स्वयंपाकघरातील औषधी रत्ने…

Published by वैद्य सत्यव्रत नानल on   May 3, 2019 in   2016Health Mantraमराठी लेखणी

आयुर्वेद, आजीबाईचा बटवा, औषधी आहार अशा अनेक प्रकारे आजपर्यंत अनेक वेळा आयुर्वेदाची व्यवहार्यता लोकांच्या पाहण्यात, वाचनात येत आहे. त्यामुळे या विषयाचे महत्त्व पटवून देण्यात वेळ आणि शब्द वाया न घालवता सरळ मुख्य मुद्यावर येऊया.

​स्वयंपाकघरात असलेल्या पदार्थांचा, स्वस्थ व्यक्तींसाठी तसेच अनेक रोग किंवा लक्षणांमध्ये कशा प्रकारे वापर केला जाऊ शकतो हे पाहूया.

​१. दालचिनी – सर्दी असल्यास आल्याचा ताजा रस आणि मध घेण्याची पद्धत आजही अनेक घरांत आहे. लहान मुलांपासून ते मोठ्या माणसांपर्यंत सर्वांना याचा फायदा होतो. पण बरेच दिवस हे करूनही जर उपाय होत नसेल आणि छातीत कफ भरल्याने श्वास लागण्यास सुरुवात झाली असेल, तर मग दालचिनीचे १ ते २ चिमूट चूर्ण अर्धा चमचा मधाबरोबर चघळावे. दम लागणे कमी होते. कफ आणि सर्दीही कमी होते. गरजेप्रमाणे एक ते तीन दिवस करावे. (निषेधः पित्ताची सवय असलेल्यांनी हा प्रयोग जास्त वेळा करू नये. तसेच जास्त दिवस हा उपाय केल्यास कफ छातीत सुकतो आणि पुढे खोकला वाढू शकतो.)

​२. लसूण – हृद्यावर, रक्तातील चरबीवर गुणकारी असे अनेक गोडवे लसणाबद्दल गायले जातात. किती लोकांना फायदा होतो हा वादाचा मुद्दा. पण लसूण गुणकारी आहे हे नक्की. कशासाठी तर पुढील दोन मुख्य गोष्टींसाठी –

​अ) लहान मुलांना पोटात जंत आणि वारंवार सर्दी होत राहून त्यांची श्वसनसंस्था कमजोर होते. त्यामुळे वजन वाढत नाही आणि सारखे आजारपण सुरू असते. अशा वेळी ३ लसूण पाकळ्या, ३० वावडिंगाचे दाणे, १ कप गायीचे दूध आणि अर्धा कप पाणी एकत्र उकळावे. पाणी आटवून दूध शिल्लक ठेवावे. कोमट झाल्यावर गाळून त्यात चवीपुरती साखर घालून लहान मुलांना रोज सकाळी रिकाम्या पोटी पाजावे. असे दोन महिने केल्यावर त्याचा फायदा दिसू लागतो.

​आ) संधिवात असलेल्यांनी लसूण आणि सुके खोबरे एकास दोन या प्रमाणात एकत्र करून ठेवावे. रोज रात्री जेवणाबरोबर १ चमचा मिश्रण खावे आणि रात्री झोपताना १ चमचा एरंडेल प्यावे. हाडांची झीज कमी होते. हाडे बळकट होतात आणि सांधेदुखीही कमी होते.

​(निषेधः पित्ताचा त्रास असताना, उन्हाळ्यात लसूण घेऊ नये.)

​३. जिरे ( नवप्रसूत स्त्रीने प्रसवानंतर लगेच एक महिनाभर तरी रोजच्या जेवणात १-१ चमचा जिरेपूड खावी. याने गर्भाशय-शुद्धी होऊन पुढे होणारे गर्भाशयाचे त्रास टाळता येतात. पण त्यात सहपथ्यही तितकेच महत्त्वाचे.

​(विशेष सूचनाः मळाचे खडे होण्याची सवय असल्यास प्रमाण निम्मे करावे.)

​४. जायफळ – पाण्यासारखे पातळ जुलाब होत असल्यास जायफळ चूर्ण अर्धा चमचा आणि काळी कॉफी १ कप एकत्र करून घ्यावे. जुलाब कमी होतात. हे करूनही चारपेक्षा जास्त जुलाब झाले आणि थकवा जाणवत असेल तर वैद्याचा सल्ला घ्यावा.

​५ शेंगदाणे – व्यायाम करून शरीरसौष्ठव कमावणाऱ्यांनी एक मूठ शेंगदाणे (कच्चे) + १० ग्रॅम गूळ रोज सकाळी खावा. शरीरावर मांस वाढायला फायदा होतो. तसेच शरीरात कोरडेपणा वाढत नाही.

​६. नासकवणी – हा कोकणातला एक गोडाचा स्वस्तात मस्त प्रकार आहे. कोणतीही गोष्ट वाया न जाता त्याचा स्वास्थ्यहितकर उपयोग कसा करता येईल हे नेहमी पाहावे. नासकवणी हे त्याचे उत्तम उदाहरण आहे.

​प्रत्येक घरात दूध कधी ना कधी फाटते. काही लोक फाटलेले दूध फेकून देतात. (काही त्यातून पनीर काढून उरलेले पाणी फेकून देतात किंवा कणीक मळायला वापरतात. आयुर्वेदानुसार हे उरलेले पाणी लहान मुलांपासून ते वृद्ध माणसांपर्यंत सर्वांसाठी अत्यंत पोषक आहे. ते नुसतेही पिता येते. त्याने पोट साफ होण्यास फायदा होतो.) फाटलेल्या दुधाला हलके गरम करून त्यात लिंबू पिळावे. चोथापाणी तयार होते. थंड झाल्यावर त्यात भरपूर मध मिसळावा. झाली नासकवणी तयार. जेवणासह आंबटगोड पदार्थ किंवा खिरीसारखे खावे. याने आतड्यांची शक्ती वाढते. शरीराच्या सर्व घटकांचे उत्तम पोषण होते, अंगावर मांस वाढते आणि व्याधी प्रतिकारक्षमताही सुधारते.

​७. बेसन – लहानपणी मुलांना आणि इतर वेळी प्रत्येक दिवाळीच्या पहिल्या आंघोळीसाठी तेल मालीश केल्यावर उटणे म्हणून बेसन वापरण्याचा प्रघात आहे. इतर वेळी मात्र याची आठवण कोणाला येत नाही. त्याऐवजी उगीचच, गरज नसताना जाहिराती बघून आंघोळीसाठी साबण, अंगावरील लोम/केस काढण्यासाठी (बॉडी हेअर रिमूव्हर) बाजारतून विविध महागडी क्रीम्स आणून वापरली जातात. ब्यूटीपार्लरमध्ये वैक्सिंग करणे, लेझर ट्रीटमेंट करणे या सर्व खर्चिक उपायांपेक्षा रोज बेसनाचा वापर आंघोळीसाठी केला तर साबण, क्रीम यावर पैसे खर्च करण्याची गरजच राहत नाही. ज्यांची त्वचा कोरडी असते, त्यांना तेलाच्या मालीशची गरज, तशीही असतेच. बेसन लावून त्वचा अजून कोरडी होते, म्हणून साबण वापरण्यापेक्षा नियमितपणे सर्वांगास तीळ तेलाने किंवा शेंगदाणा तेलाने मालिश करून बेसन वापरल्यास असा त्रास होत नाही. ज्यांना बद्धकोष्ठाची सवय आहे त्यांनी तर नेहमीच तेल मालीश केले पाहिजे. याने पोटही साफ होते आणि त्वचाही कोरडी पडत नाही. शिवाय बेसनामुळे कोरडेपणा वाढत नाही.

​याप्रकारे आयुर्वेदाने सांगितलेल्या सिद्धांताच्या मदतीने स्वयंपाकघरातील अनेक पदार्थांचा उपयोग करता येतो आणि त्यांचे फायदेही होतात.

​रत्न आभूषणे जसे बाह्य सौंदर्य वाढवितात तसेच योग्य आहाररूपी रत्ने रोजच्या रोज सेवन करून शरीराचे सौंदर्य वाढवता येते आणि चिरकाल टिकवताही येते. आयुष्य नुसतेच लांब (दीर्घ) नसावे, निरोगीही असावे आणि ते मिळविण्याकरिता, आयुर्वेदाची शास्त्रीय व्यवहार्यताच सर्वात उत्तमरीत्या कामी येते.