जयवंत दळवी | कालनिर्णय

कालनिर्णयानुसार एक दिवस

 

अलीकडेच वयामानानुसार निवृत्त झालो! त्यामुळे दिवसभर रिकामा असतो. रिकामा आणि कामात या दोन्ही शब्दांना तसा फारसा अर्थ नाही. रिकामा माणूस घराबाहेर रिकामटेकडा फिरला तर तो कामात असल्यासारखा वाटतो. आणि त्यानेच घरात काम केलं – विशेषत: बायकोच्या हाताखाली काम केलं तर तो रिकामटेकडा वाटतो! सध्या माझी तशी स्थिती झाली आहे.

‘कालनिर्णया’ ची मागील पाने वाचण्याचा माझा जुना छंद! त्यातल्या अनेक गोष्टी निवृत्तीनंतर करायच्या असं मी पूर्वीच ठरवलं होतं. पुरवी मी कधीही उठत असे.आता मी पहाटे पाच वाजून एक मिनिटाने किंवा दोन मिनिटाने उठतो. कारण सहा वाजून एक मिनिटाने किंवा डून मिनिटाने सूर्योदय होतो. योगाचार्य सदाशिवराव निंबाळकर यांनी योगाभ्यास सुर्योदयापूर्वी करावा असं सांगितलं आहे.

तदनुसार मी पहाटे उठलो. ‘हवेशीर प्रसन्न जागी (म्हणजे आमच्या कोंदट खोलीतच) हलक्या पोटी, प्रसन्न मनोकायिक अवस्थेत’ मी सुलभ उत्तान शुष्क गजगरणी’ करीत होतो. जमिनीवर उताणं झोपून श्वास कोंडून नाक दाबत होतो, तोच ही आली. मी उताणा किंवा आडवा पडून कुठलही योगासन करू लागलो की मी आळसाने लोळतो आहे असा हिचा समज होतो! म्हणाली, “पुरे, झालं तुमचं आळसासन! बाटल्या घेऊन दूध आणायला जा!” सुलभ उत्तान शुष्क गजगरणी बोंबललं!

दूध घेऊन घरी आलो. अजिबात योगाभ्यास झाला नाही असं वाटायला नको म्हणून थोडसं ‘शवासन केलं! हे ‘शवासन’ मला फार आवडतं! हे केलं की एक योगासन केल्यासारखं वाटतं, आणि झोपायलाही मिळतं! तेवढ्यात ही आली. म्हणाली, “पुरे झालं तुमचं घोरासन!” बहुधा मी घोरत होतो. मी जागा झालो. म्हणाली, “लवकर उठा आणि चारशे ग्रॅम फ्लॉवरचा खिमा करून द्या!” हो ! आज कालनिर्णयातला शाकाहारी खिमा करायचं ठरवलं होतं. मांसाहारी खिमा झालाय सत्तावीस रुपये किलो! तो आता पुढल्या जन्मी परत नोकरीला लागल्यावर!

मी डायटिंग टेबलापाशी गेलो. तर तिथं चारशे ग्रॅम फ्लॉवर पाल्याचा मफलर गळ्याला गुंडाळून बसला होता. तो पालाच जवळजवळ दोनशे ग्रॅम होता. तोही खिम्यात घालायचा की खिम्याबरोबर सॅलेड म्हणून खायचा ते कालनिर्णयात लिहिलं नव्हतं. आता ही जो काही निर्णय घेईल तो! फ्लॉवरच्या शेजारी एक कांदा, दोन मध्यम टोमॅटो, एक इंच आलं आणि चार लसूण पाकळ्या वगैरे मंडळी बसली होती.मी सुरी शोधू लागलो.तेवढ्यात ही म्हणाली, “आधी गच्चीत जाऊन कुंडीतल्या दवाखान्यातील कोथिंबीर घेऊन या! बापट उड्या मारायला वर गेले की आमची कोथिंबीर गेली!” आमचा कुंडीतला दवाखाना गच्चीत आहे! कोथिंबीर, पुदिना, पानवेल वगैरे. कुंड्या मी शिंपतो. दवाखाना दुसरेच कुणीतरी खातात कोणी खातात ते ही कळत नाही. काल दुपारी जिना चढत होतो, तर पहिल्या मजल्यावरच्या जोशींच्या घरातून कोथिंबिरीच्या वडीचा वास येत होता. पण विचारायची चोरी!

वर गेलो. बापट कुंडीतल्या दवाखान्यातली पानवेलीची पाने खुडत होते. पण बोलायची चोरी. उलट, मलाच चोरासारखं वाटू लागलं! कारण बापट तो दावाखता आपल्याच मालकीचा समजून पानं खुडत होते, आणि वर कालनिर्यातला मजकूर पाठ केल्याप्रमाणे मलाच ऐकवीत होते – जेवणानंतर तांबूल खाल्ल्याने अन्नाच पचन चांगलं होतं. पान दुर्गंधीनाशक आणि तोंडाला रुची आणणारं आहे! वगैरे. मी ऐकून घेतो. लाल तोंडानं लाल फवारा उडवीत ते सांगत असतात. तरी मी ऐकून घेतो! करणार कायं! पण खाली जाताना माझ्या जिन्यावर लाल चिंधी पसरल्याप्रमाणे मोरपिसं उडवतात. त्याचा मात्र मला संताप येतो.

“तुम्हाला पानं पाहिजेत?” असं बापटांनी मला उदार मनानं विचारलं. मी म्हटलं, “नको! कोथिंबीर हवी होती!” ते म्हणाले, “खालच्या जोशीकडे माग!” आणि ते फवारा उडवीत हसले! कुंडीतला दवाखाना रिकामा होता. “धणे तयार होण्यापूर्वी कोवळ्या वनस्पतीला कोथिंबीर म्हणतात.  कोथिंबीर प्रामुख्याने स्वयंपाकाच्या पदार्थात वापरली जाते.” वगैरे कुसुमताई अंतरकरांचा मजकूर आठवत मी रिकाम्या हातांनी खाली उतरलो.

मी खिमा करण्यासाठी सुरी शोधू लागलो. ही सुद्धा सुरी शोधत होती. आणि मनातल्या मनात जोशी आणि बापट यांचा खिमा सुद्धा करीत होती.  मला हवलेली वस्तू शोधायला फार आवडतं. त्यामुळे वेळ जातो, आणि शोधी लागतात!  सुरी शोधताना हिच्या कंगव्याचा शोध लागला. तेवढ्यात तेल संपल्यामुळे स्टोव्ह गेला. स्टोव्हमध्ये तेल घालण्यासाठी रॉकेलचा डबा वाकडा केला, तर त्यातून सुळकन सुरी बाहेर पडली. मीच ती चार दिवसांपूर्वी तेलात सोडली होती. ‘हे केऊन पाहा!’ मध्येच वाचलं होतं. “पुष्कळ गंज चढलेली वस्तू रॉकेल तेलात बुडवून ठेवा!”

थोड्या वेळाने चंद्राबाय आली. ही मोलकरीण. एक तपेलं उचलून दाखवत म्हणाली, “भांड्यात जेवण करपलं तर भांडं पाणी घालून भिजत ठेवावं आणि नंतर लाकडी कालथ्यानं खरपडावं! कालनिर्णयात लिहिलंय!” तिचं ते शहाणपण ऐकून हिला आणि विशेषत: मला लाजल्यासारखं झालं! ‘हे करून पाहा’ मध्ये तिनं वाचलं होतं. पण ‘हे करून पाहा’ मध्ये वाचूनच आमच्या हिने “लोखंडी कढईत भाजी करून नंतर दुसऱ्या भांड्यात काढून ठेवली – लोह मिळवण्याचा मार्ग म्हणून” तर हिच चंद्राबाय एका भाजीसाठी दोनदोन भांडी घासायला टाकता, म्हणून ओरडली होती! असो! मोलकरणीचं ओरडणे गुपचूप ऐकून घ्यावे!

आता ही रॉकेलमधली सुरी साबणाने घासण्यापेक्षा शाकाहारी खिमा उद्या केलेला बारा असे म्हणून मी सर्व भाज्या बाजूला ठेवून दिल्या.

ही म्हणले, “मग फणसाचे कबाब करू का?”

मी कालनिर्णयातला ‘या महिन्याचा मेनू’ वाचून पाहिला. पाचशे ग्रॅम कच्चा फणस..पाऊण वाटी हरबऱ्याची डाळ..एक कांदा..म्हणजे खाली उतरून फणस आणायला पाहिजे! आणि तोही पाचशे ग्रॅम मिळणार नाही!

मी म्हणालो, “तू असं कर! तू आज पिठलं-भातच कर! खूप दिवसात झणझणीत पिठलं खाल्ल नाही!

जेवणाच्या वेळी भात कुठला आणि पिठलं कुठलं  ते कळेना एवढा भात पातळ झाला होता! मी करवादून ओरडलो, “यातला भात कुठला ते जरा सांगशील का?” त्यावर ती शांतपणे म्हणाली “हा भात नव्हे, ही भाताची कांजी! प्रकृतीला बरी! जानेवारीच्या पानामागे वाचा. ज्योत्स्ना वणकुद्रे आणि मालती कारवारकर यांनी सांगितलेली ही भाताची कांजी!” तिने जानेवारीचे पान काढून माझ्या हातात दिले. मजकूर वाचून भाताची कांजी पोटात टाकू लागलो.


जयवंत दळवी

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.