पशूंचे शहाणपण

माणसानं शिकाव्यात अशा बऱ्याच गोष्टी पशूंच्या जवळ आहेत हे नीतिकथा, बोधकथा सांगणाऱ्या लेखकांनी पहिल्यांदा उलगडून दाखवलं आहे. शांतीपर्वातील कथा, पंचतंत्र, हितोपदेश या ग्रंथांतील कथा किंवा इसाप, लाफौन्ते यांनी लिहिलेल्या कथा पाहिल्या तर त्यातली पात्रं पशू आहेत, पक्षीही आहेत. माणसांऐवजी या लेखकांनी पशू का वापरले असावेत याचं उत्तर ठामपणे देता येत नाही, पण काही अंदाज करता येतो.

आपण कालप्रवाहात उलटं जाऊन पाहिलं तर दहाएक हजार वर्षांपूर्वी आपणा सर्वाचेच पूर्वज शिकारी होते. शेतकरी जोडधंदा करतो तसे हे शिकारीच्या जोडीला खाद्यपदार्थ गोळा करण्याचा उद्योगही करत. फळं, बिया, मध, कंदमुळे, पक्ष्यांची अंडी, डिंक यांसारखे खाण्याचे जिनस त्यांना रानावनात हिंडून मिळवावे लागत. संध्याकाळी शेकोटीभोवती जमल्यावर गप्पागोष्टी होत त्याबहुतेक शिकारीच्याच होत असाव्यात. साहजिकच या गोष्टीतली पात्रं जंगलातले प्राणी असत. वाघ, हरीण, रानडुक्कर, कोल्हा, बेडूक, उंदीर, साप, कासव, घोरपड यांच्याच हकिगती गोष्टीत असत. म्हणजे शिकारी माणसांनी सोबत न आणलेल्या माणसांना सांगितलेल्या गोष्टीतली पहिली पात्रं म्हणजे जंगलातले प्राणी. बोधकथा किंवा नीतिकथा लिहिणारे हे प्रामुख्यानं संकलकच होते. सांगोवांगीच्या गोष्टीच त्यांनी स्वतःचं कसब वापरून लिहिल्या. म्हणून त्या कथेतली बहुसंख्य पात्रं पशू आहेत.

आणखीही एक कारण असावं. माणसाचा स्वभाव फारच गुंतागुंतीचा, तसं प्राण्यांचं नाही. ससा भित्रा, कोल्हा लबाड, सिंह शक्तिमान, हत्ती शहाणा, कासव मंद हे स्वभाव पटकन सांगण्यासारखे आहेत. ही सोय ध्यानी घेऊनही बोधकथा लेखकांनी पात्रं म्हणून पशूकडे धाव घेतली असेल.

पंचतंत्रात ‘ परदेशी गेलेल्या एका कुत्र्याची गोष्ट ‘ आहे –

एका गावात चित्रांग नावाचा कुत्रा होता. एका वर्षी पाऊस पडला नाही. मोठा दुष्काळ पडला. अन्न नाही. त्यामुळे कुत्र्याचं कूळच नाहीसं होण्याच्या मार्गाला लागलं. चित्रांग भुकेनं व्याकूळ झाला आणि इथंच राहिलो तर मरीन म्हणून दुसऱ्या देशात गेला. या देशात सुकाळ होता. अन्न-पाणी भरपूर होतं. एक मोठं गाव बघून चित्रांग त्या गावात राहिला.

घरमालकिणीचं लक्ष नाही असं हेरून चित्रांग घरात शिरायचा आणि स्वयंपाकघरातील नाना पदार्थ पोटभर खाऊन भरल्या पोटी बाहेर पडायचा. पण, बाहेर पडताच गल्लीतली माजलेली उद्धट कुत्री त्याला वेढत आणि अंगभर चावे घेत.

रक्तबंबाळ होऊन चित्रांग गावाबाहेर पडे आणि नदीकाठी गार धशीला जाऊन पडे.

रोज रोज हाच प्रकार होऊ लागल्यावर चित्रणानं मनाशी विचार केला, ” दुष्काळ असला तरी आपला स्वदेश उत्तम. तिथं सुखानं राहता येतं. रोज लढाई करायला कोणी येत नाही. मी परत आपल्या गावाला जाईन.

अनुभवानं शहाणपणा आलेला चित्रांग परत आपल्या गावी आला. तो आलेला बघून भाऊबंधांनी विचारलं, ” अरे चित्रांगा आम्हाला परदेशाचा वृत्तांत सांग ना. कसा आहे तो देश? तिथले लोक कसे वागतात? त्यांचं खाणं काय असतं? कोणते व्यवहार तिथे चालतात?”

चित्रांग म्हणाला, ” मित्रांनो, परदेशाचं काय वर्णन करू, तिथं खायला नाना तऱ्हेचे पदार्थ रग्गड आहेत आणि मोठ्या गावातल्या स्त्रियाही सैल आणि ढिल्या आहेत; पण एकच दोष आहे.

असं! कोणता रे?”

आपल्या जातभाईचा अतोनात त्रास तिथं आहे. जातच जातीची वैरी!

आता, या गोष्टीत, भेंड्या लावून भुंकणाऱ्या आणि नवा कुत्रा दिसताच त्याच्यावर जमावानं धावून कळवंडणाऱ्या कुत्र्याच्या ऐवजी, कोणती पात्र, कोणी प्रतिभावान घालू शकेल? अनोळखी पाहुण्यांशी भांडावं कुत्र्यांनीच, इतर कुणालाही तो त्वेष, ती ईर्षा, तो गुरगुराट, ते चावे जमणार नाहीत. जातभाईशी भांडावं तेही कुत्र्यांनीच.

वन्य प्राण्यांच्या वागणुकीसंबंधी बरंच संशोधन अलीकडील काही वर्षांत झालेलं आहे. हरीण, वाघ, हत्ती, वानरे, रानकुत्री, तरस, कोल्हे यांचं जंगलात वर्षानुवर्षं निरीक्षण करून प्राणिशास्त्रज्ञांनी प्रबंध लिहिले आहेत. सर्वसाधारण वाचकांसाठी पुस्तकंही लिहिली आहेत. जीवनाच्या या धोधाट प्रवाहात टिकून राहण्यासाठी लागतं ते शहाणपण जंगलातील प्राण्यांपाशी असतं. निसर्गाशी मिळतंजुळतं घेऊन ते जगतात. आपण, आपलं कुटुंब यापलीकडं आपल्या जातीजमातीचंही भान त्यांना असतं.

आपल्या कळपापैकी कोणी जंगलात मरून पडल्याचं आढळलं की, हत्ती झाडांच्या फांद्या, पानं, गवत आणून आपल्या जातभाईला पुरतात. आपण ज्याला दुःख म्हणतो तेही त्यांना झाल्याचं दिसतं. हत्तींचा कळप म्हणजे बहिणी, मावश्या, मुले, मुली असाच घोळका असतो. बहुतेक सगळ्या माद्या वेगवेगळ्या वयाच्या आणि पिले. इआन डगलस हॅमिल्टननं आपल्या पुस्तकात एक प्रसंग लिहिला आहे – मी जंगलात हिंडून हत्तींच्या वाटा शोधत होतो. एकाएकी हत्तीच्या लहान पिलाचा करुण आवाज कानावर आला. मी होतो तिथून शंभरएक फुटांवर, डाव्या बाजूला, वर हा आवाज होत होता. मी जवळ गेलो. झुडपाच्या डहाळ्या बाजूला सारून पाहिलं तर उतारावर हत्तिणीचं तोंड दिसलं, डोळे उघडे होते पण ती हलत नव्हती. माझ्या पुढ्यात झाड होतं. त्याच्यावर चढून डहाळ्या बाजूला करून मी पाहिलं. तेव्हा निसर्गातलं एक चित्तथरारक नाट्य पाहायला मिळालं.

हत्तिण व तिची पिल्ले

हत्तिण एका कुशीवर अशी उतारावर पडली होती. तिचा मागचा एक पाय मोठी शीळा आणि झाडाचा जाड बुंधा यात अडकला होता आणि ती लोंबकळली होती. मेली होती. तिच्या आजूबाजूला वेगवेगळ्या वयाची तीन लहान पिल्लं होती. सर्वांत मोठं होतं ते हळू आवाजात कण्हत होतं, मध्येच मोठ्यानं ओरडत होतं. दुसरं स्तब्ध होतं. आपलं डोकं त्यानं आईच्या अंगावर ठेवलं होतं. सर्वांत लहान पिलू आईला पिण्यासाठी तिची कास चाचपत होतं. मोठ्या पिलानं मग पुढचे गुडघे टेकले आणि आपले लहान दात आईच्या शरीराखाली घालून मस्तकाच्या रेट्यानं ते तिला उठवू लागलं. काही उपयोग नव्हता. पंधरा मिनिटं मी पाहत होतो. पुढे त्यांना माझा वास लागला आणि तिघेही गेले.

मी जवळ जाऊन पाहिलं. हत्तिणीचं शरीर अजूनही उष्ण होतं. माश्या जमा झालेल्या नव्हत्या. म्हणजे हा अपघात नुकताच झाला होता. ती घसरली त्या वाटेवरची झाडं मोडली होती आणि गोटे जागचे हलले होते. घसरलेला माग मी चारशे फुटांपर्यंत लावला. तिथं मला हत्तिणीच्या पायाचे ठसे दिसले. उतारावर गवतानं झाकलेल्या बिळात तिचा पाय अडकला असावा. तोल गेला असावा आणि ती उतारावरून घसरली असावी.

जंगलातील हत्ती आपल्या मेलेल्या जातभाईला मूठमाती देतात ही गोष्ट अनेक प्राणिशास्त्रज्ञांनी लिहून ठेवलेली आहे. मेलेल्या इतर प्राण्यांच्या बाबतीतही हत्ती हे काम करतात. भारतातील हत्तीबद्दल जॉर्ज शेल्लरनं दि डिअर अँड दि टायगर या ग्रंथात एक निरीक्षण दिलं आहे. वाघांचा अभ्यास करणाऱ्या शेल्लरनं कान्हा जंगलात एक रेडा वाघासाठी बांधला. पिलं असलेल्या वाघिणीनं हा रेडा मारला. आईनं मारलेली शिकार ही पिलं खात होती. आई शेजारी थांबली होती. एवढ्यात खालच्या जंगलातून एक हत्ती आला. वाघिणीची पिलं पळाली. हत्तीनं झाडाच्या फांद्या मोडून आणून रेड्याचं राहिलेलं शरीर झाकून टाकलं.

वानरांची टोळी 

वानराची एक टोळी बघितली तर काही गोष्टी आपल्या ध्यानात येतात. टोळीतल्या वानरांची संख्या वीस- बावीसपेक्षा जास्त नसते. संख्या वाढली की अडचणीही वाढतात, हे त्यांना ठाऊक असावं. खाणं, पाणी पिणं, रात्री सुरक्षित झोपणं यासाठी टोळीतल्या वानरांच्या संख्येवर नियंत्रण असतं. टोळीला जंगलात शत्रू असतात, धोका असतो. मांस खाणारे पक्षी लहान पिलांना झडपतात. पाणी घ्यायल्या गेलेल्या वानरांना नदी, डोहातील मगरी ओढून नेतात, बिबळ्या वाघ दुर्बळ वानराला धरून खातो.

वानराची एक टोळी म्हणजे एक मोठं कुटुंब असतं. एक बलिष्ट हुप्प्या सर्वांवर हुकमत ठेवून असतो. सर्वांच्या रक्षणाची जबाबदारीही त्याच्यावर असते. जंगलात उंच जागी राहून तो टेहेळणी करतो. वाघ दिसला की खकर-खक असं ओरडून इशारा देतो. पिलं, वानरिणी उंच जागी चढून गप्प बसतात. बिबट्या वाघ झाडाच्या खोडाशी दोन पायांवर उभा राहून भयानक गर्जना करतो. का तर वानराची गाळण उडावी, पळापळ व्हावी. एखादं पिलू एखादं दुबळं खाली यावं आणि आपल्या पंजात सापडावं.

अशा वेळी एखादी म्हातारी वानरी बेधडक झाडाचं खोड सरासरा उतरून दुसऱ्या झाडाकडे धावते आणि बिबट्याचा घास होते.

एरवी फार शहाणपणानं वागणारी वानर असा वेडेपणा का करतात, बुंध्याशी बिबळ्या आहे हे बघितल्यावर सुरक्षित झाडावरून उतरून दुसऱ्या झाडाकडे धावण्याची बुद्धी ऐन वेळी त्यांना का होते?

टोळीवर आलेलं संकट एखादं वानर स्वतःवर घेतं. बिबळ्याला चकवत किंवा त्याचं भक्ष्यही होतं.

जंगलातल्या तळ्याकाठी पाणी पितानाही एक वानर पाणी पिण्यासाठी वाकलेला असतो तेव्हा टोळीतील दुसरा पाठीशी बसून पहारा करत राहतो. दोघं, तिघं किंवा चौघं एकाच वेळी खाली तोंड करून पाणी पिताना कधीही दिसत नाहीत.

रानकुत्र्यांची शिकार पद्धती 

रानकुत्र्यांमध्ये तर टोळीतली शिस्त वाखाणण्याजोगी असते. टोळीतल्या कुत्र्यांची संख्या सहापासून वीसपर्यंत असते. यात जाणते झालेले नर माद्यांपेक्षा अधिक असतात. शिकार मारण्याचं काम सर्व टोळी मिळून करते. नर आणि माद्या शिकारीला जातात.

शिकारीला निघण्याआधी एक समारंभ होतो. टोळीचा प्रमुख कुत्रा सुरुवात करतो. शेपूट हलवणं, तोंडाला तोंड लावणं, चाटणं अशी सुरुवात होते. हळूहळू सगळ्या टोळीत ही देवघेव पसरते. उत्साहाला उधाण येतं. सर्वजण मिळून शिकारीवर जायला तयार होतात.

टोळीप्रमुख दिशा ठरवितो. आज पूर्वेकडे जाऊ. त्याच्या पाठोपाठ सगळी टोळी जाते. मतभेद वगैरे होत नाहीत. हरणांचा कळप दिसेपर्यंत ताशी सहा मैल वेगानं कुत्री जातात. कळप दिसताच वेग कमी केला जातो. कुत्र्यांची तोंडं खाली जमिनीकडे होतात. कुत्री आणि कळप यामधलं अंतर कमी होत जातं आणि एकाएकी, चाहूल लागताच हरणं उधळतात. कुत्री लगेच पाठलाग करीत नाहीत, थांबतात. हरणकळपाला अंगावरून धावत जाऊ देतात. मग कळपापैकी कोणतं हरीण दुबळं आहे हे हेरतात. त्याच्या मागावर धावतात. कळपापासून या हरणाला वेगळं पाडतात. पाठलाग सुरू होतो. दमलेल्या कुत्र्यांची जागा मागचे तरणेबांड कुत्रे घेतात. टोळीतले प्रमुख कुत्रे पळणाऱ्या हरणाच्या दोन्ही बाजूला असतात. म्हणजे हरीण कोणत्याही दिशेला वळलं तरी तिकडे कुत्री असतातच. मागची कुत्री मागच्या बाजूनं हल्ला चढवितात. लवकरच हरीण सापडतं. इथं शिकार करणाऱ्याला सिंहासारखी आधी खायला संधी दिली जात नाही. तरण्यांना संधी मिळते. त्यांनी खाऊन उरेल ते वडीलधारी कुत्री खातात. त्यांना पुरेसं मिळालं नाही तर पुन्हा शिकार हेरली जाते, केली जाते. सगळ्यांची पोटं भरतात.

हंगामाच्या काळात पिलं लहान असतात, तेव्हा त्यांच्याकडे बघायला माद्या बिळापाशी थांबतात. शिकारीहून परतणारी कुत्री या आयांसाठी पोटातून अन्न आणतात आणि बिळाशी आल्यावर ते तोंडातून काढून त्यांना देतात. टोळीपैकी एखादं दुसरं कुत्रं अपंग किंवा वृद्ध असलं तर त्यालाही असंच खाणं पुरवलं जातं.

सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शिकारीचा पाठलाग सुरू असताना एकाएकी अनुभवी कुत्री थांबतात आणि नव्या तरण्या शिकारी कुत्र्यांना पुढे जाऊ देतात. शिकारी मारण्यात ते निष्णात झाले पाहिजेत कारण पुढे येणाऱ्या शिकार मोहिमा त्यांनाच करायच्या आहेत, याची जाण त्यांना असते. आफ्रिकेतल्या तरसाचा, रानकुत्र्यांचा आणि कोल्ह्यांचा अभ्यास करण्यासाठी जंगलात चार वर्षं राहिलेल्या जेन व्हान लाविक गुडाल या बाईच्या ग्रंथात एक हकिगत आहे-

रानकुत्र्यांच्या टोळीतली एकमेव कुत्री मेली. तिची नऊ पिलं पाच आठवडे वयाची होती. टोळीतला जाणता कुत्रा या पिलांची काळजी घेऊ लागला, देखभाल करू लागला. तो रानात जाई. शिकार खाऊन परत येई. पोटात भरून आणलेली शिकार काढून पिलांना देई. दिवसामागून दिवस त्यानं पिलांना दोन वेळा खाऊ घातलं. पिलं मोठी झाली आणि टोळीबरोबर रानात शिकारीला जाऊ लागली.

वाघ, बिबळ्या, रानकुत्री यांच्याकडून मारल्या गेलेल्या हरणाची पोरकी पिलं सांभाळण्याचं काम चितळ, हरणंही करतात. भारतातील काही अभयारण्यांत चितळ – म्हणजे – कांचनमृग मोठ्या संख्येनं आहेत. भंडारा जिल्ह्यातल्या नागझिरा अभयारण्यात चितळ आहेत. पण वाघ, बिबळे, रानकुत्री फार नाहीत. कान्हाला वाघ, बिबळे आहेत. अशा जंगलात हरिणी मारल्या जातात. त्यांची पिलं पोरकी होतात. ही पोरकी पोरं कोणाही हरिणीमागे धावतात, ओरडतात. एका हरिणीमागे दोन-तीन पिलं धावताना दिसतात.

माझ्या परिचयातले एक गृहस्थ आणि त्यांची पत्नी प्रयोगशाळांसाठी पांढरे ससे आणि पांढरे उंदीर यांची पैदास करतात. त्यांनी मला सांगितले की, काही वेळा पिलं घालून उंदीरमादी मरून जाते. ही पोरकी पिलं मग दुसऱ्या लेकुरवाळ्या उंदीरमादीच्या पिलावळीत सोडावी लागतात. काही माद्या अशी पोरकी पोरं स्वीकारतात, वाढवतात. ही पोरं माझी नाहीत असं त्यांना वाटत नाही.

उंदरांना, सशांना, रानडकरांना पिलं जास्ती होतात, कारण हे प्राणी अनेक प्राण्यांचं भक्ष्य आहेत. कोंबडी रोज एक अंडं घालते. गरुड मादी वर्षातून एकदाच अंडं घालते. प्राण्यांची संख्या बेसुमार वाढली असं घडत नाही. संख्या मर्यादितच ठेवली जाते. अपघात, भक्षक पशुपक्ष्यांकडून खाल्लं जाणं, रोगराई, दुष्काळ अशा कारणांमुळे, गवत-वनस्पती हेच ज्याच खाणं आहे, अशा जनावरांची संख्या मर्यादित राहते. हिमालयातील रानटी शेळ्या-मेंढरांचा अभ्यास करणाऱ्या जॉर्ज शेल्लरनं, रानशेरडांचं निरीक्षण करून लिहिलं आहे-  सिंधमधल्या करचट भागातील डोंगरावर ज्या वर्षी दुष्काळात पाऊस पडत नाही त्या वर्षी रानटी शेरडीमगो करडं-कोकरं दिसत नाहीत. जन्माला आल्यानंतर पहिल्या काही दिवसांतच ती मरून गेलेली असतात किंवा जन्मालाच आलेली नसतात. जेव्हा चांगला पाऊस होतो. सगळीकडे हिरवळ असते तेव्हा मात्र एका-एका रानशेरडीला दोन-दोन कोकरं होतात आणि ती जगतात, वाढतात.

रानमेंढराविषयीचं शेल्लरचं निरीक्षणही लक्षात घेण्याजोगं आहे. कलबाघ इथं, १९६६ साली माऊंटफोर्ट या निरीक्षकानं रानमेंढराची संख्या पाचशे दिली होती. दहा वर्षांनी शेल्लरनं पाहिलं तेव्हाही ही संख्या पाचशेच्या आसपासच होती. म्हणजे अभयारण्यातसुद्धा रानमेंढरांची संख्या वाढली नव्हती. संख्या मर्यादित कशी ठेवावी, एवढं जरी माणसानं शिकून घेतलं तरी जंगल्यातल्या प्राण्यांपासून तो फारच महत्त्वाचं असं काही शिकला असं होईल.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.