वाहन उंदीर जयाचे | Ganesh Vahana

Published by Kalnirnay on   September 11, 2018 in   FestivalsGaneshotsav

 

गणपतीचे वाहन म्हणून उंदीर प्रसिद्ध आहे. खरे म्हणजे उंदराप्रमाणे मोर हेसुद्धा गणपतीचे वाहन आहे. पण गणपतीच्या मूर्तीपाशी जशी उंदराची लहानशी मूर्ती ठेवली जाते किंबहुना तशी ती ठेवली जाणे अत्यावश्यक मानले जाते तसे उंदराजवळ किंवा उंदराऐवजी मोर हवाच असा कोणी आग्रह धरीत नाही. मोर हे गणेशाचे वाहन आहे हे लक्षात घेऊन गणपतीला मोरेश्वर, मयुरेश्वर अशी विविध नावेही दिलेली आढळतात. तरीही गणपतीचे मूषक वाहन अधिक प्रसिद्ध आहे. आता एवढासा उंदीर त्याच्यावर अवाढव्य देहाचा लंबोदर गणपती स्वार होणार कसा? आणि स्वार झाला तरी गणपतीला पाठीवर घेऊन उंदीर धावणार तरी कसा?

उंदीर गणपतीचे वाहन कसे झाले? 

गणपतीचे वाहन उंदीर का झाला त्याबद्दल विविध प्रकारच्या कथा रूढ आहेत. त्यापैकी एक कथा अशी – क्रौंच नावाचा एक गंधर्व इंद्रसभेत उपस्थित असतांना चुकून त्याचा पाय वामदेवाला लागला. रागावलेल्या वामदेवाने तू उंदीर होशील, असा त्याला शाप दिला. त्या शापाप्रमाणे क्रौंच गंधर्व उंदीर झाला आणि उंदराच्या रूपात थेट पराशरमुनींच्या आश्रमात दाखल झाला. त्याने आश्रमात जेवढे काही खाण्यासारखे होते ते सर्व खाऊन टाकले, जे खाण्यासारखे नव्हते ते कुरतडून टाकले. त्याचा हा धुडगूस असह्य होऊन पराशरमुनींनी या उंदरापासून मुक्तता करावी, अशी श्रीगणेशाला प्रार्थना केली.

प्रत्यक्ष गणराय तेथे प्रकट झाले आणि त्यांनी आपला सर्वसमर्थ, सुप्रसिद्ध पाश उंदरावर टाकला. गणपतीचाच पाश तो, त्यामधून उंदराची सुटका थोडीच होणार? उंदीर तेवढ्यापुरता गणपतीला शरण आला. प्रसन्न झालेल्या गणपतीने उंदराला ‘ वर माग’, असे सांगितले. पण उंदीरमामा गर्वाने आंधळे झाले होते. त्यांनी उलट गणपतीलाच सांगितले, ‘ तुला काय हवे असेल तर मला सांग, मी तुझ्यापाशी वर मागणार नाही. ‘ उंदराचे हे बोलणे ऐकून गणेशाने मुत्सद्दीपणाने उंदराला सांगितले, ‘ मी तुझ्याकडे वर मागतो. तू आजपासून माझे वाहन हो. ‘ उंदराला आपल्या गर्विष्ठपणाचा पश्चात्ताप झाला, पण उपयोग नव्हता. त्याला गणपतीचे वाहन होण्याशिवाय गत्यंतर उरले नाही. गणपतीच्या प्रचंड देहाचे ओझे पाठीवर बाळगत त्याला सर्वत्र वावरावे लागले.

दुर्वामाहात्म्य: गणपतीला नेहमी दूर्वा का वाहली जाते? 

उंदीर हा शेतीचा नाश करणारा आहे आणि गणपती हा शेतकऱ्यांचा देव असल्यामुळे त्याने उंदराला आपल्या अंकित करून घेतले आहे, असेही एक मत किंवा एक तर्क या विषयात सांगतात. गणपती हा शेतकऱ्यांचा देव आहे, याचे स्पष्टीकरण देताना गणपतीचे शूर्पकर्ण म्हणजे सुपासारखे कान ही शेतकऱ्याची दोन सुपे आहेत आणि गणपतीची सोंड ही भाताच्या लोंब्यांसारखी आहे, असेही सांगितले जाते. तर गणपती हे सूर्याचेही एक रूप असून तो दिवसाचा सूर्य म्हणून रात्रीवर आरूढ झाला आहे आणि उंदीर हा रात्री सर्वत्र संचार करीत असल्यामुळे रात्ररूपी उंदरावर गणेशरूपी सूर्य आरूढ झाला असेही सांगितले जाते.

एक गोष्ट मात्र खरी, उंदीर हा थोड्याच वेळात फार मोठ्या संख्येने वाढू शकतो. उंदराच्या जातीची वाढ फार झपाट्याने होते. पूर्वीच्या काळी संतती खूप असणे आवश्यक असल्यामुळे दूर्वेसारखी खूप वाढणारी वनस्पती गणपतीने आपली मानली आणि झपाट्याने संख्या वाढविणाऱ्या उंदराला त्याने आपले वाहन केले, असेही सांगितले जाते.

अजुन काही महत्त्वाचे लेख वाचण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.