राग | Anger Management | Biology of Anger | Anger Management Therapy

तळपायाची आग – डॉ. जान्हवी केदारे

 

रात्रीचे साडेनऊ वाजले होते. शुभांगीने घरात पाऊल ठेवले आणि बाबा कडाडले(राग आला), “किती वाजलेत? वेळेच काही भान आहे की नाही? कुठे गेली होतीस भटकायला? काहीच शिस्त राहिलेली नाहीये, कॉलेजला जायला लागल्यापासून. आम्हीही अभ्यास केले, पण अशी थेरं नाही केली कधी…” शुभांगीने बोलायचा प्रयत्न केला, “बाबा, अहो ऐकून तर घ्या…” पण छे. बाबांचे सुरूच राहिले, “काहीही ऐकून घ्यायचं नाहीये मला. उद्यापासून कॉलेज संपल्यावर तडक घरी यायचं. समजलं?” बाबांचा पारा इतका चढलेला पाहून शुभांगीला बोलण्यासारखे काही नव्हतेच. तिला रडू कोसळले. पण रडण्याचीही चोरी, नाहीतर पुन्हा त्यांच्या तोंडाचा पट्टा(राग) सुरु झाला असता, “आता गंगा-यमुना नकोत. मुकाट्याने सांगितलं तसं करा.” शुभांगीचे वडील अतिशय जुन्या वळणाचे. शिस्तप्रिय असा त्यांचा खाक्या. त्यामुळे जरा त्यांना शिस्तीबाहेर झालेले चालत नसे.

असे अनेक प्रसंग आपल्या दैनंदिन आयुष्यात घडत असतात. थोडे काही मानाविरुद्ध झाले की कोणाच्या तळपायाची आग मस्तकात जाते, तर कोणाच्या अंगाची लाही लाही होते, कोणी रुसून बसते, गाल फुगवून बसते तर कोणी रागाने वेडेपिसे होते. कोणी स्वभावानेच रागीट, तर कोणी स्वभावाने शांत. कोणी चिडखोर तर कोणी समजूतदार!

“आई, आज मी नोकरी सोडली. सततचा अन्याय मी नाही सहन करणार. मुद्दाम मला जास्त काम सांगायचे, कोणी मदतही करायची नाही आणि मी एकट्याने काम वेळेवर पूर्ण न केल्याबद्दल ओरडा खायचा. आज मात्र मी बॉसशी चक्क भांडलो. त्याला चांगले सुनावले. का म्हणून मी त्याचं सारं ऐकून घ्यायचं? नाहीतरी मला हे काम नकोच आहे. माझी स्वप्नं तुला माहित आहेत. मला खरं तर स्वत:चा व्यवसाय करायचा आहे. कोणाचं मिंधं व्हायलाच नको. मग मी का करू यांना सहन?” आपल्या मुलाने परत एकदा नोकरी सोडली हे पाहून आईने कपाळाला हात लावला. का असे करतो हा? तीन वेळा चांगली नोकरी सोडली ह्याने? आणि तीही न पटल्यामुळे? सतत राग मनात ठेऊन? का हा एवढा रागावतो?

 

सगळ्यांनाच हा प्रश्न पडतो. आपण का रागावतो?

राग ही आपल्या मनातली अशी भावना आहे, की जी आपण कशाने तरी दुखावले गेल्यावर किंवा आपल्याला कोणतेही दु:ख असल्यावर मनात निर्माण होते. मनातले दु:ख व्यक्त केले नाही, तर राग मनात साठून राहतो. खूप वेळा ज्यांना राग येतो त्यांची काही विशिष्ट मते असतात, मनोधारणा असते. लोक आपल्याला मुद्दाम त्रास देतात, आपल्यावर नेहमी अन्याय होतो, असे काही जणांना वाटते. कोणाला एकूणच समाजात अनेक चुकीच्या गोष्टी घडताहेत असे वाटत राहते आणि मन निराश होते. त्यातून राग यायला लागतो. हे राग एकूणच सगळ्या परिस्थितीवरचा असतो आणि मग तो त्यांच्या आयुष्यातल्या अनेक छोट्यामोठ्या प्रसंगांमधून व्यक्त होत राहतो. अपेक्षाभंगाचे दु:ख मोठे असते. ते पचवता आले नाही, तरी संताप येतो आणि मग सगळ्यांनाच आपल्या अपेक्षाभंगासाठी जबाबदार धरले जाते. आपल्या आजूबाजूची माणसे आणि परिस्थिती सतत आपल्या नियंत्रणाखाली राहिली पाहिजे, असे वाटणारे फार कडक स्वभावाचे असतात. त्यामुळे ‘मी म्हणेन तसेच घडले पाहिजे’ अशी त्यांची अपेक्षा असते. त्यांच्या मनाविरुद्ध किंवा त्यांच्या नियमात न बसणारे काही घडले, तर त्यांना चालत नाही आणि त्यांच्या तळपायाची आग मस्तकाला जाऊन भिडते. आपल्याकडे असे म्हणतात की, भांड्याला भांडे आपटले तर आवाज होणारच. पण आपल्या मतापेक्षा वेगळे मत ऐकण्याची सवय नसेल, तर त्यातून भांडण होते.

राग आल्यावर तो व्यक्त करण्याची, वागण्याची तऱ्हाही वेगवेगळी असते. शुभांगीच्या वडिलांसारखा स्वभाव असणारे लोक खूप आरडाओरडा करतात, त्यांची जीभ अतिशय तिखट बनते आणि समोरच्याच्या मनाला लागेल असे काहीतरी ते बोलतात. काही जण टोचून, टोमणे मारून बोलतात. त्यासाठी आवाज चढवण्याचीही गरज नसते. तरीही समोरचा माणूस समजून चुकतो आणि दुखावला जातो. रमेशसारख्या माणसाला राग आवरत नाही. अनेक ठिकाणी आपण अशी माणसे बघतो. रागावर ताबा न राहिल्यामुळे ती वागण्यावरचे नियंत्रण गमावून बसतात आणि हमरीतुमरीवर येतात. बसमध्ये, ट्रेनमध्ये चढता-उतरताना, रांगेमध्ये, ट्रॅफिकमध्ये, सिग्नलवर अनेक ठिकाणी अशी माणसे आपल्याला भेटत राहतात. अशा वेळी ‘या लोकांपासून जरा दूरच राहिलेले बरे’, ‘त्यांच्या तोंडी कोण लागणार?’ असे म्हणत आणि भांडणे, वादविवाद टाळण्याचा प्रयत्न आपण करतो.

रागाचे दुसरे स्वरूप म्हणजे स्वत:ला त्रास करून घेणे. उदा. न जेवणे, अबोला धरणे आणि त्यातून समोरच्याचा अंत पाहणे आणि या प्रकारे त्याला शिक्षा देणे (‘इमोशनल ब्लॅकमेलिंग’)! रागाच्या अशा अप्रत्यक्ष हल्ल्यामुळे समोरचा माणूस भांबावून जातो, दु:खी होतो.

 

राग येतो म्हणजे काय?

आपल्या मनात राग येतो म्हणजे नक्की कुठे येतो? तर आपल्या मेंदूतल्या वेगवेगळ्या क्रियांमधून तो तयार होतो. मेंदूतले काही भाग भावनांवर नियंत्रण ठेवतात. एक छोटासा बदामाच्या आकाराचा भाग (amygdale) आपल्या भोवतालच्या परिस्थितीत कुठे धोका नाही ना, ते पाहतो. थोडासा धोका जाणवला, तरी हा भाग उद्दीपित होतो आणि आपल्या सुरक्षेसाठी राग निर्माण करतो. त्याचे आपल्या वागण्यावर तितकेसे बंधन राहत नाही. त्यामुळे राग आल्यावर वागायचे कसे, हे आपल्या मेंदूतील सर्वात पुढचा, मोठ्या मेंदूचा भाग (prefrontal cortex) ठरवतो आणि आपल्या हातून रागाच्या भरात काही वेडेवाकडे घडू देत नाही. राग आल्यावर मेंदूतील काही रसायनांचे प्रमाण वाढते. त्यामुळे आपल्या हृदयाचे ठोके वाढतात, रक्तदाब (ब्ल्डप्रेशर) वाढतो, श्वास जोरजोरात सुरु होतो. काही जणांना घाम फुटतो, बेचैनी वाढते.

 

रागाचे आरोग्यावर होणारे परिणाम :

राग आणि मेंदूतील प्रक्रिया यांचे नाते पाहिल्यावर लक्षात येते, की रागाचे आपल्या आरोग्यावर अनेक दूरगामी परिणाम होत असतात. सतत राग म्हणजे पुन्हा पुन्हा रक्तदाब वाढणे. तसे झाल्यास हृदरोगाचा धोका वाढतो, शरीराची प्रतिकारशक्ती कमी होते आणि त्यामुळे सहजपणे विविध आजारांशी गाठ पडते म्हणजे, साध्या तापापासून कॅन्सरपर्यंत! विश्वास बसत नाही ना? पण हे खरे आहे. याचबरोबर आपल्या मन:स्थितीवरही रागाचा विपरीत परिणाम होतो. सततच्या चिडचिडेपनामुळे उदासीनता, निराशा यांनी माणूस ग्रस्त होऊ शकतो.

 

रागावर नियंत्रण कसे मिळवावे?

राग नष्ट करणे कठीण असले, तरी तो नियंत्रणात आणणे गरजेचे असते. जेव्हा रागाचे दुष्परिणाम भोगावे लागतात उदा. नोकरी गमवावी लागते, नातेवाईक दुरावतात, कोर्टकचेऱ्या करण्याची वेळ येते, एखाद वेळेस पती/पत्नीशी सततच्या भांडणातून घटस्फोटापर्यंत मजल जाते तेव्हा आपल्या रागावर काही उपाय केला पाहिजे असे वाटू लागले.

राग येणे ही भावना आपण शिकतो ते कधी आई-वडिलांच्या, शिक्षकांच्या वागण्यातून, कधी आपल्यावर एखाद्याने केलेला अन्याय सहन करण्यातून तर कधी समाजात वावरताना. बलाचा, हिंसेचा म्हणजेच संतापाचा वापर केल्यावर आपल्याला हवे ते मिळते, असे आपण पाहिलेले असते. पण हे चुकीचे वर्तन आहे. राग कमी करायचा म्हणजे चुकीचे जे शिकलो आहोत ते विसरून नवीन आणि चांगले उपाय शिकायचे – प्रश्न सोडविण्याचे, भावना व्यक्त करण्याचे, परिस्थितीला तोंड द्यायचे.

 

रागावर नियंत्रण मिळविण्याचा मंत्र काय?

१. तो सोपा नसला, तरी प्रयत्नांती नक्कीच शक्य आहे. – सर्वप्रथम मला राग सोडायचा आहे, हा निश्चय करणे महत्त्वाचे. त्यासाठी आवश्यक ती मदत घेणेही गरजेचे. यासाठी कौन्सिलर, सायकोलॉजिस्ट यांचा सल्ला जरूर घ्यावा. एखादे वेळेस कोणत्याही मानसिक विकारामुळे रागाचे प्रमाण वाढलेले नाही ना, हेसुद्धा सायकिअॅट्रिस्ट (psychiatrist)ला दाखवावे लागते.

२. राग येतो आहे, असे वाटल्यावर आपल्या वागणुकीत बदल करायचे आहेत. त्यासाठी मार्गदर्शन घ्यावे :

अ) राग दैनंदिनी : सर्वात प्रथम आपल्याला राग कोणत्या परिस्थितीत येतो हे पाहावे. त्यासाठी एका रोजनिशीत आपल्याला कधी, कशामुळे राग आला त्याची नोंद ठेवावी. तसेच तेव्हा मनात काय काय भावना होत्या, कोणकोणते विचार होते तेही लिहावे.

ब) शिथिलीकरण : राग यायला सुरुवात झाली, की काही कृती कराव्यात. संपूर्ण शरीर शिथिल करण्याची क्रिया शिकून घ्यावी. १५-२० मिनिटे वेळ स्वतःला शिथिल करून शांत करावे.

क) श्वासोच्छवास : दीर्घ आणि खोल श्वसन सुरु करावे. १ ते ४ आकडे मनात म्हणत पोट, छाती आणि खांद्यापर्यंत छाती फुगवून श्वास घ्यावा आणि १ ते ८ आकडे होईपर्यंत हळूहळू सोडवा. यामुळे मेंदूतील आपल्याला उद्दीपित करणारी रसायने उद्दीपित होत नाहीत.

ड) आपला राग वाढत चालला आहे असे लक्षात आले, की आपण जिथे आहोत, तिथून काही मिनिटांपुरते तरी दूर निघून जावे. यामुळे मनातल्या भावनांची तीव्रता कमी व्हायला मदत होते.

३. आपल्या विचारांच्या पद्धतीत बदल करायचा आहे, ज्या योगे राग कमी वेळा येईल किंवा येणारच नाही.

१) वास्तव परिस्थितीचे भान : एखादा माणूस मुद्दाम चुकीचे किंवा अन्यायकारक वागतो असे ठरविण्याआधी त्याची बाजूही लक्षात घेतली पाहिजे. उदा. शुभांगी उशिरा आली तर ती मुद्दाम नियम मोडू पाहते आहे, असे न म्हणता तिला कारण सांगायला वाव दिला पाहिजे. एका परिस्थितीची अनेक कारणे असू शकतात.

२) सर्व काही काळे किंवा पांढरे नसते : ‘नेहमी असेच घडले पाहिजे’ किंवा ‘असे घडणे शक्यच नाही’ अशा प्रकारे विचार केला की गडबड होते. विविध प्रकारे एका गोष्टीचा विचार करता येतो, एकाच प्रश्नाकडे पाहण्याचा दृष्टीकोन प्रत्येकाचा वेगळा असू शकतो, अशी लवचिकता विचारात आणावी लागते.

या सगळ्यासाठी कुटुंबातील सदस्यांचे किंवा एखाद्या मित्रमैत्रीणीची मदत अवश्य घ्यावी. राग आल्यावरचे आपले वागणे, इतरांची विचार करण्याची पद्धत याविषयी आपण त्यांच्याशी चर्चा करू शकतो. आपले प्रयत्न योग्य दिशेने चालले असल्याची ग्वाही देऊन ते आपल्याला प्रोत्साहित करू शकतात. या प्रयत्नांच्या मदतीने रागीट स्वभावाकडून आपला प्रवास शांत स्वभावाकडे सहजसाध्य करणे शक्य होऊ शकते.

अजुन काही महत्त्वाचे लेख वाचण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.


डॉ. जान्हवी केदारे

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.