बाहेरगावी जाताना झाडांची निगा

प्रत्येकास आपली स्वतःची अशी बाग असावी अशी इच्छा असते. फळझाडे नसली तरी किमान फुलझाडे तरी असावी अशी इच्छा असते. ही हौस घरातील गॅलरीत कुंड्यांमध्ये फुलझाडे लावून पूर्ण केली जाते. पूर्वी चाळीमध्ये घराबाहेर कुंड्यांमध्ये जास्वंद, झेंडू, मोगरा, शेवंती, गुलाब, गुलबक्षी, रातराणी, तुळस, कोरफड, सदाफुली यासारखी अनेक झाडे लावली जात असत. घरातील कुंड्यांमध्ये फुललेली जास्वंद देवाला वाहताना, फुललेला गुलाब केसांत माळताना, फोडणीसाठी कुंडीतील कढीपत्ता वापरताना, पुदिना अथवा कोथिंबीर वापरताना गृहिणीला होणारा आनंद हा प्रत्यक्ष अनुभवायचा असतो, तो सांगता येत नाही. अनेकांनी तर इमारतीच्या गच्चीवर बाग फुलवलेली आहे व ते फळभाज्या, फळे, फुले यांचे नियमित उत्पादन घेतात. पूर्वी चाळीत राहण्याचा एक फायदा असा असायचा की काही दिवस फिरावयास गेल्यास झाडांची काळजी शेजारी घेत असत. अगदी निःसंकोचपणे शेजाऱ्यास पाणी घालण्यास सांगून जाता येत असे. आजही अनेक चाळकऱ्यांचा हा अनुभव असेल.
फ्लॅटमध्येही कुंड्यांमध्ये झाडे लावली जातात. परंतु खरी समस्या कामानिमित्त अथवा बाहेरगावी फिरायला जाताना झाडांना पाणी घालण्याची असते. या समस्येवर सोपा उपाय रसायनशास्त्रामधील शिक्षणाच्या आधारावर शोधून काढला आहे. रसायनशास्त्रांमध्ये, Chromatography (वर्णलेखा-शास्त्र)- रासायनिक पृथक्करणाची एक पद्धत आहे, यामध्ये द्राव्य जे असते (उदा. पाणी) ते capillary action (केशिका क्रिया – अरुंद जागेत पाण्याची गुरुत्वाकर्षणाविरुद्ध वर चढण्याची क्रिया)ने वर चढते (अथवा खाली उतरते.) या तत्त्वावर आधारित झाडांना पाणी घालण्याची पद्धत विकसित केली आहे. मे महिन्यात तसेच गणपतीसाठी गावाला जाताना ६ ते ७ दिवसांसाठी केलेला हा प्रयोग यशस्वी झाला. दोन वेळा यश मिळविल्यावर सर्वांना उपयोगी व्हावा यासाठी कालनिर्णयच्या माध्यमातून सांगत आहे‧ कुंड्यांना आपण भरपूर पाणी घालतो, परंतु माती तिच्या क्षमतेनुसार पाणी धरून ठेवते व अतिरिक्त पाणी बाहेर जाते. या प्रयोगाद्वारे कमीतकमी पाणी योग्य प्रकारे अनेक झाडांना देणे शक्य आहे.
प्रयोग अतिशय सोपा आहे‧ एका (शक्यतो सुती) कपड्याचे साधारण १ ते २ इंच रुंदीचे, लांब तुकडे करावेत‧ कपड्याची लांबी ही बादली व कुंडी यांच्या अंतरावर अवलंबून असेल. जितक्या कुंड्या तितके तुकडे करावेत‧ कपड्याचे एक टोक कुंडीतील मातीत तर दुसरे टोक एका पाण्याने भरलेल्या बादलीत पाण्याच्या तळाशी ठेवावे.असे प्रत्येक कुंडीसाठी करावे‧ एका बादलीतून कमीतकमी ५ ते ६ कुंड्यांना पाणी घालता येऊ शकते. capillary action ने पाणी कपड्याद्वारे वर चढते व कुंडीतील मातीपर्यंत पोहोचते व झाडे टवटवीत राहतात.
प्रयोग अधिक यशस्वी होण्यासाठी पाण्याची बादली वर ठेवावी व कुंड्या खाली ठेवाव्या जेणेकरून बादलीतील पाण्याची पातळी कमी झाली तरी पाणी कपड्याबरोबर खाली उतरण्यास कोणतीही अडचण येणार नाही. लागणारे पाणी हे कुंड्यांचा आकार व संख्या यावर अवलंबून असेल. साधारण सहा मध्यम आकाराच्या कुंड्यांसाठी ८ ते १० लिटर पाणी आठवडाभर पुरते. पाण्याचा योग्य अंदाज येण्यासाठी बाहेरगावी जाण्यापूर्वी हा प्रयोग १ ते २ वेळा करून पाहावा.
काही महत्त्वाच्या सूचना :
१‧ शक्यतो सुती कपडा वापरावा.
२‧ पाण्याची बादली ही कुंडीच्या पातळीत असावी‧ कुंडीच्या पातळीच्या वर असल्यास उत्तम.
३‧ कपडा capillary action ने भिजत असला तरी, भिजवून एक टोक कुंडीतील मातीत तर दुसरे टोक एका पाण्याने भरलेल्या बादलीत तळाला बुडवावे.
४‧ बादलीमधून कुंडीमध्ये जाणारा कपडा शक्यतो लोंबकळणार नाही याची काळजी घ्यावी, कारण त्यामुळे पाणी वाया जाण्याची शक्यता असते.
५‧ कपड्याचे टोक पाण्याने भरलेल्या बादलीत तळाला बुडेल याची काळजी घ्यावी अन्यथा पाण्याची पातळी कमी झाल्यास प्रयोग यशस्वी होणार नाही.
६‧ डासांचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी बादली हलक्या अॅल्युमिनिअम फॉइलने झाकावी.
७‧ बादलीऐवजी पाच लिटरच्या जुन्या बिसलेरी कॅनचा वापर करता येऊ शकतो. त्याच्या अरुंद तोंडातून कपडा बाहेर काढून पाण्याचे बाष्पीभवन टाळता येईल व डासांचा प्रादुर्भावही कमी होईल.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.