पाणी आणि संस्कृतिबंध | माधवराव चितळे | Water and Culture | Indian Culture

Published by माधवराव चितळे on   April 25, 2020 in   2020मराठी लेखणी

 

पाणी आणि संस्कृतिबंध

जानेवारी महिन्यात अगदी उत्साहात मकरसंक्रांतीचा सण साजरा केला जातो. या मकर  संक्रमणाशी जोडलेले हवामान, त्याच्याशी जोडलेली पीकपद्धती आणि त्याच्याशी जोडलेली आपली अर्थव्यवस्था या सगळ्यात संक्रांतीचा दिवस महत्त्वाचा आहे. आपल्या शेती व्यवसायातील उत्पादन दामदुपटीने वाढावे, अशी एक श्रद्धा यामागे आहे. भारतात आपल्याकडे ‘वर्षा’ कालीन  आणि ‘हेमंत’ कालीन अशी वेगवेगळी उत्पादने घेतली जातात. या हेमंतकालीन उत्पादनात तीळ हे एक महत्त्वाचे पीक आहे. तीळ हे साठ दिवसांचे पीक आहे. मकरसंक्रांतीला तिळाचे पदार्थ वाटण्याचे कारण म्हणजे, कमीतकमी पाण्यावर अवलंबून असलेल्या पिकांना आपण प्राधान्य द्यायला हवे, हा त्यामागचा खरा वैज्ञानिक संदेश आहे.

संक्रांतीच्या वाणाप्रमाणे अक्षय्य तृतीयेलाही दान दिले जाते, हे दान असते, ते पाण्याच्या घटाच्या रूपात. याच काळात सगळीकडे पाणपोया सुरु होतात. उन्हाळ्याच्या या काळात सगळ्यांना सहजतेने प्यायला पाणी उपलब्ध व्हावे, हा त्यामागचा उद्देश.

बाष्पीभवन | Water and Culture | Indian Culture

       उत्सव आणि हवामान ह्यांचा संबंध, त्यामागची सामाजिक आणि वैज्ञानिक भावना जर आपण लोकांना समजावून सांगितली, तर या गोष्टी हाताळण्याची जागरूकता आजच्या पिढीमध्ये रुजू शकते. तसेच त्यांचे नव्याने व्यवस्थापन करताना आपल्याला काय करायला पाहिजे, हेसुद्धा त्यांना कळायला लागले. उदा. आपल्या भू भागामध्ये एखादा तलाव बांधला असेल, तर त्या तलावाचे पाणी बारमाही पिकाला देणे हे पाप आहे. कारण संपूर्ण वर्षभरात जितके बाष्पीभवन होत असते, त्याच्या साधारणतः निम्मे बाष्पीभवन हे उन्हाळ्यात होत असते. बाष्पीभवनामुळे वाया जाणाऱ्या या पाण्याचे रूपांतर आपल्याला जर उत्पादनात करायचे असेल, तर आपल्याला ते पाणी संक्रांतीच्या किंवा रथसप्तमीच्या आत आपल्याला परंपरेप्रमाणे शेतीकरिता वापरायला हवे. आपल्याला शेतकऱ्यांच्या पूर्वीच्या सवयींमध्ये आणि आताच्या सवयींमध्ये फरक पडलेला पाहायला मिळतो. याला आपले सिंचन खाते जबाबदार आहे. उदाहरणच द्याचे झाले, तर कालव्याचे पाणी शेतीला द्याच्या वेळेचे उदाहरण घेऊया. कालवा उघडल्यानंतर सकाळी ६ वाजताही पाणी देता येते. दुपारी १२ वाजता, २ वाजता किंवा शेतजमीन तापल्यावर दुपारच्या ४ वाजताच्या उन्हातही देऊ शकता. पण सकाळी ६ वाजता दिलेल्या पाण्याचा शेतजमिनीला अधिक फायदा होतो. सूर्यकिरण जमिनीवर पोहोचण्यापूर्वी पाणी दिल्यामुळे ते साधारण एक वीतभर जमिनीत झिरपते. यामुळे पिकाची मुळे जोमाने वाढतात. पण तेच पाणी जर दुपारी चार वाजता दिले, तर त्यातील ८५ टक्के पाणी हे बाष्पीभवनाने उडून जाईल. ते मुळांपर्यंत पोहोचणारच नाही. त्यामुळे ते पीक करपते.

आपल्या संस्कृतीत अक्षय्य तृतीयेला कलश वापरण्यामागेही एक कारण आहे. हा सण जेव्हा येतो, तेव्हा आपल्याकडे उन्हाळा ऋतू असतो. या ऋतूत पाण्याचे बाष्पीभवन होण्याचे प्रमाण वाढलेले असते. अशा वेळी तोंडाकडे अरुंद होत जाणाऱ्या कळशीच्या आकाराच्या भांडयात पाणी साठवल्यामुळे या पाण्याचे बाष्पीभवन होत नाही. तेव्हा आपल्या पाण्याच्या व्यवस्थापनात विज्ञान आणणे आणि शेतकऱ्यांशी बोलून त्यांच्या चुकीच्या सवयी बदलणे आवश्यक आहे.

या बाबतीत तामिळनाडू राज्याचे अनुकरण करायला हवे. इथे असणाऱ्या वैगई नदीच्या खोऱ्यात गावनिहाय छोटे छोटे दोन ते तीन तलाव बांधले. कालव्यातील पाणी थेट शेताला दिले नाही, तर त्या गावातील तलाव भरण्यासाठी दिले. या तलावातील पाणी नंतर योग्य त्या वेळेला शेताला पटकन पोहोचते आणि त्या पिकाची गरज असेल तसे सोडले जाते. त्यामुळे बाष्पीभवनाने होणारा पाण्याचा नाश टाळून त्याची उपयुक्तता, कुशलता वाढविण्यात आलेली आहे, या दृष्टीने या जलव्यवस्थापनाचा फेरविचार आपण करायला हवा. त्यावर आपली संपन्नता, आपले भविष्य अवलंबून आहे! यातूनच आपल्याला पाण्याचा आणि आपल्या संस्कृतीचा कसा संबंध आहे, हे समजून घेणे सोपे होईल.

अजुन काही महत्त्वाचे लेख वाचण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.


माधवराव चितळे