Your Cart
October 7, 2022
इम्प्लांट | Dental Implants | Dr. Milind Karmarkar | Implant

डेंटल इम्प्लांट्स: तिसऱ्यांदा येणारे दात | डॉ. मिलिंद करमरकर | Dental Implants | Dr. Milind Karmarkar

 

मनुष्याला नैसर्गिक रीत्या दोन वेळा दात येतात. एक म्हणजे दुधाचे आणि दुसरे म्हणजे कायमस्वरूपी दात. दुधाचे दात पाचव्या-सहाव्या वर्षी पडून त्या जागी कायमस्वरूपी दात येणार असले, तरी दुधाच्या दातांचीही काळजी घ्यावी लागते आणि तेवढीच काळजी येणाऱ्या कायमस्वरूपी दातांचीही घ्यावी लागते. मात्र सतत गोड खाणे, योग्य रीत्या दात न घासणे, चुकीच्या सवयी आदींमुळे दात किडू शकतात, पडू शकतात. अशा वेळी दातांवर योग्य उपचार करून घेणे आवश्यक ठरते. पूर्वी दात पडला, की कवळी बसवावी लागायची. काळाबरोबर दंतवैद्यकशास्त्राने प्रगती केली. परिणामी, कवळीऐवजी पडलेला दात क्राउन व ब्रिजेस पद्धतीने बसवला जाऊ लागला. मात्र हे उपचार घेताना आजूबाजूचे दात घासून क्राउन व ब्रिजेस करावे लागतात. परिणामी, बाजूचे दात कमजोर होण्याची शक्यता असते. कालांतराने या क्राउन व ब्रिजेसची जागा डेंटल इम्प्लांटने घेतली. जो दात पडला आहे, केवळ त्याच जागी आधुनिक उपचारांच्या साहाय्याने दाताचे रोपण (इम्प्लांट) केले जाते. आधुनिक प्रक्रियेने करण्यात येणाऱ्या दातांच्या रोपणामुळे रुग्णांना तिसऱ्यांदा दात मिळणे शक्य झाले आहे. गेल्या ३०-४० वर्षांत दंतवैद्यक शास्त्राने खूप प्रगती केली असून यातील शस्त्रक्रियात्मक (सर्जिकल) भाग कमी झाला आहे.

इम्प्लांट म्हणजे काय?
पडलेल्या / नसलेल्या दाताच्या जागी टिटॅनियम धातूचा छोटा स्क्रू तेथील हाडाच्या खोबणीत बसवला जातो. या स्कू्रवरच नंतर सिरॅमिक दात बसवला जातो. दाताच्या मुळाप्रमाणे हिरडीत रोवलेला स्क्रू आणि सिरॅमिकचा दात ह्यांना इम्प्लांट म्हणजेच दातांचे रोपण असे म्हणतात. इम्प्लांट पद्धतीने बसवलेला / बसवलेले दात खऱ्या दातासारखेच दिसतात.

इम्प्लांटचे फायदे:
दाताला आधार देणाऱ्या पक्क्या प्रोस्थेसिसप्रमाणे इम्प्लांट्स खराब होत नाहीत, तसेच ते किडतही नाहीत. हे उपचार मिनिमली इन्वेजिव (कमीत कमी शस्त्रक्रिया असलेले) असल्यामुळे यात फारशा वेदना, अवघडलेपण, रक्तस्राव किंवा सूज येण्याचा प्रकार नाही. कम्प्युटरद्वारे करण्यात येणारे हे नवीन प्रोस्थेसिस स्वच्छ करणे व त्यांची देखभाल राखणे अधिक सोपे आहे. मुख्य म्हणजे इम्प्लांट्स दीर्घकाळ टिकतात. शिवाय, आर्थिकदृष्ट्याही आता ते सर्वसामान्यांना परवडण्याजोगे झाले आहेत.

इम्प्लांट्स कोणावर करता येते? आणि कोणावर नाही?

  • हाडे चांगल्या स्थितीत असलेल्या १६ वर्षांहून अधिक वयाच्या सर्व निरोगी व्यक्तींवर हे उपचार केले जाऊ शकतात.
  • हाडांचे विकार किंवा अनियंत्रित मधुमेह असलेल्या, धूम्रपान किंवा मद्यपानाचे व्यसन असलेल्या तसेच मानसिक आजार असलेल्या व्यक्तींवर हे उपचार करता येत नाहीत.
  • काही आजार असल्यास रुग्णाने तशी कल्पना आपल्या डेंटिस्टला द्यायला हवी.

इम्प्लांट्सचे प्रकार:
बहुतेक आधुनिक इम्प्लांट्स हे मुळाकडे इंट्रा-बोनी (खालच्या बाजूला कमी हाड असलेले) प्रकारचे असतात. ते (इम्प्लांटचा वरील भाग) एक किंवा दोन तुकड्यांमध्ये विभागलेला असतो. पक्के बसवलेले (फिक्स्ड) आणि काढण्या-घालण्याजोगे (रिमूव्हेबल) प्रोस्थेसिस हे इम्प्लांटचे दोन प्रकार आहेत.

काढण्या-घालण्याजोगे इम्प्लांट्स एका अब्यूटमेंट (टेकू) स्क्रूद्वारे घट्ट बसवले जातात. प्रोस्थेसिस सिमेंटने चिकटवले जातात किंवा टेकू म्हणून स्क्रू ठेवला जातो. काढण्या-घालण्याजोग्या कवळीमध्ये छोटा बॉल कॅच, चिप आणि बार किंवा चुंबक बसवलेला असतो. सैल झालेली कवळी २ किंवा ४ इम्प्लांट्स स्क्रूच्या मदतीने स्थिर करता येते आणि या कवळीचा खर्च ५० हजार ते १ लाखादरम्यान जातो. सिरॅमिक तसेच सिरॅमिक व धातूच्या मिश्रणातून तयार केलेले फिक्स्ड क्राउन्स आणि ब्रिजेस यासाठीचा खर्च त्यांचे काम किती गुंतागुंतीचे आहे, यावर अवलंबून असतो. त्यांचा (साधारण २८ दातांचा) खर्च ५-६ लाख रुपयांपर्यंत जाऊ शकतो. इम्प्लांट्सचा खर्च प्रत्येकी १० ते ४० हजार रुपयांपर्यंत जातो. हा खर्च इम्प्लांट्सचा प्रकार, दर्जा व अचूकता यावर अवलंबून असतो. खर्चाचा हा आकडा प्रत्येक डेंटिस्टनुसार वेगळा असू शकतो. इम्प्लांट्स मुख्यतः अमेरिका, युरोप आणि इस्रायल व कोरियातून येतात.

इम्प्लांट्सची प्रक्रिया:
इम्प्लांट्स जबड्याच्या हाडामध्ये हिरड्यांखाली बसवण्याच्या प्रक्रियेत या भागातील ऊतींना धक्का बसणार नाही, याची काळजी घेतली जाते. तसेच यात किमान छेद द्यावा लागत असल्याने फारसा त्रास होत नाही. २-३ महिन्यांनंतर अब्यूटमेंट (टेकू) इम्प्लांट्सच्या वर पक्की बसवली जाते आणि बाइट अँड शेड पद्धतीने ठसे घेऊन मापे निश्चित केली जातात. ही मापे दंतवैद्यकीय प्रयोगशाळेत पाठवली जातात. येथे अगदी दातांसारखी दिसणारी व जाणवणारी कवळी, क्राउन किंवा ब्रिज तयार केले जातात. या कृत्रिम दातांचे रोपण केल्यावर एक पूर्णपणे नवीन व मोहक असे स्मितहास्य त्या व्यक्तीला मिळते. या कृत्रिम दातांचा उपयोग त्या व्यक्तीला अर्थातच अन्न चावण्यासाठी तसेच आरोग्य व रूप सुधारण्यासाठी होतो.

देखभाल आणि काळजी:

  • प्रोस्थेसिस टूथब्रश (इलेक्ट्रिक / सोनिक) किंवा फ्लॉसरच्या मदतीने इम्प्लांट्स / दात चांगले स्वच्छ करायला हवे, जेणे करून हिरड्यांच्या समस्या निर्माण होऊ नये.
  • दातांचे आरोग्य चांगले आहे ना, तसेच आपल्याला अन्नपदार्थ नीट चावता येतात ना, याची खात्री करण्यासाठी दर सहा महिन्यांनी
    किंवा वर्षाने दंतवैद्याची भेट घ्यायला हवी.

अजुन काही महत्त्वाचे लेख वाचण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.


डॉ. मिलिंद करमरकर

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Hi there! Welcome to the all-new Kalnirnay website. We have worked on enhancing your experience here, and we hope you enjoy the new look and feel of our website.

We’re still working on adding the last few polishing touches, so if you find a few things missing or broken, please don’t be alarmed. Our team is hard at work on fixing them.

 

Thank you for your support & patience!