कवी | रामदास फुटाणे | Diwali Ank 2019 | व्यंग्यकवी | पटकथा लेखक | चित्रपट निर्माते | दिग्दर्शक

‘कधी कधी भारतीय’ असलेले फुटाणे | रामदास फुटाणे

आचार्य अत्रे हे रामदास फुटाणे(कवी) यांचे दैवत आणि स्वत: फुटाणेंनेही अत्र्यांच्याच मार्गाने जात विविध क्षेत्रांत मुशाफिरी केली. मुळातले ते चित्रकलेचे शिक्षक. राजकारणात रमले, चित्रपटसृष्टीत गेले, कविसंमेलने गाजवली, अनेक समित्यांवर काम केले. या प्रत्येक क्षेत्रात उमटवलेली मुद्राही ठसठशीत आहे. ‘सामना” या चित्रपटाची जन्मकथा आणि त्याने पुढे घडविलेला इतिहास विविध निमित्तांनी आजवर सांगून झालेला आहे. परंतु वात्रटिकाकार, उपहासिकाकार म्हणून फुटाणे घडले कसे, त्यांनी कवितांच्या कार्यक्रमाला ग्लॅमर कसे मिळवून दिले, कवींना एकत्र कसे केले, असे अनेक प्रश्न त्यांना फार विचारले गेले नाहीत. राजकारण्यांच्या संगतीत राहूनही त्यांनी कधी उपरोधाची धार कमी केली नाही. वयाची पंचाहत्तरी ओलांडल्यावर आता फुटाणे थोडे स्वस्थ झाले असले तरी त्यांचे कार्यक्रम सुरूच असतात. साहित्य क्षेत्रासाठी काही तरी बरे करण्याचा त्यांचा ध्यासही कायम आहे. आपल्या ओळखींचा, आपल्या संबंधांचा उपयोग ते जागतिक मराठी अकादमीचे अधिवेशन भरविण्यासाठी करतात आणि त्यातूनही सामाजिक सेवाच करतात. ‘भारत कधी कधी माझा देश आहे” म्हणणा:या फुटाण्यांना हा देश, हा समाज कसा गवसला, कसा दिसला, कधी दिसला, त्याविषयीच्या या गह्रश्वपा. गह्रश्वपाच असल्याने त्यात काळाचे संदर्भ मागेपुढे आहेत. एका प्रश्नातून दुसरा निघाला, अशी शिस्त नाही. माहितीचा धबधबाच त्यांच्याकडे आहे. ज्या विषयी फार बोलले गेले आहे, असे विषय टाळत, प्रसंगी त्यांना मध्येच तोडत या गह्रश्वपा मारलेल्या आहेत…


  • तुम्ही चित्रकला शिक्षक, तुम्ही आमदार, तुम्ही चित्रपट निर्माते, मग हा उपहास, विनोद, तुमच्यात आला कुठून आणि कसा?

जामखेड हे दुष्काळग्रस्त गाव. गावात वीज नाही, पाणी नाही. आमचे कापड दुकान होते छोटेसे. मी नववी-दहावीत असल्यापासून दुकानात बसायचो. दुकानात गिऱ्हाइकांशी बोलावे लागते. त्यांना पटवावे लागते. त्यामुळेच व्यापाऱ्याला संभाषण कला येते. मी आठवड्याच्या बाजारात रस्त्यावर कापड घेऊन दिवसभर बसायचो. संध्याकाळी दुकानात येऊन हिशेब द्यायचो. त्यातून मला समोरच्याला गोड बोलून ताब्यात कसे घ्यावे ही कला आली. गावात भजने व्हायची, ती मी ऐकायचो. दर शनिवारी गावात तमाशा यायचा. तो मी पाहायचो. त्यातला सोंगाड्या मला फार आवडायचा. त्याच्या विनोद करण्याच्या पद्धतीचा माझ्यावर मोठा संस्कार झाला. खंडू खेडकर हा एक अत्यंत उत्तम असा विनोदी नट होता. तमाशामध्ये वैद्य मास्तर नावाचे एक गृहस्थ राजाचे काम करायचे. त्यांची बोलण्याची ढब खूपच वैशिष्ट्यपूर्ण होती. ही सगळी मंडळी जुन्नर-मंचर विभागातील होती. भाऊ बापू नारायणगावकरांच्या तमाशात विठाबाई नृत्य करायची, ती अत्यंत सुंदर नाचायची. आमची त्या काळातली माधुरी दीक्षित म्हणजे विठाबाई. तिच्यासोबतचे विनोदही जोरदार असायचे. एक काशिनाथ म्हणून नट होता. भाऊ बापूंचा एक शंकर नावाचा पुतण्या होता. या दोघांचीही संवादफेक, विनोदाची शैली तेव्हा मनावर ठसली, अर्थात ते तमाशातले विनोद होते, त्यामुळे थोडी अश्लीलता त्यात असे. त्या वयात ते फार आवडत असे.

दुसरा संस्कार त्या वयात झाला तो आचार्य अत्रे यांच्या ‘नवयुग’ या साप्ताहिकाचा. त्यातली व्यंगचित्रे राजकीय असायची, त्या काळात त्यातले संदर्भ तेवढे कळत नसत, परंतु त्यातले दत्तू बांदेकरांचे लिखाण फार आवडायचे. तेव्हा फोटोछपाईचे तंत्र फार चांगले नव्हते. ब्लॉक करून छापावे लागत. त्या काळी ‘नवयुग’ हे एकमेव साप्ताहिक होते, ज्यात पूर्ण पान आकाराचे ब्लॉक्स असत. मला क्रांतिसिंह नाना पाटलांचा असा फोटो आठवतो. अत्र्यांच्या ‘श्यामची आई’ या चित्रपटाला सुवर्णपदक मिळाले तेव्हाचा, गळ्यात ते पदक घालून काढलेला त्यांचा पूर्ण पान फोटो होता. या सगळ्या गोष्टींचे आकर्षण वाटू लागले. या आकर्षणातूनच मग मी हळूहळू वाचनालयात जाऊ लागलो. ‘चांदोबा’, ‘अमृत’, ‘वसंत’ ही मासिके वाचू लागलो. दीनानाथ दलालांचे ‘दीपावली’, मुळगावकरांचे ‘रत्नदीप’ हे दिवाळी अंक, त्यातली चित्रे आवडू लागली. एस. एम. पंडित यांची कॅलेंडरवरील चित्रे भुरळ घालू लागली. त्यातून चित्रकारही व्हावे असे वाटू लागले.

अशा विविध गोष्टी खुणावू लागल्या असतानाच मी आचार्य अत्रेंचे ‘मी कसा झालो’ हे पुस्तक वाचले. एक व्यक्ती आपल्या आयुष्यात काय काय करू शकते, ते वाचून मी स्तिमित झालो. म्हणजे अत्र्यांचे पुस्तक, तमाशातील विनोदांची शैली आणि थोरामोठ्यांची चित्रे या माझ्या मूळ प्रेरणा होत्या असे म्हणता येईल.

  • म्हणजे यातूनच तुमच्या मनात विनोद रुजला…

दिवाळी अंकांतली व्यंगचित्रेही बघायचो. कथा वाचायचो.ग्रामीण कथा खूप आवडायच्या, कारण माझ्याभोवती तेच वातावरण होते. व्यंकटेश माडगूळकर, द.मा.मिरासदार हे कथालेखक त्यामुळेच अधिक जवळचे वाटायचे. गावखेड्यातले दारिद्र्य, जातीय व्यवस्था याचे चित्रण त्यांच्या कथांमध्ये असायचे. पुढे पुलंचे ‘अपूर्वाई’ वाचले, अत्र्यांचे इतर लिखाणही वाचू लागलो. त्यातून विनोदाचे संस्कार माझ्यावर होत गेले. १९६२ साली मी चित्रकला शिक्षकाची नोकरी करण्यासाठी म्हणून मुंबईतच आलो.

  • चित्रकला शिक्षक, ‘सामनासारखा चित्रपट, राजकारण्यांची संगत, आमदारकी…या सगûया प्रवासात आपण टोकदार उपहास करू शकतो ही जाणीव प्रथम, कधी आणि कशी झाली?

दुकानदार म्हणून बोलघेवडा झालो होतोच, त्यातून विनोदी वाचन, तमाशातल्या संवादांचे आकर्षण, यामुळे मित्रांशी, घरच्यांशी बोलताना कोटी करणे, श्लेष साधणे याची मला खोड लागली होती, सवय किंवा व्यसनही म्हणता येईल. एखाद्या क्रियापदाचे दोन अर्थ होऊ शकतात हे कळू लागले, ते मात्र तमाशामुळे. आपण थोडा विचार केला तर लक्षात येईल की मराठीतल्या कोणत्याही क्रियापदातून अश्लील अर्थ काढता येऊ शकतो. मी तेव्हा गिरगावात राहत होतो. हा सगळा विभाग म्हणजे मराठी संस्कृतीचा अड्डा होता. मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या भाई जीवनजी शाखेत जाऊन मी वाचत बसायचो. साहित्य संघ बांधला जात असताना तिथे रोज व्याख्याने व्हायची, ते ऐकायचो. बिर्ला मातुश्री सभागृहात आचार्य अत्र्यांची नाटके पाहायचो. रोज सकाळी ‘मराठा’ वाचायचो आणि काँग्रेसचा तिरस्कार करायचो, कारण मी अत्र्यांचा फॅन झालो होतो. गावी घरात मात्र काँग्रेसचे वातावरण होते. ज्या शाळेत मी शिक्षक होतो ती शाळा होती हिंदी माध्यमाची. तिथे सगळे हिंदी वातावरण होते. तिथल्या एका शिक्षकासोबत मी एकदा ‘चकल्लस’ हे हिंदी कविसंमेलन ऐकायला गेलो. त्या काळी हिंदी व्यंग कवितांची अशी संमेलने मुंबईत सतत होत असत. बिर्ला मातुश्रीमध्ये ही संमेलने होत असत. रामरिख मनोहर हे हास्यकवी त्या संमेलनांचे संचालन करायचे. त्या संमेलनांमध्ये कधीच पाना-फुलांच्या, निसर्गाच्या किंवा प्रेमाच्या कविता नसायच्या. राजकारण, राजकारणी, मंत्री यांची भरमसाट, यथेच्छ खिल्ली उडवणा:या त्या कविता असत. त्यांना प्रचंड दाद मिळत असे. हुल्लड मुरादाबादी, काका हाथरसी, निर्भय हाथरसी यांच्या त्या कविता मला आवडू लागल्या. रामरिख मनोहर संचालन करताना खमंग असे राजकीय चुटके सांगत. या कवींच्या कविता तेव्हा ‘धर्मयुग’ या हिंदी साह्रश्वताहिकातही प्रसिद्ध होत होत्या. कविसंमेलन हे एवढे मनोरंजक असू शकते, एवढे हास्यस्फोटक असू शकते हे मला तिथे कळले. त्या हिंदीचा संस्कार आणि शाळेतले हिंदी वातावरण यामुळे मीसुद्धा हिंदीत लिहू लागलो. मला काही शुद्ध हिंदी येत नव्हती, मी आपला मुंबैया हिंदीत लिहीत होतो. दरवर्षी १४ सह्रश्वटेंबरला शाळेत हिंदी दिवस असे. हिंदीतील एखाद्या कवीला त्यासाठी पाहुणा म्हणून बोलावले जात असे, त्या कविता मला ऐकायला मिळाल्या. तोवर माझ्या काही मराठी कविता ‘मराठा’, ‘स्वराज्य’मधून प्रकाशित झालेल्या होत्या. त्या पाहून माझे एक शिक्षक सहकारी बालाप्रसाद मला म्हणाले, ‘रामदास, तुम हिंदीमें क्यों नही लिखते?’ मीही त्यांना म्हणालो, ‘कोशीश करता हँ.’ अशाच एका १४ सप्टेंबरच्या आदल्या दिवशी ‘कटपीस’ हा विषय माझ्या डोक्यात आला.

  • तुमच्या कापड दुकानामुळे?

हो, एक तर मी कापड दुकानवाला, शिवाय जातीने शिंपी. कापडे फाडण्याची सवय होतीच मला. एकदा एक शिक्षक सहज म्हणाला, ‘कटपीससे ब्लाऊज बन सकती है, शर्ट बन सकती है, जिंदगी थोडेही बन सकती है. त्याला मी तिथल्या तिथे उत्तर दिले होते- ‘अरे हम खुद कटपीस है मां-बाप के. मां कपडा है, बाप कैची है, जो पीस कटता है, वह हम है.’ मग हीच कविता पुढे वाढवता येईल असे मला वाटू लागले. हा तुकडा सतत डोक्यात घोळत राहू लागला. मी रस्त्यावर कटपीस विकणारा एक मुलगा कटपीसविषयी बोलतो आहे अशी कल्पना करून मी ती कविता पुढे लिहायला घेतली. तेव्हा पाऊस सुरू होता, त्यातला एक थेंब उडून मी लिहीत असलेल्या कागदावर पडला. त्यातून मला सुचले- बूंद कटपीस है धारा की, धारा कटपीस है बादल की, बादल कटपीस है सागर का, सागर कटपीस है धरती की…हे एकदा सुचले आणि मग धरती, प्रांत, जिल्हा, देश…अशी कटपीसची उदाहरणे सुचत गेली. ती कविता शाळेत सर्व शिक्षकांना आवडली. मी ही कविता लिहिली तेव्हा २२-२३ वर्षांचा होतो, १९६५-६६चा तो काळ असेल. मी ज्या शाळेत शिक्षक होतो, तिथे सगळी उद्योगपतींची आणि श्रीमंतांची मुले. काहींच्या घरी मी ट्यूशन घ्यायला जायचो तेव्हा त्यांचे वैभव, त्यांचे जगणे पाहायचो. मी दुष्काळी भागातून आलो होतो त्यामुळे मला भारत आणि इंडियामधला हा फरक फारच जाणवायचा. ग्रामीण भागातले दु:ख, दारिद्र्य आणि दुष्काळ एका बाजूला आणि ही सुबत्ता एका बाजूला, यातला विरोधाभास माझ्या मनावर परिणाम करून गेला. मला वाटते की एखादी गोष्ट मनाला खटकणे, मनाला लागणे यातूनच नवा विचार जन्माला येतो, कविता-कथा आणि कोणतेही साहित्य जन्माला येते. माझ्या या लिखाणाला माझ्या एकूणच जगण्याची पाश्र्वभूमी होती. मी ज्या फणसवाडीत राहत होतो, तिथे गुजराथी वस्ती प्रामुख्याने होती. ज्या शाळेत शिक्षक होतो, तिथे जास्त शिक्षक मध्य प्रदेश, उत्तर प्रदेशातून आलेले होते. विद्यार्थी बहुतांश मारवाडी होते. या सगया वातावरणात मला आचार्य अत्रे यांच्या ‘मराठा’ या वृत्तपत्राने घेतलेली भूमिका पटू लागली होती. मी कामगार मैदानावर जाऊन संयुक्त महाराष्ट्र चळवळीतली भाषणे ऐकत होतो. मी असेम्ब्लीत जाऊन गॅलरीत बसून भाषणेही ऐकायचो. बाळासाहेब भारदे तेव्हा स्पीकर होते, ते माझ्या वडिलांचे मित्र होते, आमच्या घरीसुद्धा येत असत. त्यांचे पीए होते, देवचके. त्यांच्याकडून मी विधानसभेचा पास मिळवला होता. गुलाबराव गणाचार्य, पाटकर, कारखानीस, अत्रे, एसेम, ना. ग. गोरे, केशवराव धोंडगे यांची भाषणे मी तिथे ऐकली. महाराष्ट्राची निर्मिती होऊन गेलेली होती, परंतु समितीचा दबदबा मुंबईत कायम होता आणि मुंबई प्रदेश काँग्रेसविषयी तिरस्कार निर्माण करण्याचे काम ‘मराठा’ करत होता. स. का. पाटील यांचा उल्लेख ते ‘नासका पाटील’ करायचे, घोडपदेवचा दादा, शेठजी अशा शेलक्या शब्दांचा वापर करून अत्रे काँग्रेसच्या नेत्यांची बिनपाण्याने करायचे. ‘क:हेचे पाणी हे त्यांचे आत्मचरित्रही तेव्हा ‘मराठा’मधून क्रमश: प्रसिद्ध होत होते. १९६६पर्यंत ‘मराठा’ जोरात होता. बाळासाहेब ठाकरे ‘मार्मिक’मधून अत्र्यांवर टीका करायचे तेव्हा मी दुखावला जायचो, मला त्यामुळेच शिवसेनेकडे कधी जावेसे वाटले नाही. उलट १९६७ सालच्या निवडणुकीत मी जॉर्ज फर्नांडिस यांचा प्रचार केला, त्यातून एक वेगळा राजकीय दृष्टिकोन मिळत गेला. परंतु मुंबईबाहेर ग्रामीण महाराष्ट्रात काँग्रेसव्यतिरिक्त कुठल्याही पक्षाचे फारसे अस्तित्व नव्हते. विरोधी पक्षांचे काही नेते ग्रामीण भागात आक्रमक भाषण करायचे, मात्र त्यांच्या केवळ भाषणांना गर्दी व्हायची. ग्रामीण भागात जो नेता पैशाने मोठा असेल, साधनसंपत्ती ज्यांच्याकडे असेल त्याचेच लोक ऐकतात. समाजवादी नेत्यांची एक गंमत माझ्या लक्षात आली. नोकरी करणा:या मुलीशी लग्न करायचे, म्हणजे एक फिक्स रक्कम घरात येते. मग गावात भाषणे करत फिरायचे. मी गमतीने असे म्हणत असे की ‘घरात एक दुभती गाय आणून बांधायची आणि मग  गावाला उपदेशाचे विरजन वाटत फिरायचे. समाजवादी, जनता दल हे सगळे नेते काँग्रेसच्या पेट्रोल पंपावर असायचे. त्यांतील अनेक नेत्यांचा निवडणुकीचा खर्चही काँग्रेसच करत असे. मी समाजवादी विचारांचा असूनही समाजवादी पक्षाकडे गेलो नाही, कारण ही वस्तुस्थिती मी स्वत: पाहत आलो होतो. माझ्या कवितांसाठीची राजकीय पाश्र्वभूमी अशी घडत गेली.

  • हाच विरोधाभास पुढे तुम्ही कवितेत आणला…

आणखीही काही गोष्टी घडल्या. त्याच सुमारास माझी आणि दादा कोंडकेंची ओळख, मैत्री झाली. मुंबई कामगार सोसायटीच्या पर्चेस विभागात दादा दीडशे रुपये महिना पगारावर नोकरी करत होते. त्यांचा ‘छपरी पलंगाचा वग’ तेव्हा जोरात होता. शाहीर दादा कोंडकेंनी, शाहीर साबळेंसोबत चीनविरुद्धच्या एका कार्यक्रमात म्हटलेले एक गाणे मला फार आवडले होते- ‘च्याऊ आणि म्याऊ आपलेच भाऊ’…अशा काही तरी ओळी होत्या सुरुवातीला. पुढे मग ‘याचा करायला खुर्दा, उठ की रं मर्दा’ अशा ओळी. माझी दादांशी ओळख झाली, दादांना मी माझी कटपीस ही कविता ऐकवली. ती ऐकून दादा म्हणाले, ‘जरा लावण्या वगैरे काही लिहा, तसे काही लिहिले तर दाखवा मला’ मग मी शनिवाररविवार दादांच्या सोबतच राहू लागलो. त्यांच्यामुळे वसंत सबनीसांचीही ओळख झाली. या दोघांसोबतच्या गह्रश्वपाटह्रश्वपांमध्ये विनोदाला बहर येणे, विनोदाच्या नव्या नव्या जागा कळणे हे घडत गेले. अर्थात मी फार बोलत नव्हतो, मी फक्त ऐकत होतो आणि मनातल्या मनात, आपल्यालाही अशा कोट्या करता येईल का, याचा विचार करत होतो. दादांनी पुढे ‘सोंगाड्या’ काढायचे ठरवले तेव्हा मला प्रॉडक्शनची जबाबदारी सांभाळायला सांगितले आणि मी शाळेत बिनपगारी रजा टाकून त्यांच्या युनिटमध्ये कोल्हापुरात रुजू झालो. तिथे भालजी पेंढारकरांकडून खूप काही ऐकायला मिळायचे. दिवसा भालजींकडून ‘देव, देश आणि धर्माच्या’ गोष्टी ऐकायच्या, रात्री निळू फुलेंसोबत ‘लोहिया कधी काय म्हणाले’ ते ऐकायचो. तेव्हा दादा कोंडकेही समाजवादी विचारांचे होते, जनता कलापथकामधून ते शिवसेनेची भरपूर खिल्ली उडवायचे. पुढे, ‘सोंगाड्या’ च्या रिलिजसाठी सेनेने मदत केल्यामुळे ते बाळासाहेबांचे भक्त झाले.

  • तुमचा हा चित्रपटसृष्टीत प्रवेश, पुढे ‘सामना’ या चित्रपटाद्वारे स्वत:च केलेली निर्मिती आणि त्या नंतर ‘सर्वसाक्षी’, ‘सुर्वंता’ वगैरे सर्व प्रवास, ‘सामना’चे आंतरराष्ट्रीय पातळीवर झालेले कौतुक, हा सगळा प्रवास एका बाजूला… परंतु तुमच्या उपहासाने ठासून भरलेल्या कवितांचा एक समांतर प्रवास सुरू होता. आपल्याला असा उपहास करता येतो, वेगळ्या प्रकारच्या कविता आपण लिहू शकतो याची जाणीव कधी झाली?

त्याच काळात मी दोन दोन ओळींच्या कविता लिहिण्याचा प्रयत्न करू लागलो होतो- तशा काही मला अजूनही आठवतात-

होता अगर भारतका हर मिनिस्टर सच्चा होता,
औरतके नही, मर्द के पेट में बच्चा होता’
किंवा
‘हर बडी चीजसे छोटी अच्छी होती है
बॅग से पर्स अच्छी होती है,
डॉक्टरसे नर्स अच्छी होती है’

मी बोलताना सहज असे तुकडे वापरायचो आणि लोकांना ते आवडत होते. परंतु मध्येच मी सिनेमाकडे वळलो, त्यामुळे माझे याकडे दुर्लक्ष झाले. दादांसोबत काम करताना मी चित्रपटाच्या व्यवसायात काय काय करू नये हे शिकलो. काय करावे, हा तुमच्या प्रतिभेचा भाग असतो, कुवतीचा भाग असतो…परंतु काय करू नये हे अनुभवातूनच येते. बजेटचा विचार करूनच गोष्टी ह्रश्वलॅन कराव्या, नट्यांच्या भानगडीत पडून पैसा खर्च करू नये हे मी शिकलो होतो. चित्रपट करायचे निश्चित केल्यावर तो लिहिण्यासाठी विजय तेंडुलकरांच्या मागे लागलो, ते तेव्हा लोकसत्तेत नोकरी करत होते,
मी त्यांना आठ-नऊ महिने चिकाटीने भेटत राहिलो, तेव्हा त्यांनी कथा लिहायला होकार दिला. मला विचारले, ‘तुला राजकारण हाच विषय हवा का?’ मी म्हटले, ‘हो, कारण लोकांना या विषयावरचे चित्रपट आवडतात, त्यातही ग्रामीण भागातले राजकारण पाहिजे. आम्ही चर्चा करायला विद्यापीठासमोरच्या वैभव हॉटेलमध्ये भेटू लागलो. एक दिवस मला तेंडुलकर म्हणाले, ‘डॉक्टर लागू आणि निळू फुले चालतील का? चालतील का म्हणजे, व्यावसायिकदृष्टï्या ते चालतील का, कारण किमान तुझे घातलेले पैसे परत यावेत, अशी माझी इच्छा आहे.’ मी होकार दिला. मग पुढच्या एका मीटिंगमध्ये ते म्हणाले, ‘एक सत्तेत असलेला माणूस आणि एक सत्तेबाहेर फेकला गेलेला माणूस यांच्या संघर्षाची कथा आहे. एक सत्तेची मग्रुरी असलेला, एक फ्रस्ट्रेटेड इटिलिजंट व्यक्ती. स्वातंत्र्य सैनिकाची निर्भिडता आणि बुद्धिवंताची लाचारी हेही त्यात असेल. मग काही दिवस ते लिहिलेली पाने दाखवायचे, लिखाण पूर्ण होत आले तेव्हा ते मला म्हणाले, ‘गोविंद निहलानींला विचार दिग्दर्शनासाठी. निहलांनींना मराठी वातावरण, मराठी व्यक्तिरेखा कितपत कळतील अशी मला शंका होती. तेव्हा ‘घाशीराम’ नाटक आलेले होते. मी हळूच तेंडुलकरांना विचारले, ‘जब्बार पटेलला विचारू का?’ या प्रश्नावर तेंडुलकर चकित झाले आणि म्हणाले, ‘तू विचार केला आहेस का पुढचा काही?’ त्या प्रश्नाचा रोख माझ्या लक्षात आला. मी म्हटले, ‘तुम्हाला तांत्रिक गोष्टींची काळजी वाटते आहे ना? संकलक एन. एस. वैद्य, कॅमेरामन सूर्यकांत लवंदे अशी अनुभवी माणसे सोबत घेऊ. लेफ्ट लूक, राइट लूक एवढे दिग्दर्शकाला कळले की झाले. सोबत अनुभवी सहायक घेऊ.’ तेंडुलकरांनी होकार दिल्यावर मी जब्बारला रवींद्रमध्ये जाऊन भेटलो. दरम्यान तेंडुलकर-जब्बार यांच्यात काही बोलणे झालेले होते. मी जब्बारला दिग्दर्शनाविषयी विचारल्यावर त्याने एकदम रिव्हर्स गीअर टाकला- ‘माझे आणि सिनेमाचे जमेल की नाही ते माहिती नाही, मला त्यातले तंत्र कळत नाही, सध्या नव्या नाटकाची तयारी सुरू आहे वगैरे.’ पण मला माहिती होते, कुठलीही स्त्री आणि बुद्धिवंत माणसे यांचा नकार हा होकारच असतो. कधीही सिनेमा न केलेल्या माणसाला थेट तेंडुलकरांचे स्क्रिह्रश्वट करायला मिळत आहे, ही संधी कोण सोडणार? मानसशास्त्र वाचून मला एवढी अक्कल आलेली होती. जब्बारची ही सवयच आहे. मी बघतो, विचार करतो असे जब्बारने म्हटल्यावर मी म्हटले, ‘बघ, नाही तर मी दुसरे कोणी पाहतो.’ पण जब्बार करणार हे मला माहिती होते…’सामना’ चे लिखाण वाचताना माझ्या लक्षात काही गोष्टी आल्या. तेंडुलकरांच्या लिखाणातला तिरकसपणा फारच टोकदार होता. संवादांमध्ये शब्द रिपीट करायचा नाही, एखादे वाक्य पुन्हा येऊ द्यायचे नाही, एकच एक आशय पुन्हा पुन्हा सांगायचा नाही. या गोष्टी मी तेंडुलकरांकडून शिकलो. महत्त्वाच्या वाक्याची फेक कशी करावी, हे मी दादा कोंडकेंकडून शिकलो. या दोन्ही गोष्टींचा मला कविता लिखाणात फार उपयोग झाला.

  • तो कसा?

मी विचार करायचो की आपल्याला पहिली नेमकी जी ओळ सुचते, ती खरी शेवटची असते. जो पंच सुचतो तो शेवटचा असतो. उदाहरणार्थ, तेव्हा तामिळनाडूत विधानसभा निवडणूक झाली आणि त्यात एम. जी. रामचंद्रन यांच्या पत्नीचा पराभव झाला होता आणि त्यांची मैत्रीण जयललिता मात्र निवडून आली होती. त्यावर पहिली ओळ मला सुचली ती शेवटची होती, मग त्या ओळीला पूरक ओळी मी लिहिल्या –

चारी मुंड्या चीत करून
‘नंबर एक’ ला पाणी पाजत असते
पत्नी काय, संपत्ती काय
‘नंबर दोन’ चीच गाजत असते

अशा पद्धतीने मी विचार करू लागलो की पहिल्या दोन ओळींत घटना यावी आणि पुढल्या दोन ओळींत टपली यावी. ‘सामना’, ‘सर्वसाक्षी’ या चित्रपटांनी आर्थिक फटका दिला होता, त्यानंतरची ही गोष्ट आहे. आम्ही गह्रश्वपा मारायला बसायचो तेव्हा मी अशा चार चार ओळी ऐकवायचो. व्यंगचित्रकार ज्ञानेश सोनार मला म्हणाला, की तू जे बोलतोस ते तू लिहून काढ. तेव्हा ‘जत्रा’ चे संपादक बेहरे, श्री. द. सरदेशमुख यांना भेटलो. सरदेशमुख तेव्हा स्वत:च्या नावाव्यतिरिक्त राजेंद्र नगरकर, मस्ताराम अशी वेगवेगळी नावे घेऊन ‘जत्रा’ त लिहायचा. तो इंग्रजी मासिके आणायचा आणि त्यातले विनोद गोविंदराव, गणपतराव अशा व्यक्तिरेखा घेऊन मराठीत करायचा. पण मला वाटायचे की मी तर कवितेचे सगळे नियम बाजूला ठेवत आहे, अनेक नेत्यांची थेट नावे घेतो आहे, काँग्रेस म्हणाली ऐवजी ‘पंजा म्हणाला’ अशा पद्धतीची भाषा वापरत आहे. हे कोण छापणार? परंतु जत्रामध्ये मी दर रविवारी लिहू लागलो आणि ते लोकांना आवडू लागले. त्याचा एक ट्रेंड सुरू झाला. ‘कमळ कोमेजले’ अशा पद्धतीची शीर्षके पुढे वृत्तपत्रात येऊ लागली तो माझ्या कवितांचाच परिणाम, तोवर अशी शीर्षके येत नव्हती. पुढे मी ‘नवशक्ति’ मध्येही कविता लिहिल्या. १९८२ची ही गोष्ट असेल. त्या काळातल्या माझ्या कविता पुढे ‘सफेद टोपी’ या संग्रहात आल्या. त्या काळात माझ्या कवितांना वात्रटिका म्हटले जाऊ लागले. हा शब्द खरा मंगेश पाडगावकरांचा आहे. फ. मुं. शिंदेंनीही काही वात्रटिका तेव्हा ‘मनोहर’ मध्ये लिहिल्या आहेत. मी लिहायचो त्यांना वात्रटिका म्हणत कारण त्यांचे स्वरूपच तसे होते. उदाहणार्थ –

‘एक होती आवा
तिला भेटला बुवा
बुवा म्हटला, कवा?
ती म्हटली, म्हणसाल तवा

मांडवात लावा
रजिस्टर्ड लावा
म्होतूर लावा
नाही तं तशीच ठेवा’

याला मी टायटल दिले होते ‘सवलत’. पुढे मग मी राजकीय लिहू लागलो, तेव्हा दिल्लीत प्रणव मुखर्जींनी बजेट सादर केले होते आणि महाराष्ट्रात सुशीलकुमार शिंदे यांनी केले होते. साधारणत:
निवडणुकीआधीचे जे बजेट असते त्यात गोरगरिबांना भरपूर सवलती दिलेल्या असतात. पुढे त्या प्रत्यक्षात मिळतीलच असे नाही. मला वाटले की यावर काही लिहिले पाहिजे, मी लिहिले -निवडणूक लाजत लाजत म्हणाली हे प्रिय, गûयात ‘कर’ नका टाकू मला लाज वाटते तेव्हा ‘सुशील प्रणय मुखमर्जी’ म्हणाले, डार्लिंग जाणवणार नाही असा अधिभार लावतो अन् ‘उत्पादन केंद्रावर’ च कर ठेवतो आता या सर्वच कवितांना वात्रटिका म्हटले जाऊ लागले. मी विचार केला की आपण ‘डोक्यात टोपी घालणं’ असे म्हणतो, प्रत्यक्षात आपण डोके टोपीत घालत असतो. पण रूढ झाले ते रूढ झाले. तसे वात्रटिकाकार तर वात्रटिकाकार, असा विचार मी केला. काही दिवस मी रामदत्त या टोपणनावाने लिहिले, परंतु नंतर मग रामदास फुटाणे हेच नाव ठेवले. पण विनोदाचे इतर प्रकारही मी लिहिले. इसाक मुजावरांनी तेव्हा ‘चित्रानंद’ नावाचे एक साह्रश्वताहिक सुरू केले होते. त्यात मी ‘महाचालू’ या टोपणनावाने विनोदी वेताळकथा लिहिल्या. सिनेमाच्या क्षेत्रातील त्या त्या आठवड्याची घटना घेऊन मी तिरकस शेरेबाजी करायचो. पण त्यातले काहीच आता उपलब्ध नाही. काही वात्रटिकाही मी त्यात लिहिल्या. तेव्हा ‘अरे संसार संसार’ हा चित्रपट आला होता, अरविंद सामंताचा. त्या चित्रपटाच्या पोस्टरवर खांद्यावर फाळ घेतलेली रंजना, मदर इंडियासारख्या पोजमध्ये दाखवलेली होती. त्यात अशोक सराफही होता.
त्या काळात दोघांविषयीच्या चर्चा जोरात सुरू होत्या. मी लिहिले-

एक नटी चिकणी, देखणी
‘मदर इंडिया’ वाटायची
अन् वंदे मातरम् म्हणताच
‘अशोक’ स्तंभाजवळ उभी राहायची

तेव्हा आशा काळे ‘केसरी’ च्या रविवार पुरवणीत ‘हं विचारा’ या
नावाचे प्रश्नोत्तराचे सदर चालवायची. तिचे तेव्हा लग्न व्हायचे होते.
तिच्यावर मनातल्या मनात प्रेम करणारे तेव्हा खूप होते आणि तीही
मनातल्या मनात असे विचार करत असणारच. तेव्हा मी लिहिले होते –

एक ‘आशा’ गोरी गोरी
‘हं विचारा’ म्हणायची
आणि समोरच्या प्रश्नातून
‘काळे’ मंगळसूत्र शोधायची
परंतु ‘चित्रानंद’ नंतर मी ‘जत्रा’ मध्ये लिहू लागलो तेव्हा त्याला
राजकीय स्वरूप आले. बाबासाहेब भोसले तेव्हा धर्मांतराविषयी काही
तरी बोलले होते. मी त्यावर लिहिले –
‘शेख बाबा शेख भोसला वदला

इतिहासाची पाने बदला

प्रतापगडावर अफझलखानाने

आत्महत्या केली होती

शिवाजीची फौज तिथे श्रद्धांजली

वाहायलाच गेली होती

खूप प्रयत्न करूनही औरंगजेब

हिंदू होत नव्हता

म्हणून संभाजी रागाने डोळे फोडून घेत होता

तेव्हा टोपीवाल्यांनो

बाबासाहेब भोसल्याचे ऐका

धर्मांतर केले तर खंडीभर बायका’

अशा प्रकारे त्या विनोदात गांभीर्यसुद्धा येत होते.

मी काँग्रेसवाल्यांची रेवडी उडवतो त्यामुळे मी हिंदुत्ववादी आहे, असे भाजपवाल्यांना वाटायचे आणि ते माझ्या कवितांचे कार्यक्रम करायचे. पण मी गांधी-नेहरूंविषयी चांगले बोललो की ते नाराज व्हायचे.

  • म्हणजे मग तुमचे कवितांचे कार्यक्रम सुरू झाले…

मी पहिल्यांदा असे कवितांचे सलग वाचन केले ते सोलापूरला. तेव्हा मला विचारण्यात आले की या कार्यक्रमाला शीर्षक काय द्यायचे? मी म्हणून गेलो, भारत कधी कधी माझा देश आहे! तेव्हा सिनेमांची शीर्षके लांबलचक असायची. जब जब फुल खिले, आप आये बहार आयी…मग मी लिहिलेल्या कवितेमधलीच एक ओळ मी शीर्षक म्हणून सांगितली. ५५ मिनिटे मी कविता वाचल्या, बोललो. लोकांनी त्याला चांगली दाद दिली. तेव्हा निर्मलकुमार फडकुले मला म्हणाले, की हे खूपच छान आहे,

तुम्ही आणखी अर्धा तास वाढवा आणि दीड तासाचा उत्तम राजकीय विडंबनाचा, उपहासाचा हा कार्यक्रम करा. नाट्यनिर्माते जयसिंग चव्हाण मित्र होते, त्यांनी बेस्टमध्ये माझे कार्यक्रम ठेवले. महिन्याच्या ११ ते २० अशा तारखा, म्हणजे दहा दिवस ते बुक करायचे. एका कार्यक्रमाचे दोन हजार रुपये आणि टॅक्सीभाडे मिळायचे. महिन्याची वीस हजार रुपये कमाई सुरू झाली. त्यातून तीन हजार रुपये बँकेचा हप्ता मी देऊ लागलो. ही गोष्ट आहे १९८६ ची. १९७५ ते १९८५ अशी दहा वर्षे मी उधारी, उसणवारीवरच काढले होते. कवितांचे कार्यक्रम सुरू झाले आणि मग पैसा मिळू लागला. सामना, सर्वसाक्षी या चित्रपटांमुळे कर्ज झाले होते. १९९० साली ते चित्रपट टीव्हीवर वगैरे आले आणि मग त्यातून चांगला पैसा मिळू लागला.

  • कवितांवर उपजिविका चालल्याचे हे दुर्मिळ उदाहरण आहे …

हो. त्याच काळात रत्नागिरीत साहित्य संमेलन होते. पु. ल. देशपांडे वगैरेही आले होते. तिथे माझ्या कवितांचे वाचन झाले. त्यानंतर एका हॉटेलमध्ये आम्ही जेवायला गेलो असताना, अमेरिकेहून आलेल्या सुभाष दामलेंनी माझ्या कविता ऐकून मला विचारले, ‘तुम्ही अमेरिकेत कवितांचा कार्यक्रम कराल का?’ मी होकार दिला आणि त्यांनी १९९१ मध्ये अमेरिकेत माझे अकरा कार्यक्रम केले. ते तिथल्या मराठी लोकांना फारच आवडले त्यामुळे नंतर मग १९९५, १९९८, २००८, २०११ असे बरेच कार्यक्रम परदेशी झाले. ‘भारत कधी कधी माझा देश आहे’चा रौप्यमहोत्सव डेट्रॉइटला झाला तेव्हा माझ्यासोबत अशोक नायगावकरही होता.

  •  तुम्ही उपहासिका लिहिताना एवढा प्रदीर्घ राजकीय काळ पाहिला.पण असे तिरकस लिहिताना खरी मजा कधी आली ? तो काळ कोणता ? यशवंतरावांचा, भोसल्यांचा, अंतुल्यांचा, पवारांचा की देशमुख-शिंदे याचा ?

मी अत्र्यांच्या काळात जेव्हा लिहू लागलो होतो तेव्हाचे माझे राजकीय ज्ञान एकतर्फी होते, कारण ते अत्र्यांच्या लेखांमधून आलेले होते. मुंबई काँग्रेसचा तिरस्कार हा त्याचा प्रमुख धागा होता. परंतु पुढे राजकीय समज वाढत गेली. यशवंतराव चव्हाणांचे बंधू गणपतराव चव्हाण हे माझ्या वडिलांचे मित्र होते. मला यशवंतरावांबद्दल जे कळायचे त्यातून त्यांच्याबद्दल आदर वाढला होता. वसंतराव नाईक, वसंतदादा पाटील यांनी ग्रामीण भागात केलेले काम मला कळू लागले होते. दुधाच्या दोन बाटल्यांसाठी मुंबईत मंत्रालयात वशीला लावावा लागत होता. आज रात्री दोन वाजता आपल्याला कुठेही दूध मिळते, ते वसंतराव नाईकांच्या हरित क्रांतीमुळे. नाईकांनी धान्याच्या नव्या जाती शोधल्या ही क्रिएटिव्हिटीच होती. मी असाही विचार करू लागलो होतो, की दिवाकरांच्या नाट्यछटा सोडल्या तर मराठीत कुणीही एखादा वेगळा साहित्यप्रकार रुजविण्याचा प्रयत्न केलेला नाही. राजकारणाची ही दृष्टी घेऊन मी साहित्याकडे पाहू लागलो..

मराठी कवितांच्या कार्यक्रमाचे स्वरूप वर्षानुवर्षे एकच होते. तेच कवी आणि त्याच त्याच कविता आणि गंभीरपणे सूत्रसंचाल. त्यातूनफार पैसेही नाहीत. मी कटपीस ही हिंदी कविता जेव्हा पहिल्यांदा एका हिंदी कार्यक्रमात वाचली तेव्हा मला ११ रुपयांचे पाकीट मिळाले होते. मराठीमध्ये आपणच चहा पाजून वर फुकट कविता ऐकवायच्या अशी पद्धत. राममनोहर त्रिपाठी तेव्हा मंत्री नव्हते, तेही कविता म्हणायचे. अशाच एका कार्यक्रमात रामरिख मनोहर यांनी माझी कविता ऐकली. ते मला मग हिंदी कविसंमेलनांना घेऊन जाऊ लागले. काका हाथरसी, शैल चतुर्वेदी, ओम पवार, सोम ठाकूर, हरद्वारचे माणिक वर्मा यांच्या कविता ऐकायला मिळाल्या. या लोकांना पाच पाच हजार रुपये मानधन, विमानाचे तिकीट मिळायचे. संमेलन संपल्यावर साग्रसंगीत जेवण. त्यात कृष्णपट्टीका, रक्तपट्टीका असायच्या. (रेड लेबल, ब्लॅक लेबल). ही गोष्ट असेल १९७० च्या आसपासची. माझा पगार होता तेव्हा ३६५ रुपये आणि हिंदी कविसंमेलनात कविता वाचल्यावर मला मिळायचे एक हजार रुपयांचे पाकीट.

हे सगळे मराठीत यावे, काव्यवाचनातला दळभद्रीपणा कमी व्हावा असे मला वाटत होते. पुढे माझी स्थिती थोडी सुधारली तेव्हा मी मग माझ्या गावापासूनच याची सुरुवात केली. १९८६ पासून पैसे मिळू लागले होते. १९८७ मध्ये मी जामखेडला नामदेव पुरस्कार सुरू केला. बाहेरगावच्या कवींना पुण्या-मुंबईत घेऊन यावे आणि काव्यवाचन ठेवावे असा विचार मी करू लागलो. राजकारण्यांच्या मागे लागून यशवंतरावांच्या नावाने कवींसाठी पुरस्कार सुरू करायला लावले. दमानींच्या सोलापुरातील मिल्सच्या रिपोर्ट्स डिझाइन्सचे, छपाईचे काम मी करून द्यायचो. (त्यातले छपाईचे बरेचसे काम मी सुधीर नांदगावकरांच्या प्रेसला द्यायचो.) त्यांना मी सांगितले, की नुसत्या जाहिराती करून प्रसिद्धी मिळत असेल परंतु प्रतिष्ठा मिळत नाही. लक्ष्मीचे कर्तव्य आहे की तिने सरस्वतीचा सन्मान केला पाहिजे. त्यांना मी भैरू रतन दमानी पुरस्कार सुरू करायला सांगितला. त्याची सर्व जबाबदारी मी घेतली. मग मी सुशीलकुमार शिंदेंशी बोललो. वसंतराव एकबोटे, निर्मलकुमार फडकुले, लक्ष्मीनारायण बोल्ली, चंद्रभूषण कुलश्रेष्ठ वगैरेंची कमिटी तयार केली. पुरस्कार सुरू केला. पुढे नाणिक रुपानीला सांगून प्रियदर्शनी पुरस्कार सुरू केला. विखे-पाटलांना पुरस्कार सुरू करायला सांगितले. १९९० साली चित्रपट महामंडळाचा अध्यक्ष झाल्यावर मी, राज्य पुरस्कार विजेत्यांचा सत्कार सुरू केला. चित्रभूषण पुरस्कार सुरू केला, तो आधी भालजींना, त्यानंतर विश्राम बेडेकरांना दिला.

  • तुम्ही राजकारण आतून बाहेरून पाहिले आहे. कविता लिहिताना, उपहास करताना टीका केली, थट्टा केली. परंतु राजकारण्यांकडून चार चांगली कामेही करून घेतली…

मी एक सांगतो. आमचे काँग्रेसवाले टीकेला कधीही घाबरत नाहीत, किंवा किंमत देत नाहीत. मी तर थेट इंदिरा गांधींवरही टीका केली. अमिताभ बच्चन आजारी होता, इंदिरा गांधी त्याला भेटायला थेट अमेरिकेहून मुंबईत आल्या होत्या. तेव्हा गिरणी कामगारांचा संप सुरू होता तिकडे मात्र फिरकल्या नाहीत. तेव्हा मी लिहिले होते –

‘अमेरिकेहून अम्मा

मुंबईला आली

राजभवनाला वळसा घालून

सांताक्रूझला गेली

तेव्हा लालबागची एक चिमणी

दुसऱ्या चिमणीला म्हणाली,

काल पंजा दाखवित होती

आज पाठ दाखवित आहे

काल रोटी दाखवित होती

आज लाठी दाखवित आहे.

आम्हाला लाथाडण्यात,

काय तिचा लाभ आहे

तिच्या घरात एकच,

आमच्या घराघरात अमिताभ आहे.’

त्याचवेळी माझी ‘सामना’ या चित्रपटामुळे सुशीलकुमार शिंदेंशी मैत्री झाली. पण शालिनीताई पाटलांनी माझ्या ‘सामना’वर टीका केली होती, त्यांच्यावर माझा राग होता. त्यांनी तेव्हा मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ बंगल्याचे नाव बदलून रायगड केले होते. तेव्हा मी लिहिले –

‘हासत नाचत कुंकू लावित

वदली ती शालीन बाला

वर्षा जाऊन रायगडावर

वसंत ऋ तू आला.

तेव्हा तंबाखू चोळत

भविष्यकाळ घोळवत

एक बारामतीवाला म्हणाला,

हे ऋ तुचक्र महाराष्ट्राला

कुठे नेणार आहे,

आज वसंत आला

उद्या शरद ऋ तू येणार आहे’

शरद पवारांशी मैत्री होती, परंतु जास्त मैत्री सुशीलकुमारांशी होती. त्यांच्यामुळे विलासरावांशी मैत्री झाली, विलासरांवामुळे गोपीनाथ मुंडेंशी झाली. त्यांना तर मी भाजपमध्ये येईन असे वाटायचे. पण राजीव गांधींच्या काळात मी काँग्रेसचा अधिकृत सदस्य झालो. त्यातून समित्याही मिळत गेल्या. परंतु तरीही कवितांमधून काँग्रेसवर, नेत्यांवर टीका करत राहिलो. पण भाजपवालेही माझे मित्र आहेत.

  • आपला तो कवितांच्या कार्यक्रमाचा धागा सुटला मध्येच. तुम्हीही हिंदीप्रमाणे मग मराठीत बरेच कार्यक्रम केले राज्यभरातील कवींना घेऊन…त्यांना एकत्र आणताना तुम्ही पालकत्वाच्या भूमिकेत असायचा, असे नायगावकर नेहमी सांगायचे.

हो. कारण असे की राज्यभरात खूप चांगले कवी आहेत, ते लोकांपुढे यावेत असे मला वाटायचे. एकेकाळी बापट, पाडगावकर, करंदीकर हे तिघेच कविता वाचत फिरायचे. ते शंकर वैद्यांना, सुर्वेंना कधी सोबत घेऊन जात नसत. मला असे वाटले की आपण गटबाजी करायची नाही. शहरातले कवी खेड्यांत न्यायचे आणि खेड्यांतले शहरांत आणायचे. माझ्या ओळखी खूप होत्या, ‘भारत कधी कधी…’ मुळे त्या देशभर झाल्या होत्या. मग हेच माझ्या मित्रांसाठीही करावे असे मला वाटले. मी काही मराठीचा अभ्यासक नाही, माझी भूमिका उपासकाची आहे. मी आणि दया पवार अनेकदा एकत्र जेवायचो, आमच्या बोलण्यातून ही कल्पना निघाली. मराठवाड्याचे फ. मुं. शिंदे, विदर्भाचे विठ्ठल वाघ, दया पवार मुंबईचा अशी टीम केली. त्यांच्या माहितीतले त्यांच्या त्यांच्या परिसरातले चांगले कवी कोण आहेत त्यांची नावे काढली. नामदेव पुरस्कार देतानाही मी राज्याच्या सर्व भागातील कवी घेतले आहेत. जातीय समतोल साधला. तीच तीच आडनावे पुरस्कारात टाळली, तशीच ती कविसंमेलनातही टाळली. नवे कवी शोधले. चांगला पाहुणचार करावा हे मी हिंदीतून शिकलो. पुरस्कार देताना कवीकडूनच रेव्हिन्यू स्टँप घेण्याचा दळभद्रीपणा मराठीत होता, तो आपण करायचा नाही, याची खूणगाठ बांधली. उत्तम मानधन, चांगले जेवण, सरबराई केली. कविसंमेलनाआधी आम्ही एकत्र बसून कविता ऐकायचो, त्यात दुरुस्त्या सुचवायचो. मी संमेलनाच्या आधी जाहीर करायचो की ‘हे कवी म्हणजे शबरीची बोरे आहेत. मी चाखून पाहिलेले आहेत. श्रोते हे माझ्यासाठी राम असून त्यांना एकही किडके बोर जाणार नाही याची काळजी मी घेत आहे.’ गेली ३३ वर्षे मी हे करीत आहे. रात्री दीड दीड वाजेपर्यंत संमेलने चालतात.

  • या संमेलनातही तुम्ही राजकीय फिरक्या घेता, घेतल्या आहेत. त्यातून एखादा राजकारणी मित्र रागावला असे कधी झाले नाही ?

कधीच नाही. ते मजा घ्यायचे कवितांची. पण आता सोशल मीडियाच्या दिवसांत मात्र मला कधी कधी ट्रोल केले जाते. सावरकरांचा विज्ञानवाद काँग्रेसने स्वीकारला पाहिजे हे मी तोंडावर सांगायचो आणि तरीही ते रागावत नव्हते. आज तसे वातावरण नाही. विज्ञान हे गूढत्वाचा शोध घेते आणि धर्म हा गूढत्वाची भक्ती करायला लावतो, हा फरक मला महत्त्वाचा वाटतो. शोधाचा आणि भक्तीचाही हा प्रवास गेली अनेक वर्षे सुरू आहे, सुरू राहणारही आहे. धर्म आणि ईश्वरभक्ती ही ९९ टक्के लोकांची गरज आहे. कुसुमाग्रज म्हणतात, ‘हवा त्यांच्यासाठी देव आहे, नको त्यांच्यासाठी तो नाही.’ आपण हे समजून घेतले पाहिजे, लवचिक राहिले पाहिजे. आपल्याकडे १२व्या वर्षी एखाद्याला कम्युनिझम चावला तर तो मरेपर्यंत लाल बावटा धरूनच राहतो. १२व्या वर्षी संघात गेला की पुढे हाफ चड्डीतच राहतो. समाजवाद्यांचेही तसेच आहे. त्यामुळे इतरांच्या तत्त्वज्ञानाकडे तुच्छतेने पाहण्याची वृत्ती सगळीकडे आलेली आहे. आपण आपल्या धारणा तपासायला शिकले पाहिजे आणि गरज वाटली तर बदलल्याही पाहिजेत.

  • तुम्ही आयुष्यभर काँग्रेसमध्ये होता. आजची काँग्रेसची अवस्था पाहून काय वाटते ?

इंदिरा गांधीच्या काळापासून हायकमांड नावाची जी गोष्ट अस्तित्वात  आली तिने काँग्रेसचा घात केला. जणू देशावर आपली मालकी आहे, असा पवित्रा त्यांनी घेतला. कायम पाठीशी उभ्या राहिलेल्या महाराष्ट्रासारख्या राज्यात त्यांनी सतत मुख्यमंत्री बदलाचा खेळ केला, हे आपण पाहिले आहे. वसंतदादा, वसंतराव नाईक, शरद पवार, विलासराव या कुणालाही पाच वर्षे राज्य करू दिले नाही. एखाद्याला मुख्यमंत्री करताक्षणी त्याला घरी कसे पाठवायचे याचा विचार सुरू होत असे. तेच आता भाजपमध्येही सुरू आहे. महाराष्ट्रात संपत्ती तयार होते शेतात. महाराष्ट्रात संपत्ती तयार होते कारखान्यात. दिल्लीत फ क्त व्हाऊचर्स पिकतात. दिल्लीतले नेते घाटावरच्या किरवंतांसारखे आहेत. मी लिहिले होते –

‘या घाटावरती उभे इथे किरवंत

हे रडगाणे रोजचे, कशाला खंत

पाजळी वस्तरा दिल्ली आनंदाने

दरडोई मिळतील पोटासाठी दान

ही राख चाळते यमुनेची चाळणी

खुखुळा वाजतो नवा पुन्हा पाळणी

जन्मली जरी ही घरी कुणाच्या सत्ता

धावती पुन्हा किरंवत शोधण्या पत्ता

ही दिल्ली झाली या देशाचा घाट

इतिहास सांगतो यांची ही वहिवाट ’

पेशव्यांच्या काळापासून हेच चाललेय. दिल्ली म्हणते, ‘आमच्यामुळे तुम्ही आहात.’ तर, हे हायकमांड मोठे घातक आहे. बालगंधर्व जन्शताब्दीच्यावेळी मी लिहिले होते –

‘आपण बालगंधर्व आहोत,

असे अनेक आमदारांना वाटायचं.

त्याचे मन, गल्लीत मिशीला पीळ द्यायचं

अन् दिल्लीने बोलावताच,

लुगडं नेसून जायचं.

मुरडत मुरडत गायचं,

नाथा आले मी डोलत.’

आजही तेच तेच सुरू आहे…कारण भाजपचीही काँग्रेस झाली आहे. यापेक्षा अधिक बोलण्यात अर्थ नाही. कारण काय बोलायचे असेल ते माझ्या वात्रटिका बोलत असतातच, बोलत राहतीलच. उदाहरणार्थ आता शेवटची ताजी ताजी वात्रटिका-

‘आमच्या अशा लिखाणाचा

खरंच त्यांना राग येईल

परंतु,

‘संपूर्ण सह्याद्री

झाडाझुडपांसह विकणे आहे’

अशी जाहिरात आली, की

महाराष्ट्राला जाग येईल’

अजुन काही महत्त्वाचे लेख वाचण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.


(श्रीकांत बोजेवार ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक आहेत)

 

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.