दधिव्रत व पंचमहापापनाशन व्रत

Published by Kalnirnay on   August 22, 2018 in   Festivalsश्रावणमास

१. दधिव्रत

दधिव्रत नावातच ह्या व्रतामध्ये दह्याला विशेष महत्त्व असल्याचे सूचित केलेले आहे. ह्या दिवशी पाळण्यातल्या श्रीधराची पूजा करावी. अहोरात्र आनंदोत्सव साजरा करावा. व्रतकर्त्याने आणि इतर मंडळींनीही ह्या दिवशी केवळ दही खाऊन राहावे. प्रत्येकाने पाळण्याला झोका द्यावा. ह्या व्रतामुळे पंचमहायज्ञाचे फल मिळते असे सांगितले आहे.

सद्य स्थिती:

केवळ दह्याऐवजी दुधापासून बनलेले दही, ताक, लस्सी, पीयूष असे पेयपदार्थही सेवन करावयास हरकत नाही. स्वत:बरोबर इतरांनाही ह्या दिवशी आपण खाऊ ते सारे दह्याचे पदार्थ खाऊ घालावेत. भगवान श्रीकृष्णांना दही आवडायचे. तेव्हा त्यांच्यासाठी हे व्रत अगदी ‘गोड’ मानून केले जाते.

२. पंचमहापापनाशन व्रत

श्रावणाच्या शुक्ल द्वादशीला आणि पौर्णिमेला हे व्रत करतात. ह्या दिवशी भगवान श्रीकृष्णांच्या जगन्नाथ, देवकीसुत आदी बारा रूपांची पूजा करावी. आपल्या हातून जाणता-अजाणता घडलेल्या पंचमहापातकांचा नाश व्हावा ह्या हेतूने पूर्वी हे व्रत प्रचलित होते.

सद्य स्थिती:

हल्ली पाप-पुण्याच्या संकल्पनाच बदलत चालल्या आहेत. त्यामुळे त्यांची जिथे जाणीवच नाही तिथे पश्चात्ताप होऊन एखादे व्रत करणे जरा कठीणच आहे. तरीदेखील कोणी पापभीरु हे व्रत करु इच्छित असेल तर त्याने ते जरुर करावे. नित्यापयोगी गरजेच्या पाच वस्तू एखाद्या गरजवंताला दान म्हणून दिल्यास ते खरोखरच पुण्यकर्म ठरेल.