श्रावण महिना – श्रावणमास

Published by Kalnirnay on   August 11, 2018 in   Festivalsश्रावणमास

ह्या महिन्याच्या पौर्णिमेला अथवा तिच्या आधी किंवा नंतर श्रवण नक्षत्र असते, म्हणून ह्याला ‘श्रावण’ ह्या नावाने ओळखले जाते. श्रावण हा सणांच्या व्रत-वैकल्यांच्या दृष्टीने चातुर्मासातील सर्वात महत्त्वाचा महिना म्हणावा लागेल. ह्याचे एक महत्त्वाचे वेगळेपण म्हणजे श्रावणातील प्रत्येक दिवशी तसेच प्रत्येक तिथीला कोणते ना कोणते तरी व्रत केले जाते. इतर महिन्यातील व्रत-वैकल्ये ही बहुतेक तिथीनुसार आलेली आहेत. पण श्रावणातील व्रते ही तिथीप्रमाणेच वारांनुसारही योजिलेली दिसतात, हे ह्याचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणावे लागेल.

प्रत्येक श्रावणी सोमवारी भगवान शिवशंकरांसाठी नक्त किंवा एकभुक्त व्रत केले जाते. तसेच शिवाला ‘शिवामूठ’ वाहिली जाते. मंगळवारी नूतन विवाह झालेल्या मुलींसाठी मंगळागौरीची पूजा आणि जागरण करण्याची प्रथा आहे. बुधवारी बुधपूजन तर गुरुवारी बृहस्पतिपूजन करतात. शुक्रवारी लक्ष्मीच्या पूजेचे स्त्रियांसाठीचे व्रत आहे. ह्या लक्ष्मीपूजनाबरोबरीनेच पुरणावरणाचा स्वयंपाक रांधून खास सवाष्णींना बोलावून जेवू घालतात. तर शनिवारी मुंज झालेल्या मुलाला जेवावयास बोलावितात. श्रावणी शनिवारी बहुतेक मंडळी शनिला किंवा मारुतीला तेल वाहून नारळ देतात. रविवारी सूर्याची पूजा करुन त्यालादेखील खिरीचा नैवैद्य दाखविला जातो. श्रावणातच अनेक देवळांमध्ये नित्य पुराणकथन आयोजित करतात. तर काही ठिकाणी शुभदिवस-शुभमुहूर्त पाहून भागवत सप्ताहदेखील केला जातो. ह्या विशेष कौतुकाच्या व्रत-वैकल्यांबरोबरच श्रावणात अनेक मोठे सणही येतात.

नागपंचमी, नारळीपौर्णिमा, रक्षाबंधन(राखीपौर्णिमा), श्रीकृष्णजन्म, गोपाळकाला, पिठोरी अमावास्या, बैलपोळा असे अनेक विविधतापूर्ण सण आणि त्या अनुषंगाने केली जाणारी व्रत-वैकल्ये एकत्रितपणे आल्याने आपल्यावर जणू काही आनंदाचा वर्षावच होतो. वर्षा ऋतूमुळे काही काळ थबकलेल्या सणांना आणि व्रत-वैकल्यांना श्रावणातील नागपंचमीच्या मुख्य सणापासून पुन्हा एकदा प्रारंभ होतो. त्यातच पावसामुळे निसर्गानेदेखील चोहीकडे, सर्वदूर जणू काही ‘हिरवे हिरवे गार गालिचे’ अंथरले आहेत असे वाटण्याजोगे सृष्टीसौंदर्य सर्वत्र बघावयास मिळते.


 – ज्योतिर्भास्कर जयंत साळगांवकर | धर्मबोध पुस्तकामधून