली पातळी गाठणे आवश्यक आहे आणि ती नियमित सरावाने आत्मसात करता येते हे आपण वर म्हटलेच आहे. म्हणून आजपासूनच नव्हे तर आतापासून एकाग्रतेचा विकास करा व त्या दिशेने काम करा. मग बघा तुमचा प्रत्येक दिवस समाधान देऊन मावळेल.

One comment

  1. सुवर्णा

    खुप छान माहिती आहे

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.