थेरपी | Group Counseling | Supportive Group Theory | therapy for grief | therapy for young adults | power therapy | power in therapy | power counseling

ग्रुप थेरपी: सिद्धांत शक्तीचा | मनोज अंबिके | Group Therapy: Theory of Power | Manoj Ambike

ग्रुप थेरपी: सिद्धांत शक्तीचा

क्षेत्र कुठलेही असो; सामाजिक असो की राजकीय, वैयक्तिक असो किंवा आध्यात्मिक, यश मिळवायचे असेल आणि ते टिकवायचे असेल, तर व्यवस्थापन हे अत्यंत महत्त्वाचे असते. ज्याला व्यवस्थापनाचे शास्त्र समजले, त्याला यशप्राप्तीचे रहस्य सापडले. यासाठी ‘ग्रुप थेरपी’ म्हणजे काय? त्यात शक्तीचा सिद्धांत कसा काम करतो? आदी गोष्टी समजून घेणे आवश्यक आहे. ‘ग्रुप थेरपी’चा वापर करून तुम्ही तुमच्या वैयक्तिक, कौटुंबिक आणि सामाजिक जीवनालाही सहजतेने आकार देऊ शकता.

शक्ती, ऊर्जा ही कधीही नव्याने निर्माण होत नाही आणि ती संपवताही येत नाही. ती असतेच. फक्त तिचे रूप बदलते,’ हा नियम आपण जाणतो. क्षेत्र कुठलेही असले तरी शक्तीच्या योग्य व्यवस्थापनाने, नियोजनाने ते कसे पादाक्रांत करता येते हे आपण काही उदाहरणांनी समजून घेऊ. समजा तुमच्यासमोर एक कागद आहे, जो उन्हात ठेवलेला आहे. सूर्याची किरणे अनेक दिवस त्याच्यावर पडली तर काय परिणाम होईल? फार फार तर त्याचा रंग थोडासा बदलेल. पण तो कागद व सूर्यकिरणांच्या मध्ये योग्य पद्धतीने भिंग धरल्यास सहजतेने अग्नी उत्पन्न होईल. सूर्याच्या किरणांची ऊर्जा तेवढीच होती, कागदही तोच होता. फक्त दोघांच्या मध्ये भिंग आल्यामुळे ऊर्जा एकत्रित झाली आणि परिणाम बदलला. हाच ‘शक्तीचा सिद्धांत’ ग्रुप थेरपी मध्ये काम करतो. शक्तीचे योग्य नियोजन झाल्याने होणाऱ्या परिणामात फरक पडला. सामाजिक, आध्यात्मिक किंवा कोणत्याही क्षेत्रात ज्यांनी मोठा ठसा उमटवला आहे, त्यांनी हा सिद्धांत जाणला आहे. सर्वसामान्य वाटणारी शक्ती फक्त एका दिशेला एकत्रित केली, तर परिणाम प्रचंड असतो.

सर्वसामान्यांच्या शक्तीचे योग्य नियोजन करून त्याचा उपयोग सकारात्मक किंवा नकारात्मक दोन्ही पद्धतीने होऊ शकतो. पाण्यात किती शक्ती असते, असा प्रश्न विचारला तर अनेकांना काय उत्तर द्यावे हे कळणार नाही. परंतु हेच पाणी जर धरणात साठवले गेले तर संपूर्ण राज्याला पुरेल इतकी वीजनिर्मिती होऊ शकते. इथे शक्ती धरणाच्या भिंतीत आहे की पाण्यात आहे? भिंगात आहे की सूर्यकिरणांत आहे? शक्ती पाण्यात आणि सूर्यकिरणांतच आहे, पण भिंत आणि भिंग त्या शक्तीचे नियंत्रण करतात. ग्रुप थेरपीमध्ये हाच नियम काम करतो. जर शक्तीचे नियंत्रण करण्याचा गुण व्यवस्थापनात असेल, तर परिणाम अचंबित करणारा असतो. सरतेशेवटी योग्य व्यवस्थापनच कामी येते. अग्नी नियंत्रित असेल, तर त्याद्वारे एखादे यान अंतराळात पाठवता येऊ शकते. परंतु त्याच अग्नीचा नकारात्मक वापर विध्वंस घडवू शकतो.

ग्रुप थेरपीचे सर्वोत्तम उदाहरण म्हणजे ‘वारकरी संप्रदाय’. एखाद्याला देहू-आळंदीपासून एकटाच चालत पंढरपूरला जा म्हटले, तर त्याला ते खूपच कठीण जाईल. पण हाच माणूस जर भक्तिभावाने दिंडीत सहभागी झाला, तर तो वारीचा आनंदही घेईल आणि स्वतःच्या जीवनात परिवर्तनही घडवेल. तशी भक्ती प्रत्येकाकडे असते, पण वारीत आल्यावर समूहामध्ये (ग्रुप) ती प्रकट होते आणि तिचा सोहळा बनतो. त्या भक्तीत तो वारकरी नाचायला, डोलायला लागतो आणि त्याच्यासाठी तो अनुभव अविस्मरणीय असतो. आपल्या जीवनातही, कुटुंबातही आपल्याला ही ग्रुप थेरपी वापरता येऊ शकते. या बाबतीत रामदेवबाबांचे उदाहरण बोलके आहे. पूर्वीपासून आपल्या संस्कृतीत असलेला योग आणि प्राणायाम त्यांनी सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवला. ग्रुप थेरपीचा सिद्धांत हेच सांगतो, की एकट्याने भक्ती, भजन, साधना करण्यासाठी मन खूप निश्चयी असावे लागते. सर्वसामान्य माणसाला सांसारिक कारणांमुळे ते जमेलच असे नाही. पण सगळ्यांनी मिळून या गोष्टी करताना प्रचंड ऊर्जा तयार होते आणि त्याचा उपयोग तिथल्या सर्वांना होतोच होतो. मात्र यात बऱ्याचदा धरणाची भिंत किंवा भिंगच स्वतःला महान कर्ता समजण्याचा धोका संभवतो. म्हणून वारकरी संप्रदायात समर्पणाचे महत्त्व आहे. तर काही संप्रदायात संन्यासाश्रमाचे महत्त्व आहे.

शक्तीचा सिद्धांत हा नियमांच्या चौकटीत काम करतो. हे नियम पाळून जर हा सिद्धांत ग्रुप थेरपीत वापरला, तर त्याचे व्यवस्थापनही सोपे होते व त्याचा परिणामही साधला जातो. पुराणात श्रीकृष्णानेही सर्वसामान्यांसाठी ग्रुप थेरपीचा वापर करून दाखवला आहे. सर्वसामान्यांची शक्ती किती प्रचंड असते, याची जाणीव श्रीकृष्णाने सर्वसामान्यांना करून दिली. दहीहंडी हे त्याचे छोटेसे रूप आणि त्याचेच मोठे रूप म्हणजे सर्वांची शक्ती वापरून निसर्गाच्या रौद्ररूपावर केलेली मात. जेव्हा निसर्गाचा कोप झाला, ढगफुटीसारखी अवस्था झाली, तेव्हा सगळ्यांनी मिळून गोवर्धन पर्वत उचलण्याची प्रेरणा कृष्णाने दिली. त्याने स्वतः मात्र निमित्तमात्र म्हणून करंगळीचा वापर केला. वरकरणी काहीजणांना ही आख्यायिका वाटेल, की ‘डोंगर कसा उचलला जाईल?’ परंतु ६०-७० जणांनी रेल्वेचा डबा एका बाजूने उचलून प्लॅटफॉर्म आणि ट्रेनच्या मध्ये अडकलेल्या माणसाला ओढून सुरक्षित बाहेर काढल्याच्या घटनेचा व्हिडीओ आपल्यापैकी अनेकांनी पाहिला असेल.

ग्रुप थेरपी हेच सांगते की, जर एकाच दिशेने, एकाच ध्येयाने सगळ्यांची शक्ती एकाच वेळी वापरली गेली तर चमत्कार घडतो. हा निसर्गाचाच नियम आहे, शक्तीचा सिद्धांत आहे. भारतातील १३० कोटी लोकांनी एकाच दिशेने शक्ती वापरली, तर किती मोठा चमत्कार घडेल? सर्व भारतीयांच्या फक्त शारीरिक शक्तीने हिमालयाचे वजनदेखील लीलया पेलता येईल. मग सर्वांची बौद्धिक, मानसिक, आध्यात्मिक शक्ती वापरली तर..? तर इतकी प्रचंड ऊर्जा तयार होईल, की संपूर्ण विश्व बदलेल..!

आता प्रश्न येतो, की आपल्या दैनंदिन जीवनात याचा उपयोग कसा करायचा? जसे कोणतीही आध्यात्मिक क्रिया, साधना किंवा योगासने करताना एकत्रित परिणाम मोठा असतो. त्याचप्रमाणे एखाद्याने मनातील सर्व विचारांना एकाच दिशेने प्रवाहित केले, तरी ग्रुप थेरपीसारखाच परिणाम साधता येतो. इंग्रजीमध्ये याला ‘सिंगल माइंडेड’ होणे असे म्हणतात. म्हणजेच एकाच लक्ष्यावर मनाच्या सर्व विचारांची शक्ती केंद्रित करणे. याद्वारे हवे ते साध्य करता येते. यासाठी स्वतःला, स्वतःच्या मनाला प्रशिक्षण द्यायला हवे. कुटुंबातील सर्व सदस्यांनी एक ध्येय समोर ठेवून काम करायला सुरुवात केली, तर मोठ्यात मोठे ध्येयही त्या कुटुंबाला सहज साध्य होईल. हीदेखील ग्रुप थेरपीच होय. गोवर्धन पर्वत उचलताना एकमेकांत वाद असणारे अनेक जण तिथे असतील, पण ते सर्व विसरून या सर्वांनी एकाच दिशेला शक्ती लावली तेव्हाच चमत्कार घडला, हे लक्षात घ्यायला हवे!

परंतु जेव्हा माझाच गट मोठा, माझाच झेंडा उंच हा विचार बळावतो तेव्हा मात्र मोठमोठे किल्लेदेखील ढासळतात. इथे ती शक्ती स्वतःलाच छेद देते. म्हणून काळजी घ्यायला हवी. चांगली गोष्ट वाईट केव्हा बनते, जेव्हा ती स्वतःभोवती तटबंदी उभारून नवीन चांगल्या गोष्टींना आत यायला बंदी घालते आणि मीच श्रेष्ठ या भ्रमात जगते. अशा वेळी हा ग्रुप थेरपीला मिळालेला शाप तर नाही ना, असा प्रश्न मनात उभा राहतो. यावर जे मात करतात तेच चिरकाल टिकतात. यासाठी कुटुंबप्रमुख किंवा ग्रुपचा नेता, मग तो कोणत्याही क्षेत्रातला असो, त्याची भूमिका महत्त्वाची असते. तो जेव्हा धरणाच्या भिंतीसारखे कार्य करतो तेव्हा मात्र लोकांच्या शक्तीचे अथांग क्षेत्र तयार होते.

अजुन काही महत्त्वाचे लेख वाचण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.


मनोज अंबिके
(लेखक प्रशिक्षित व्यवस्थापन सल्लागार आहेत.)

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.